कुमाऊं होळी
कुमाऊं होळी हा भारताच्या कुमाऊ प्रदेशात साजरा होणारा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक सण आहे.[१] हिवाळा सणाचा शेवट आणि नव्या पेरणीचा हंगाम अधोरेखित करणारा हा उत्सव मानला जातो. उत्तर प्रदेशातील हिमालय पर्वतीय रांगेतील शेतकरी कुटुंबाच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा सण मानला जातो.[२]
प्रकार
[संपादन]येथील होळीचे बैठकी होळी, खडी होळी आणि महिला होळी असे विविध प्रकार असून ते सर्व वसंत पंचमी या दिवशी सुरू होतात. दोन महिने या उत्सवाचा आनंद स्थानिक लोक घेत असतात. या विविध प्रकारात लोकसंगीत आणि लोकनृत्य याना विशेष महत्त्वाचे स्थान आहे.[३]शास्त्रीय संगीतातील विविध रागात गायली जाणारी ही गीते असून त्यांचा संबंध आनंदाच्या बरोबर आध्यात्मिक मार्गातील मोक्ष संकल्पनेशी सुद्धा जोडला जातो.त्यामुळे या होळीला निर्वाण होळी असेही म्हणले जाते.[४]
- बैठकी होळी- या होळीची सुरुवात मंदिराच्या प्रांगणात केली जाते. या होळीच्या प्रकारात गायली जाणारी लोकगीते शास्त्रीय संगीतातील रानगायनाच्या विशिष्ट वेळेचे संकेत पाळून गायली जातात. उदा. दुपारच्या वेलीला पिलू, भीमपलास, सारंग हे राग तर संध्याकाळी कल्याण, श्यामकल्याण, यमन हे राग गायले जातात.[५]
- खडी होळी-
या होळीची गीते ही उभी राहून गायली जातात म्हणून याला खडी होळी असे म्हणतात. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या आधी चार दिवस हा सोहळा सुरू होतो. अबीर गुलाल कपड्यांवर उडवून आणि पिचकारीने पाणी उडवून उत्सवाला सुरुवात केली जाते.[६] या प्रकारात पुरुष उभे राहून गीते सादर करतात. वाद्यांच्या ठेक्यावर ते हात आणि पायांना हेलकावे देत नृत्य सादर करतात. या पुरुषांना होलयार असे म्हणले जाते. कुर्ता, पायजमा, डोक्यावर टोपी अशा पोशाखात पुरुष या उत्सवात सहभाग घेतात. गावातील सरपंच असलेल्या व्यक्तीच्या अंगणात खडी होळी साजरी करण्याची पद्धती प्रचलित आहे. त्यानंतर घरोघरी जाऊन होळीगीते गायली जातात. चतुर्दशी तिथीला मोकळ्या जागेत होळी प्रज्वलित केली जाते.[७] दुस-या दिवशी पाणी आणि रंग खेळून उत्सवी आनंद घेतला जातो.[८]
- महिला होळी- हा विशेषकरून महिलांच्या आनंदाचा प्रकार आहे. महिला एकत्र बसून पारंपरिक होळी गीते गाऊन, उत्सवाचा आनंद घेतात.[९]
इतिहास
[संपादन]उस्ताद अमानत हुसेन या कलाकाराने होळीच्या परंपरेत गीतांचा समावेश प्रथम केली अस येथे मानले जाते. ब्रज प्रदेशातील कृष्णभक्तीचा प्रभाव येथील जनममानसावर असल्याने येथील होळी लोकगीतात राधा आणि कृष्ण यांच्य्या प्रेमाचे वर्णन विशेषकरून दिसून येते.[१०] अल्मोरा येथे या गायनाची सुरुवात आधी झाली आणि त्यानंतर नैनिताल, रानीखेत, पिठोरागड या ठिकाणी होळी गीत गायनाची प्रथा सुरू झाल्याचे दिसून येते. गावागावातील घराघरात मुले, युवक, वृद्ध माणसे जातात आणि होळीची गाणी गातात.
स्वरूप
[संपादन]प्रत्येक गावात चीर उभारली जाते. चीर म्हणजे एका झाडाच्या फांदीला कापड गुंडाळून ती फांदी रोवली जाते.हिला देवी भगवतीचे स्वरूप मानले जाते. एक गाव दुस-या गावाची चीर चोरून नेतो आणि आपल्या गावात ती रोवतो. त्यामुळे प्रत्येक गाव आपल्या चीरचे रक्षण करण्यास सावध असते. होळी पेटविली जाते त्या दिवशी होळीच्या जागेजवळ चीर नेली जाते, होळीला तिची प्रदक्षिणा घातली जाते आणि चीर परत आणून आहे त्या जागी पुन्हा उभी केली जाते.[१] एकमेकांच्या घरी जाऊन तबला, संवादिनी म्हणजे पेटी, ढोलकी अशा वाद्यांच्या तालावर होळीगीते गायली जातात. आलेल्या लोकाना बटाट्याचे तिखट पदार्थ, रव्या केलेले पदार्थ खायला दिले जातात. पान सुपारी देऊन सर्वांना निरोप दिला जातो.[११] नोकरी व्यवसायानिमित्त आपल्या मूळ गावापासून लांब असलेले कुमाऊ नागरिक आपापल्या ठिकाणी अशा प्रकारे होळी साजरी करतात आणि आपल्या सणाचा आनंद घेतात.[८]
होळीगीते
[संपादन]झनकारो झनकारो झनकारो
गौरी प्यारो लगो तेरो झनकारो - २
तुम हो बृज की सुन्दर गोरी, मैं मथुरा को मतवारो
चुंदरि चादर सभी रंगे हैं, फागुन ऐसे रखवारो।
गौरी प्यारो…
सब सखिया मिल खेल रहे हैं, दिलवर को दिल है न्यारो
गौरी प्यारो…
अब के फागुन अर्ज करत हूँ, दिल कर दे मतवारो
गौरी प्यारो…
भृज मण्डल सब धूम मची है, खेलत सखिया सब मारो
लपटी झपटी वो बैंया मरोरे, मारे मोहन पिचकारी
गौरी प्यारो…
घूंघट खोल गुलाल मलत है, बंज करे वो बंजारो
गौरी प्यारो लगो तेरो झनकारो
हे ही पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ a b "Kumaoni Holi (कुमाऊंनी होली)". कुमाऊँनी बोली (इंग्रजी भाषेत). 2017-04-02. 2022-03-07 रोजी पाहिले.
- ^ Husken, Ute; Brosius, Christiane (2012-08-21). Ritual Matters: Dynamic Dimensions in Practice (इंग्रजी भाषेत). Routledge. ISBN 978-1-136-51793-8.
- ^ "Uttarakhand: Locals celebrate traditional Baithaki Holi in Kumaon | News - Times of India Videos". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2022-03-08 रोजी पाहिले.
- ^ "झनकारो झनकारो झनकारो / कुमाँऊनी - कविता कोश". kavitakosh.org (हिंदी भाषेत). 2022-03-08 रोजी पाहिले.
- ^ Bisht, Brijmohan (2015-03-06). "Kumaoni Holi - Uttarakhand Fairs and Festivals". www.euttaranchal.com. 2022-03-07 रोजी पाहिले.
- ^ "Kumaoni Holi (कुमाऊंनी होली)". कुमाऊँनी बोली (इंग्रजी भाषेत). 2017-04-02. 2022-03-08 रोजी पाहिले.
- ^ "Holi 2022: कुमाऊं की खड़ी होली 13 मार्च से, जानिए होलाष्टक व होलिका दहन की जानकारी". Dainik Jagran (हिंदी भाषेत). 2022-03-12 रोजी पाहिले.
- ^ a b "Kumaoni Holi: बेहद खास है कुमाऊं की खड़ी होली, वर्षों पुराना अंदाज आज भी है कायम | An world famous Kumaoni Holi khadi holi and baithaki". Patrika News (हिंदी भाषेत). 2021-03-26. 2022-03-12 रोजी पाहिले. zero width space character in
|title=
at position 37 (सहाय्य) - ^ Guides, Rough (2016-10-03). The Rough Guide to India (Travel Guide eBook) (इंग्रजी भाषेत). Rough Guides UK. ISBN 978-0-241-29539-7.
- ^ "अल्मोड़ा से शुरू हुई कुमाऊंनी होली की परंपरा, मानत हुसैन को माना जाता है होली गीतों का जनक।". eKumaon.com. 2022-03-10 रोजी पाहिले.
- ^ "Traditional Holi in Kumaon Anchal". www.esamskriti.com (इंग्रजी भाषेत). 2022-03-10 रोजी पाहिले.