Jump to content

कवठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कवठ

कवठ - शास्त्रीय नाव फेरोनिया एलेफंटम् व लिमोनीया अॅसीडिस्सीमा, रुटेसी कुळ. इंग्रजी शब्द - वूड एप्पल, कर्ड फ्रूट, मंकी फ्रुट, संस्कृत - कपित्थ, दधिफल, कपिप्रिय, मराठी - कपित्थ, कवंठ, कवंठी, कवठ इ. कवठ हा वृक्ष मूळचा दक्षिण भारतातला आहे. कवठ हा काटेरी व पानझडी प्रकारचे वृक्ष आहे. भारतासहित पाकिस्तान, श्रीलंका, जावा, ब्रह्मदेश, बांगला देश इ. प्रदेशांत कवठाचे वृक्ष आढळतात. या झाडाची उंची ६-९ मी. असते. याची पाने संयुक्त, विषमदली, पिसासारखी एकआड एक, चकचकीत व गुळगुळीत असतात. दले ३-९, समोरासमोर, बिनदेठांची, अखंड व गोल टोकाची असून उन्हाळ्यात गळून पडतात. या झाडाच्या खोडाची साल पांढरट-हिरवी किंवा काळी, खरबरीत, जाड व भेगाळलेली असते.

श्रीलंकेतील त्रिंकोमाली येथील कवठ वृक्ष
कवठाचे सरबत

फेब्रुवारी ते एप्रिल या काळात या झाडांच्या फांद्यांच्या टोकास विरळ परिमंजरीवर लहान आकाराची फिकट लाल व आखूड देठांची फुले येतात. मोहर आल्यानंतर साधारणत: २-३ महिन्यांनी फळे तयार होतात. या फळांची साल कठीण असते. या फळांचा रंग हा करडा असतो आत मध्ये मृदू गर व लांबट बिया असतात. कवठाचे पिकलेले फळ चवीला आंबट-गोड व तुरट असते.

उपयोग

[संपादन]

या फळांच्या गरापासून खाण्यासाठी चटणी, मुरंबा, जेली, बर्फी बनवतात. हे फळ पित्ताचे शमन करण्यास मदत करते व यामुळे भूक वाढते. कवठ कंठाची शुद्धी करते, दमा, क्षयरोग, रक्‍तविकार, उलटी, वातदोष, श्रम, उचकी, विष, तृष्णा, ग्लानी वगैरे तक्रारीत हितकर असते.[] तिन्ही दोषांचे संतुलन करते. शौचासह आव, मूळव्याध वगैरे त्रासावर कवठाचा बिया व धागे काढलेला गर ताकासह घेण्याचा उपयोग होतो. फळाची साल पित्तावर उपयुक्त असते; तसेच ती कातडी कमाविण्यासाठी व रंगविण्यासाठी वापरतात. वाळलेली फुले उकळून त्यांपासून रंग मिळतो. बियांतील तेल खाजेवर लावतात. पाने सुवासिक, वायुनाशी व अंगावर पित्त उठल्यास त्यांचा रस लावतात.

या झाडापासून डिंक ही मिळतो हा डिंक अर्धपारदर्शक, तांबूस भुरा असतो. बाभळीच्या डिंकास पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या झाडापासून मिळणारे लाकूड मजबूत आणि टिकाऊ स्वरूपाचे असल्यामुळे घरबांधणीसाठी व शेतीचे अवजारे बनवण्यासाठी उपयोग केला जातो.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "कवठ". ketkardnyankosh.com. 2020-11-25 रोजी पाहिले.