उषा देशमुख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


डॉ. उषा माधव देशमुख या मराठी लेखिका आहेत. त्या मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या विभागप्रमुख होत्या. त्यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील (खानदेश) अंमळनेर येथे झाला. इ.स. १९५२ साली त्यांचा विवाह विदर्भातील समीक्षक-नाटककार प्रा. मा.गो. देशमुख यांच्याशी झाला. उमरखेडला प्राध्यापक असलेले देशमुख स्त्रीशिक्षणाविषयी कमालीचे दक्ष होते. त्यांनी केवळ  मॅट्रिक असलेल्या आपल्या पत्नीला उच्चशिक्षण घ्यायला लावले. नंतरची दहा वर्षे रौप्यपदके मिळवत पीएच.डी. केलेल्या उषाताई प्राध्यापक झाल्या आणि पुढे त्यांनी ४० वर्षे अध्यापन केले.

मा.गो. देशमुख मुंबई विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर उषाताईसुद्धा मुंबईत आल्या. विशेष म्हणजे, या दोघांनीही या विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुखपद भूषवले.

लग्नानंतर मागोंच्या सहवासात उषाताईंना मराठी साहित्यात खूप रस निर्माण झाला. त्यांच्यावर बालपणापासून संतसाहित्याचे संस्कारही होते. त्या सगळ्यांचा परिपाक म्हणून उषाताईंनी ज्ञानेश्वरी उलगडण्याचा अभ्यासपूर्वक प्रयत्न केला आणि ज्ञानेश्वरीसंबंधी अनेक पुस्तके लिहिली.

प्राचीन मराठी साहित्याचा अभ्यास आणि साहित्य संशोधन व साहित्य समीक्षा हे त्यांच्या अभ्यासाचे क्षेत्र राहिले. आधुनिक मराठी कवितेचा अभ्यास हाही त्यांच्या विशेष आवडीचा विषय आहे. उषाताईंनी प्राचीन व अर्वाचीन वाङमय, संत साहित्य, संशोधन व समीक्षा, असे सर्व प्रकार लेखनात हाताळले आहेत. संतसाहित्यावरची त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. संतांची लोकशिक्षणविषयक भूमिका, त्यांचा भक्तिविषयक दृष्टिकोन, संतांची शिकवण या सर्व गोष्टींची उकल त्यांनी त्यांच्या साहित्यातून केली आहे.

जगभरात ठिकठिकाणी झालेल्या जागतिक मराठी साहित्य परिषदेत त्यांनी व्याख्याने दिली आहेत. केवळ राज्यातीलच नाही, तर शेजारच्या राज्यातील मराठी अभ्यास मंडळांशी त्यांचा घनिष्ठ संबंध राहिला आहे. बडोदा विद्यापीठात त्यांनी मराठी अभ्यास मंडळाच्या सदस्य म्हणून काम केले आहे.

पुस्तके[संपादन]

 • अवघी दुमदुमली पंढरी
 • कुसुमाग्रज साहित्यदर्शन (१९८९)
 • काव्यदिंडी
 • गर्जा जयजयकार! एक जागरण (१९८७, संपादित)
 • चाफा ते फुलवात
 • दीपमाळ
 • मराठी नियतकालिकांचा वाङ्‍मयीन अभ्यास खंड २ (संपादन)
 • मराठी संशोधन विद्या
 • मराठी साहित्याचे अदिबंध
 • रामायणाचा आधुनिक साहित्यावरील प्रभाव
 • वाङ्मयीन व्यक्ती
 • साहित्यतोलन
 • साहित्य शोधणी
 • ज्ञानेश्वरी एक शोध
 • ज्ञानेश्वरी चिंतन
 • ज्ञानेश्वरी जागरण
 • ज्ञानेश्वरी विलसिते

सन्मान[संपादन]

 • विदर्भ साहित्य संघाच्या पुसदला झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद (१९८९)
 • विदर्भ साहित्य संघाच्या २ऱ्या लेखिका संमेलनाचे अध्यक्षपद (जानेवारी १९८४)
 • ‘पुढचं पाऊल ट्रस्ट’, ‘भरारी प्रकाशन’ आणि ‘ऋजुता फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने १३ नोव्हेंबर २०१६ रोजी दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे झालेल्या एका राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनात मिळालेला पुरस्कार
 • महाराष्ट्र सरकारचा २०१६ सालचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार.