ओड्र-वडार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


ओड्र-वडार[संपादन]

ओड्र-वडार समाजालाच वड्ड, वडार असेही म्हटले जाते. ही हिंदु धर्मातील मूळची क्षत्रिय जमात आहे. ओड किंवा ओड्र (Od किंवाOdra) या शब्दाचा अपभ्रंश होवून वडार हा शब्द अस्तित्वात आला आहे. ओड्र या शब्दाचे मूळ शोधणे फार कठीण आहे. संस्कृत शब्द उंड पासून उंड्र नंतर ओड्र हा शब्द तयार झाला व पुढे ओड्र पासून ओड-ओढ-वड्ड-वडार असा विस्तार होत गेला असा एक विचार प्रवाह आढळून येतो.

संस्कृत मध्ये उंड म्हणजे जमीन, भूमी तसेच पृथ्वी असा होतो. उंड चा उंड्र असा उपयोग होतानाचा अर्थ रज किंवा धूळ असा होतो. सेटलमेंट अधिकारी कॅप्टन वॉर्ड हे गोंड या जमातीच्या नावाचा अर्थ सांगताना, संस्कृत मधील ‘गो’ आणि ‘उंड’ या दोन शब्दांपासून गोंड हा शब्द बनला आहे असे नमूद करतात. त्यांच्या मते गोंड म्हणजे पृथ्वी अथवा शरीर असून, शब्दाचा ’जमिनीवरील समाज’ (भूमिपुत्र) असा मथितार्थ आहे. उंड्र या शब्दाच्या पर्यायाने विचार करता उडून आलेली धूळ असा म्हणजेच स्थलांतरित भूमिपुत्र असा घेता येऊ शकेल.

ओडिसा या राज्याच्या नांवाची उत्पत्ती ओड्र विषय (Odra-Vishaya) / ओड्रदेश या संस्कृत शब्दांपासून झालेली आहे. ओडवंशीय राजा ओड्र याने ओडिसा हे राज्य वसविले. पाली आणि संस्कृत भाषेत ओड्र लोकांचा उल्लेख क्रमशः ओद्दाक आणि ओड्रच्या रूपात आढळून येतो. प्लिनी आणि टोलेमी सारख्या युनानी लेखकांनी ओड्र लोकांचे वर्णन ओरेटस (Oretes) असा केला आहे. प्लिनीच्या प्राकृतिक इतिहासात ओरेटस (Oretes) लोक जेथे राहतात तेथे मलेउस (maleus) पर्वत उभा आहे. येथे युनानी शब्द ओरेटस बहुधा संस्कृतमधील ओड्र या शब्दाचे संस्करण असून, मलेअस पर्वत हा ओडिसामधील मलयागिरी आहे.

महाभारतात ओड्रांचा उल्लेख पोड्र, उत्कल, मेकल कलिंग आणि आंध्र यांच्या समवेत आढळून येतो

'पांड्याश्च द्रविडांश्चैव
सहितां श्चोड्र केरलै:,
आन्ध्रास्तालवनांश्चैव
कलिंगानुष्ट्रकर्णिकान्।'

(पाण्ड्यांशच द्रविडांश चैव सहितांशच ओड्र केरलैः आन्ध्रांश तलवनांश चैव कलिङ्गान् ओष्ट्र कर्णिकान् (II.28.48))

या ओळीतील जातींच्या नांवांवरून असे लक्षात येते की, त्यातील काही नांवे प्रदेश व जमाती यांची दर्शक आहेत. उदा.- ओड्र, पोंड्रक, द्रविड, आंध्र इत्यादी. कालौघात ओड्र विषय – ओड्र विशा – ओडिसा व ओड्रदेशा– ओडिसा या प्रकारे ओडिसा नांवाची उत्पत्ती झाली आहे. ११व्या शतकात ओडिसाच्या सीमेची सुरूवात ओड्डादी (Odda-aadi) असे म्हंटले जाई अशी नोंद आढळते, कालांतराने या उच्चाराचा अपभ्रंश ओड्ड वाडी असा झालेला दिसून येतो. यानंतरच्या शतकात या भागातील समाज हा ओड्ड म्हणजेच वडार म्हणून ओळखला जाऊ लागला.

वडार या जमातीस स्वतंत्र आणि विशिष्ठ असा हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. मूळच्या हिंदु – क्षत्रिय धर्मातील ही जमात बौद्ध धर्माच्या प्रसरात व मुस्लिम शासन पद्धतीच्या प्रवाहात भारतभर विखुरल्ली गेली. प्रसिद्ध कवी शाह अब्दुल लतीफ भिताई आपल्या कवितेत कौतुकाने म्हणतो की, ओढ (Odhs) लोक त्यांचे साधेपण व कष्ट यांच्यासाठी जाणले जातात.

पुराणातील संदर्भ/ धार्मिक ग्रंथांतील संदर्भ[संपादन]

अ हिस्ट्री ऑफ द ‘ट्राईब्स ॲन्ड कास्ट्‌स’ या पुस्तकात डब्ल्यू. क्रुक (W. Crooke) लिहिहतात की, ओड किंवा ओर्ह (Od or Orh) स्वतःला क्षत्रिय मानतात. ओड (वडर) हे राजा भगीरथाचे वंशज असून त्यांच्या विवाह प्रसंगी ते हिंदु रिवाजाप्रमाणे पूजापाठास ब्राम्हणास बोलवतात. या संदर्भाच्या अनुषंगाने वडर समाजाचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक असलेले हिंदु धार्मिक ग्रंथातील संदर्भ :

महाभारत[संपादन]

महाभारतातील सभापर्वामध्ये ओड्र जमातीचा उल्लेख आढळून येतो.

पाण्ड्यांश च दरविदांश चैव सहितांश चोद्र केरलैः
आन्ध्रांस तलवनांश चैव कलिङ्गान्‌ ओष्ट्र कर्णिकान्‌।

चीनाछकांस्तथा चोड्रान्‌ बर्वरान् वनवासिन:
वार्ष्णेयान्‌ हारहूणांश्च कृष्णान्‌ हैमवतांस्तथा।

बृहत्सहिंता[संपादन]

वराह मिहिर या ॠषीने बृहत्संहिता मध्ये 'नक्षत्र कूर्माध्यायः'त नक्षत्र तसेच श्रावण महिन्याबद्दल सांगताना असे लिहले आहे की-

'अथपूर्वस्यामञजनबृषभध्वजपद्ममाल्यवद्गिरयः।

व्याघ्रमुखसुह्मकर्वटचान्द्रपुराःषूर्पकर्णाष्च।

खसमगधषिबिरगिरिमिथिलसमतटोड्राष्ववदनदन्तुरकाः।

प्राग्ज्योतिड्ढलौहित्यक्षीरोदसमुद्रपरुड्ढादाः।

उदयगिरिभद्रगौडकपौण्ड्रोत्कलकाषिमेकलाम्बष्ठाः।

एकपदताम्रलिप्तककोषलका वर्धमानष्च।'

अर्थात् अंजनगिरि, बृषभध्वजगिरि, पद्मगिरि, माल्यवान पर्वत, व्याघ्रमुख, सुह्म, कर्कट (कर्वट), चन्द्रपुर, शूर्पकर्ण देश, खस, मगध, शिविरपर्वत, मिथिला, समतट, उड्र, अष्ववदन, दन्तुरक, प्राग्ज्योतिश, लौहित्य,पुरुषाद प्रदेश, उदयगिरि, भद्र, गौड देश, पौण्ड्र, उत्कल, काशी, मेकल, अम्बष्ठ, एकपद, ताम्रलिप्तक, कोशल व वर्धमान प्रदेश इत्यादींचा समावेश तीन नक्षत्रांच्या वर्गांमध्ये होतो. अर्थात आर्दा्र, पुनर्वसु, पुष्य हे तीन नक्षत्रांचे प्रदेश असून पुर्वोत्तर भागातील जेवढे पर्वत आहेत ते सर्व पुष्य नक्षत्र वर्गाचे आहेत. वराह मिहिर ॠषी येथे “उड्र” या नावाचा उल्लेख एक पर्वतीय भाग म्हणून करतात.

मनुस्मृति[संपादन]

शनकैस्तुक्रियालोपादिमाःक्षत्रियजातयः

वृषलत्वंगतालोकेब्राह्मणादर्शनेनच।

पौण्ड्रकाश्चोंड्रद्रविडाःकाम्बोजायवनाशकाः

पारदाःपल्लवाश्चीनाकिरातादारदाःखशाः।। (मनु. 10, 43-44)2

अर्थ - पौंड्र, ओंड्र, द्रविड़, कम्बोज, यवन, शक, पारद, पल्लव, चीन, किरात, दरद, खश जे क्षत्रिय आहेत, परंतु ब्राह्मणांकडून दुर्लक्ष्यामुळे कर्माने शुद्रत्व प्राप्त झाले.

इतिहास[संपादन]

ओड्रपीठ[संपादन]

“औंड्रपीठ” चाही ऊल्लेख विवीध ग्रंथात, पुराणात आढळूण येतो. विष्णू पुराणात कमला स्त्रोत्राचा उल्लेख आढळूण येतो. सुख- समृद्धिच्या प्राप्तीसाठी कमाला स्त्रोत्राचे पठन लाभकारी ठरतो. या कमला स्त्रोत्रामध्ये सुद्धा आपणास देवीचा उल्लेख खालील प्रमाणे आढळतो.

कालिका त्वं कालिघाटे कामाख्या नीलपर्वत ।

विरजा ओड्रदेशे त्वं प्रसन्ना भव सुंदरि ॥

अर्थ- हे देवी, तु लालीघाटावर काली कालिका , नीलपर्वत पर कामाख्या आणि औड्र देशात विरजारूपात विराजमान आहेस. हे सुंदरी ! तु सदा आमच्यावर प्रसन्न रहा. तसेच कालिका पुराणानुसार प्रथम पीठ 'औंड्र पीठ' आहे.

"औंड्राख्यं प्रथमं पीठं द्वितीयं जालशैलकम्।

औंड्रपीठं पश्चिमे तु तथैवोंड्रेश्वरी शिवाम्।

कात्यायनीं जगन्ना मो ड्रेशं च प्रपूजयेता॥"

          हे औण्ड्रपीठच ओडिसा असून येथे वडार समाजाचे पुर्वज आपल्या सुवर्ण कालखंडात आपल्या राज्यावर शासन करत होते. याजपुर येथे विरजा देवी या देवीचे स्थान असून उत्कल म्हणजेच उडीशाची ती प्रधान देवी आहे जिचे वर्णन ब्रह्मपुराण मध्ये खालील प्रमाणे आढळूण येते.

विरजे विरजा माता ब्रह्माणी संप्रतिष्ठिता।

यस्याः संदर्शनात्मर्त्यः घुनात्या सप्तमं कुलम्॥

असा आदिशक्ती व वडार समाजाच्या पुर्वजांचा प्राचिन संबंध असून वडार समाजातील सर्वांनी याची दखल घेवून या इतिहासाचा प्रसार वडार समाजात व इतर समाज बांधवांपर्यंत केला पाहिजे हे मला इथे आवर्जून सांगावेसे वाटते.

गुन्हेगार जमाती कायदा व वडार समाज[संपादन]

वडार समाज बांधकामाच्या निमीत्ताने प्रवास करत भटकंती करतो. बांधकाम व स्थापत्य क्षेत्रात वडार समाजाइतके कौशल्य इतर कोणत्याही जाती व जमाती मध्ये आढळून येत नाही. या जमाती एखाद्या कामानिमीत्त कामाच्या परिसरात स्थायीक झाल्याची अनेक उदाहरणे भेटतात. पेशव्यांनी जोर्तीलिंगांचा केलेला जीर्णोधार असो अथवा रामदास स्वामींच्या आज्ञेने झालेल्या मारूती मंदिरांची निर्मीती असो वडार समाजाचे योगदान या कामात आहेच. तसेच नजीकच्या काळातील उदाहरण द्यायचे झाल्यास कोल्हापुर संस्थानात शाहू महाराजांनी वडार समाजाला राजाश्रय देवून राधानगरी धरण, रंकाळा तलाव इ. बांधकामाकरीता वडार समाजाला एकत्र आणले. ¥ गुन्हेगार जमाती कायद्याच्या सुरूवातीच्या काळात ब्रिटिशांनी वडार जमातीचा पुरेपुर उपयोग करून घेतला. भटक्या जमातीचे उपद्रवी मुल्य लक्षात घेवून गुन्हेगार जमाती कायदा जरी आणला असला तरी वडार समाजाचे कोशल्यच गुन्हेगार जमात म्हणून घोषीत करण्यास कारणीभूत ठरले. ब्रिटिशांनी धरणे, रस्ते, रेल्वेमार्ग यांच्या निर्मीतीसाठी वडार समाजाचा मोठ्या प्रमाणात वापर करून घेतला. गुन्हेगार जमाती कायद्याच्या तरतुदींच्या आधारावर वडार समाजाची सामाजिक व आर्थिक पिळवणूक करण्यात आली. उंदीरगाव (जिल्हा अहमदनगर) येथे हरेगावच्या साखर कारखान्याच्या बांधकामासाठी सोलापुर सेटलमेंटमधून वडार समाज आणला गेला. तेव्हा पासून वडार समाज तेथेच राहत आहेत आणि येवढेच नाही तर त्यांची वर्तणूक बरी दिसल्याने तत्कालीन प्रांत आधिका-यांनी त्यांना उंदीरगांव येथे 10 ते 15 गुंठे जमीन राहण्यासाठी दिली. हरेगांव साखर कारखाना बांधुन झाल्यानंतर त्या कारखान्यात वडार लोकांना किरकोळ कामासाठी रोजंदारीवर ठेवून घेतले. तसेच पुढील काळामध्ये इतर ठिकाणांहुन अनेक वडार येथे राहू लागले. देवपुर (जिल्हा धुळे) येथील सेटलमेंटमधून बाहेर पडून वडार समाज धुळे व नंदुरबार जिल्ह्यात विखुरलेला दिसुन येतो. धुळे शहरात चक्कनबंडी येथे वडार समाजाची वस्ती मोठी असून येथे वडार समाजाने दगडखाणी कामगार समिती 1975 साली स्थापन केली होती. त्यामुळे त्यांच्या राहणीमानात सुधारणा आढळून येत असल्याचे दिसुन येत आहे.

