Jump to content

करंज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
करंज

शास्त्रीय वर्गीकरण
वंश: मिलेशीया
जात: एम. पिनाटा
वर्ग: युडीकॉटस
कुळ: फाबेसी
शास्त्रीय नाव
मिलेशीया पिनाटा

वृक्षतेलझाड

नावे:-

  • मराठी : करंज
  • संस्कृत - करंज; गौरा; चिरबिल्वक; नक्तमाल; पूतिक; प्रकीर्य; स्निग्धपत्र
  • इंग्रजी : Pongam; Indian Beach
  • लॅटिन : Pongamia pinnata
  • गुजराती : कनझी; कानजी
  • हिंदी : करंज; कांजा; किरमल; पपर
  • कानडी : हुलीगिली; होंगे

करंज (शास्त्रीय नाव: Pongamia Pinnata (L.) Pierre Fabaceae) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या मध्यम उंचीच्या झाडास करंजीच्या आकाराची फळे लागतात म्हणून याचे नाव करंज पडले.या फळांपासून निघणारे तेल हे आयुर्वेदात औषधी म्हणून वापरतात.त्यास 'करंजीचे तेल' असे म्हणतात.

करंज हा सदाहरित वृक्ष भारतात सर्वत्र आढळून येतो. याचे वनस्पतिशास्त्रातील नाव ‘पोंगॅमिया पिन्नाटा’ असे आहे. सर्व प्रकारच्या हवामानात याची वाढ होते. काळी चिकणमाती अथवा जांभ्या जमिनीत याची वाढ चांगली होते. हा पश्चिम घाटातील मूळ रहिवासी असून ब्रह्मदेश, आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेपर्यंत पोहोचला आहे.

करंज साधारण १५ ते २० मीटर उंचीपर्यंत वाढतो, पण काही ठिकाणी ३० मीटर उंचीपर्यंत वाढला आहे. खोड काहीसे पसरट असते. खोडाची साल मऊ, गुळगुळीत किंवा गाठीयुक्त असून रंगांनी हिरवी-राखाडी असते. झाडाचा पर्णसंभार पसरणारा असतो. पाने एकांतरित, संयुक्त व विषमपर्णी असतात. ६ इंच ते १२ इंच लांब असणाऱ्या पानामध्ये पाच, सात किंवा नऊ लंबगोलाकार, टोकदार पर्णिका असतात. ती अत्यंत तुकतुकीत, मऊ, मुलायम, चमकदार, पोपटी-हिरव्या, तजेलदार वर्णाची असतात, म्हणूनच या झाडाच्या चमकत्या पालवीवरून त्याच्या ‘स्निग्धपत्र’ नावाची सार्थता पटते.

साधारण एप्रिल ते जूनमध्ये झाड फुलांनी बहरून जाते. पान आणि खोडाच्या खोबणीमधून मंजिऱ्या बाहेर पडतात. त्यावर अतिशय लहान देठाच्या, तपकिरी कळ्या बाहेर पडतात. कळ्या उमलून त्याचे फिक्या गुलाबी, जांभळट फुलांत रूपांतर होते. या फुलांच्या तुऱ्यांना मंद वास असतो. काही ठिकाणी ही फुले रंगाने हिरवट पांढरी किंवा दुधी पांढरीही आढळतात. फुलात पाच पाकळ्या असतात, त्यापकी चार गुलाबी रंगाच्या असतात तर पाचवी पाकळी हिरव्या रेषांनी मढलेली असते. फुले कोमेजण्यापूर्वीच खाली गळतात.

फुले ओसरल्यावर पाठोपाठ येतात पिवळसर, टणक, चपटय़ा करंजीच्या आकारासारख्या शेंगा. बियांपासूनच तेल काढतात. ‘करंजतेल’ म्हणून हे प्रसिद्ध आहे. हे तेल जंतुनाशक आहे. यामध्ये ‘करंजीन’ व ‘पॉन्गेमॉल’ ही द्रव्ये आहेत. प्राचीन काळी विविध त्वचारोग, सर्पदंश, कृमी व दूषित जखमा भरण्यासाठी वापरले जात असे. पानांचा उपयोग संधिवातावर करतात. जंतुनाशक म्हणून याची पेंड बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. दिव्यामध्ये जाळण्यासाठी याचा उपयोग करतात. साबण बनविण्यासाठीही आणि वंगण म्हणूनही याचा वापर करतात. पानांचा वापर हिरवे खत म्हणुन केला जातो .करंज हा रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी एक वृक्ष आहे.

