इकेबाना
इकेबाना(生け花) हा आशिया खंडातल्या जपान देशातील पुष्परचनेचा कलाप्रकार आहे. याला कादो (華道) असेही म्हणतात. इकेबानाचा अर्थ फुलांच्या जीवनाची काळजी घेणे किंवा फुलांची मांडणी असा आहे.[१]
इतिहास
[संपादन]इकेबाना हा पुष्परचना प्रकार इसवी सनाच्या सातव्या शतकापसून अस्तित्वात आला आहे. वेदी किंवा देवपूजेच्या जागी मांडण्यात आलेली पुष्परचना असे याचे प्रारंभीचे स्वरूप होते.त्यानंतर मात्र घरातील जागा सुशोभित करण्यासाठी ही पुष्परचना केली जाऊ लागली.
जपानमध्ये आलेल्या पाहुण्यांना चहा देणे ही आदराची आणि कलेची परिसीमा मानली जातें. असा चहा तयार करणे यात सौंदर्यशास्त्राचे अधिष्ठान आहे असेही जपानी संस्कृतीत मानले जाते.बौद्ध धर्माच्या प्रभावातून चहा देण्याच्या या परंपरेला आध्यात्मिक अधिष्ठानही मिळाले.[२] आध्यात्मिक गुरूंनी इकेबाना या पुष्परचनेचा प्रसार सोळाव्या शतकापासून मोठ्या प्रमाणात केला.
धार्मिक महत्त्व
[संपादन]जपानमधील शिंटो धर्मात निसर्गाचे महत्त्व विशेष आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला घराच्या दारासमोर केलेली पाना-फुलांची सजावट ही पूर्वजांचे स्वागत आणि नव्या पिकांचे स्वागत अशा दुहेरी हेतूने केली जाते. बुद्ध मूर्तीपुढे ठेवण्यात येत असलेल्या तीन महत्त्वाच्या वस्तूंमध्ये मेणबत्त्या, उदबत्त्या आणि फुलदाणीत ठेवलेली फुले यांचा समावेश होतो.[३] चीनमधून जपान मध्ये प्रवेश केलेल्या बौद्ध धर्मातून प्रसारित झालेल्या पुष्परचना संकल्पनेत चीन आणि जपान यांचे तत्त्वज्ञानही एकत्रितपणे समाविष्ट झाले.फुलांचे विशिष्ट आकार, फुलदाणीची रचना व आकार यातून फुलांचे नैसर्गिक आयुष्य अधिक कला टिकून राहील याची काळजी घेतली गेली. चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही शक्तींन नियंत्रित करणारी आखणी या रचनेत समाविष्ट केली गेली. फुलांचे रंग, पोत आणि व्यक्तीची मानसिकता यांचाही विचार यामध्ये केला गेला आहे. शब्दातून भावना पोचविण्यापेक्षा पुष्परचनेतून पाहणा-या व्यक्तीपर्यंत भावना पोचविणे असाही विचार यामध्ये आहे. उदा. लाल रंगाची फुले ही निधनानंतर वापरली जातात पण तीच फुले अग्नीचे प्रतीक म्हणूनही येतात. सम संख्येतील फुलांपेक्षा विषम संख्येतील फुले ही जास्त भाग्य्दायी मानली जातात.[४]
साहित्यिक महत्त्व
[संपादन]जपानी भाषेतील वाका या काव्यप्रकारात अनेक कविता या फुला-पानांवर आधारित आहेत. इसवी सनाच्या सातव्या शतकापासून अकराव्या शतकापर्यंत अशा चारही ऋतूंमधील फुलांवर आधारित कवितांची निर्मिती झालेली दिसून येते.