संगीत नाट्य – जस्मा ओढण[संपादन]

गुजराती लोकगीते व भवई (गुजराती नृत्य प्रकार) यांच्यावर आधारित आनंदमय, उत्कंठावर्धक, विनोदाने भरलेले असे संगीत नाट्य “जस्मा ओढण” हे शांता गांधी यांनी लिहिलेले आहे.

जस्मा ही प्रसिद्ध भवई स्वर्गातील अप्सरा ‘कामकुंडला’च्या पृथ्वीवरील अवताराची कहाणी आहे. गुजराथमधील वडार आपल्या बांधकाम कौशल्यासाठी ओळखले जातात. जस्मा ही गुजराथमधील वडार जमातीतील प्रसिद्ध स्त्री आहे. मजुरांचा आत्मसन्मान व स्त्रीस्वभावांच्या वैशिष्ट्यांना अधोरेखित करणारे जस्माचे हे पात्र आहे. रंगला आही नायक हे आणखी एक इतर महत्त्वाचे पात्र असून ते सूत्रधारांप्रमाणे भवईच्या माध्यमातून नाट्यमय स्वरूपात जस्माच्या जीवनाचे ओझरते दर्शन घडवतात.

ग्रामीण जीवनाचा किनारा लाभलेल्या या प्रयोगादरम्यान मोहून टाकणारे संगीत रसिकांवर एक वेगळीच जादू करते. एक अप्सरा वडार जमातीमध्ये जन्म घेते. राजा सिद्धराज जयसिंगला ती दिसताच आवडते. राजा तिच्यापुढे आपल्या प्रेमाचा प्रस्ताव ठेवतो, आपली राणी होण्याची विनंती करतो परंतु जस्मा आपल्या आत्मसन्मानाशी तडजोड न करता सती जाणे पसंत करते. या नाटकातील गुजराती लोकगीत आणि भवई नृत्याद्वारे विनोद, तणाव, उत्कंठा, संघर्ष या भावनांचे दर्शन घडून येते.


भाषा[संपादन]

भारतातील प्राचीन काळातील ‘गुरूकुल’ परंपरेमध्ये वेद, ज्योतिष, खगोलशास्त्रांबरोबर भाषेच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले जात होते. गुरूकुल पद्धतीत “सकल लिपी ज्ञान” या अभ्यासक्रमात देवनागरी, द्रविडी, इत्यादी भाषांचा विकास कसा होईल याची काळजी घेतली जायची. वेगवेगळ्या प्रांतांतील भाषांचाही अभ्यास केला जात असे, त्यामध्ये “ओड्र लिपी” चाही समावेश होता. ओड्र लिपीचा विकास व जतन ओड्र साम्राज्यातच झाला. कालप्रवाहात वडार (ओड्र) जमातीचे भारतभर स्थलांतर झाले.

आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र इत्यादी राज्ये दक्षिणेकडील द्रविड भाषासमूहामध्ये येतात तेथे वडर (वड्ड) जमातीची भाषा तेलगू आहे. जमातींच्या स्थलांतराच्या कालखंडात प्रादेशिक भाषांचा विकास झालेला असून तेलगु भाषेच्या प्रवाहात प्रादेशिक भाषेच्या अनुषंगाने वडारी भाषेचा विकास झालेला दिसुन येतो.

सिंध, हरियाणा, पंजाब, मध्यप्रदेश, दिल्ली आणि राजस्थान या प्रांतांमध्ये ओडकी (Oadki) भाषा प्रामुख्याने बोलली जाते. पंजाब, पाकिस्तान या भागातील वडर पंजाबी बोलतात तर हरियाणा मधील वडार हरयान्वी भाषेचा वापर करतात.

पुस्तके[संपादन]

ओड्र-वडार समाजावर लिहिलेल्या साहित्यात या जातीतील लेखकांनी लिहिलेले साहित्यही आहे.

1) वडर समाज आणि संस्कृती 

लेखक- सतिश पवार 

2) वडर समाज

इतिहास आणि संस्कृती

लेखक- भिमराव चव्हाण  

3)वडार समाज

समाजशास्त्रीय अभ्यास

लेखक- विनायक लष्कर   

4) वडार समाज

लेखक- दिपक पुरी

5) वडार समाज परंपरा व इतिहास

लेखक - टी.एस.चव्हाण