मूळ भारतीय रहिवाशी असलेल्या करंज वृक्षाचा तसा आसेतुहिमाचल अधिवास असला तरी तो प्रामुख्याने पश्चिम घाटांतील नदीनाल्यांच्या काठी तसेच समुद्रकिनाऱ्यालगतच्या जंगलातील दमट हवामानात सुखाने वाढतो. अर्थात पाणी किंवा क्षारयुक्त जमिनीत तसेच समुद्रसपाटीपासून ४००० हजार फुट उंचीवरील जंगलात देखील चांगला वाढताना दिसतो. भारतात सर्वत्र या डेरेदार वृक्षाची लागवड सावलीसाठी रस्त्यांच्या कडेला केलेली दिसते. या झाडाच्या सावलीत गवताची वाढ चांगली होत असल्याने गवताळ प्रदेशात लागवडीसाठी हे झाड उपयुक्त आहे. भारतातून या झाडाचा प्रसार दक्षिण पूर्व आशिया तसेच ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्याजवळील प्रदेशात झालेला आढळतो. करंज हे मध्यम स्वरूपाचे आकारचे, मध्यम बांध्याचे झाड असून त्याच्या पानांचा डोलारा पसरलेला दिसतो. याची उंची जवळपास ५०-५५ फुट किंवा त्यापेक्षा जास्त आढळते. बुंध्याचा घेर २ ते ३ फुटांचा असतो. याची संयुक्त पाने पाच-सात अंडाकृती पर्णिकांची असतात. पानांच्या कुशीत फुलणारी फुले इवलीशी पण उदंड, सुगंधी, शुभ्र रंगापासून गुलाबी, जांभळ्या रंगापर्यंत विविध रंगाची उधळण करणारी. याची फळे म्हणजे शेंगा, चपट करंजीच्या आकाराच्या किंवा पापडीसारख्या, कडक, पिकल्यावर पिवळट उदी रंगाच्या. संपूर्ण वृक्ष जेव्हा पानगळीने निष्पर्ण होतो तेव्हा सर्व फांद्यांवर शेंगा लटकलेल्या असतात.प्रत्येक शेंगेत बी मात्र एकच, क्वचित प्रसंगी दोन असतात. या बिया लाल-तांबडया रंगाच्या, कडू चवीच्या आणि तेलयुक्त असतात. जंगलवृद्धीसाठी झाड साधारणपणे ४-६ वर्षात फळावर येते. फळांची तोडणी सर्वसाधारणपणे नोव्हेंबर – डिसेंबर ते मे-जून या काळामध्ये केली जाते. शेंगा हाताने सोलून बिया वेगळ्या केल्या जातात प्रत्येक झाडामागे अंदाजे ९ ते ९० किलो बियांची उपज होते. उपजेच्या अंदाजे ७५% संपादन एकटया कर्नाटकात होते. भारतात एकूण बियांच्या उत्पादनापैकी फक्त १०% बियांचे संपादन होते. झाडाच्या हिरव्या पानांवरील सफेद नक्षीकाम हे नेमॅटोड या सूक्ष्म प्राण्याच्या चलनवलामुळे झालेले आहे. करंजाच्या बिया त्यातील तेलासाठी उपयुक्त आहे. विविध उद्योगधंद्यात व औषधात त्याचा उपयोग होतो. करंजाच्या बियांमध्ये अपचनकारक तत्त्वे असून त्यांचा विषारी परिणाम अन्नातून बियांचे चूर्ण किंवा पेंड दिल्यास प्राण्यांवर दिसून येतो. करंजाचे तेल कातडे कमाविण्यासाठी, वंगणासाठी व मेणबत्या बनविण्यासाठी वापरतात. या तेलाचा औषधी उपयोग आयुर्वेदात विशद केला आहे. करंज तेल पिवळट रंगाचे असून दीर्घकाल साठवणीनंतर ते अधिक गडद रंगाचे होते. तेलाचा उग्र गंध असून ते कडू असते. अतिशयोक्ती अलंकाराचा सर्रास वापर आयुर्वेदात आढळतो त्यानुसार ‘करं जनयति इति करंज’ असे नाव या वृक्षास प्राप्त झाले आहे. या तेलाच्या वापरामुळे महारोगाने जडलेली हाताची बोटे पुन्हा निर्माण होतात अशी कल्पना त्यात गर्भित आहे. तेल काढल्यानंतर उरलेली करंजाच्या पेंडीतील नत्राच्या उच्च प्रमाणामुळे तिचा खत म्हणून नेहमी वापर केला जातो. नत्राबरोबरच या पेंडीच्या खतातून शेतीला स्फुरद व पालाश ही द्रव्ये देखील मिळतात, शिवाय त्यातील विषद्रव्यांमुळे मातीतील किटक व बुरशीजन्य रोगांपासून पिकांचे संरक्षणही अपोआप होते. [मुंबई उपनगरात रस्त्याच्या कडेला तसेच दक्षिण मुंबईत देखील हा वृक्ष आढळतो.

चित्रदालन

[संपादन]