संकल्पनेचा विकास
[संपादन]सहाव्या शतकाच्या दरम्यान जपान व कोरिआमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाला. चीनमध्ये बुद्धाच्या पूजेसाठी फुलांचा वापर करण्याची पद्धती चीन मधील पुरोहितांनी विकसित केली. बुद्धाला कमळाचे फूल अर्पण करणे हा त्यातील महत्त्वाचा भाग होता.[५] देवाला फूल अर्पण करणे किंवा पुष्पदाणीत फुले ठेवून सजविणे एवढाच याचा भाव होता. शिन-नो-हाना या नावाने प्रथम अशी व्यवस्थित शिस्तबद्ध पुष्परचना साकारली गेली. मध्यभागी पाईनची रचना आणि त्यात पाच-सहा फुले असे याचे प्रारंभीचे स्वरूप होते.
प्रशिक्षण
[संपादन]जपानमध्ये इकेबाना क्लाप्रकाराचा विकास झाल्यानंतर त्याचे प्रशिक्षण देणारे वर्ग सुरू करण्यात आले. इकेबाना तंत्राचे पद्धतशीर मार्गदर्शन करणारी गुरू शिष्य परंपरा तेथे सुरू झाली.[६] या जोडीने कुटुंबातील मागील पिढीने पुढील पिढीला ही कला शिकविणे हे ही जपानमध्ये पहायला मिळते.
पुष्परचना आणि प्रकार
[संपादन]- कुगे(供華) या नावाने प्राथमिक स्वरूपात हिरव्या फांद्या आणि फुलांच्या कांड्या वापरून केला जाणारा हा प्रकार विकसित होत जाऊन त्यात विविधता आणि नाविन्य आले. पंधराव्या शतकात या कलेचे मार्गदर्शन करणारी पुस्तके लिहिली गेली आणि विशिष्ट नियमात ही पुष्परचना कला बांधली गेली.
- रिका (立花) या रचना प्रकारात बौद्ध तत्त्वज्ञान आणि निसर्गातील सौंदर्यस्थळे यांचे मिश्रण केले गेले. नऊ निसर्ग तत्त्वांची प्रतीके असलेली नऊ फुले यात वापरली जातात.[७]
- नागेराबाना(投入花) प्रकारात मुक्त रचनेला वाव असतो.
- शोका(生花) प्रकारात स्वर्ग, पृथ्वी आणि मानव यांची प्रतीके म्हणून रचना केली जाते.[८]
- मोरीबाना(盛花) प्रकारात टोपली किंवा तत्सम साधनात फुले मांडली जातात.
- जियुका(自由花) प्रकारात फुलांच्या नैसर्गिक आणि मुक्त मांडणीला वाव दिला जातो.[९]
संदर्भ
[संपादन]- ^ The Modern Reader's Japanese-English Character Dictionary, Charles E. Tuttle Company, ISBN 0-8048-0408-7
- ^ Sadler, A. L. (2011-12-20). Japanese Tea Ceremony: Cha-No-Yu (इंग्रजी भाषेत). Tuttle Publishing. ISBN 978-1-4629-0359-7.
- ^ "History of Ikebana | IKENOBO ORIGIN OF IKEBANA". www.ikenobo.jp (इंग्रजी भाषेत). 2018-11-18 रोजी पाहिले.
- ^ Kubo, Keiko (2013-05-21). Keiko's Ikebana: A Contemporary Approach to the Traditional Japanese Art of Flower Arranging (इंग्रजी भाषेत). Tuttle Publishing. ISBN 9781462906000.
- ^ "History of Ikebana – IKENOBO ORIGIN OF IKEBANA". www.ikenobo.jp. Archived from the original on 10 December 2016.
- ^ Averill, Mary. "Japanese flower arrangement". Archived from the original on 13 September 2017 – via Wikisource.
- ^ 第三版,日本大百科全書(ニッポニカ), デジタル大辞泉,大辞林. "砂の物(スナノモノ)とは - コトバンク". コトバンク (जपानी भाषेत). 2018-11-18 रोजी पाहिले.
- ^ "生花正風体、生花新風体とは|いけばなの根源 華道家元池坊". www.ikenobo.jp. Archived from the original on 4 October 2017.
- ^ "自由花とは|いけばなの根源 華道家元池坊". www.ikenobo.jp. Archived from the original on 4 October 2017.