अंकुल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पहा अंकोल वनस्पतीशास्त्रीय नाव: Alangium salviifolium
कुळ: Alangiaceae
नाम:- (सं.) अंकोट; (हिं.) ढेरा; (बं.) धलाकुर, धलाआंक्रा; (उरिया) अंकुल; (कोळ) अंकोल; (संताल) देल; (गु.) अंकोल; (ता.) अंकोलम्; (क.) अंकोलेमर; (ते.) अंकोलमु; (तु.) अंकोलेद.

अंकुल वृक्ष

वर्णन[संपादन]

अंकुलाचा जंगली वृक्ष बराच मोठा व सुबक असतो. हा भारतात बहुतेक ठिकाणी आढळतो. पल्ल्वी बाराही महिने असते, परंतु फुले येण्याच्या सुमारास पाने गळतात. काटे असलेल्या व काटेविरहित अशा दोन्ही जाति आहेत. फांद्या वेड्यावाकड्या असतात; साल राखी रंगाची, जाड व खडबडीत असते; मूळ जड, पिवळे, तेलकट व टणक असते; मुळाची साल दालचिनीपेक्षा जरा उदी रंगाची असते; पाने बोटभर रुंद व कण्हेरीच्या पानासारखीं लांबट असून त्यांवर ढोबळ शिरा असतात; फुले शुभ्र, सुवासिक व झुबक्यांनी येतात; फळे तांबूस जांभळ्या रंगाची व बोराएवढी; गोलाकार असतात. बियांपासून तेल निघते. मुळाची साल, पाने व बियांचे तेल औषधांत वापरतात. रूचि कडू, वास किळसवाणा असतो.

रसशास्त्र[संपादन]

मुळांत फार कडू द्रव्य आहे. हे दारूंत मिसळते, परंतु पाण्यांत मिसळत नाही.[ संदर्भ हवा ][ दुजोरा हवा]

गुण[संपादन]

अंकोलाच्या मुळाची साल कडू व उष्ण आहे. तिची प्रत्यक्ष क्रिया पचननलिकेच्या श्लेष्मलत्वचेवर व त्वचेवर होत असते. लहान प्रमाणांत दिल्यास आमाशयाची व आंतड्याची शक्ति वाढते, पित्तस्त्राव बरा होतो, शौचास साफ होते, जराशी मळमळ होऊन कफ ढिला होतो, त्वचा ओली होते व त्वचेची विनिमयक्रिया सुधारते. हे अंकोलाचे धर्म रूईसारखे आहेत. मोठ्या प्रमाणांत दिल्यास उलटी होते व पाण्यासारखे कफ व पित्तमिश्रित जुलाब होतात. जुलाब होतानां लघवीचे थोडेबहुत प्रमाण वाढते. अंकोलाने निःसंशय उलटी होते खरी, तरी ह्याची वामक द्रव्यांत गणना करू नये व वामक म्हणून वापरू नये. वांति होण्याकरिता अंकोल मोठ्या मात्रेंत द्यावे लागते व अशा मात्रेंत दिले तरी वांति होण्यास वेळ लागतो. वांति होत असतांना व झाल्यानंतर ह्रदय व रक्तवाहिन्या ह्यांस बराच थकवा व शिथिलता येते. आमाशयाच्या श्लेष्मलत्वचेवर वांतीचे वेळी ह्याची प्रत्यक्ष क्रिया होत असल्याकारणाने तेथे दाह होतो व केव्हां केव्हां शोथहि उत्पन्न होतो. ह्या क्रियेवरून अंकोल हे मोठ्या मात्रेंत वापरता येत नाही हे स्पष्ट होते. हे दोष रूईत नाहीत. अंकोल विषारावर वापरतात. सर्पविष व उंदराचे विष यांत अंकोलाची स्तुति केली आहे.

अंकुल फळे।thumb
अंकुल फळे।thumb

अंकोल स्वेदजनन, शोथन (त्वग्दोषहर) आनुलोमिक व विषहर आहे. यांत कासहर हा विशेष धर्म आहे व दाहजनक आणि वामक हा त्याचा दोष आहे. मात्रा:- मुळाची साल १ ते ३ गुंजाप्रमाणे दिल्यास घाम सुटतो, मळमळ्ते व कफ ढिला होतो. १ वाल दिली असता ढाळ होतात; २० ते २५ गुंजा दिली असतां उलटी होते; सर्पविषारांत २० गुंजाप्रमाणे देतात. अंकोलाचे अनुपान तांदळाची पेज किंवा धुवण आहे.

उपयोग[संपादन]

अंकोलाच्या मुळाची साल रूईप्रमाणे सर्व तऱ्हेच्या त्वग्रोगांत वापरतात. उपदंश, रक्तपित्ती, अंगावर मोठाले लाल रंगाचे चट्टे उठणे, चाई व व्रण ह्या रोगांत १/२ ते १ गुंज या प्रमाणाने दिवसांतून तीन वेळा देतात आणि बियांचे तेल किंवा मूळ उगाळून लावितात. अशा लहान मात्रेंत अंकोल बरेच दिवस द्यावा लागतो.

  1. अंकोलाच्या मुळाची साल रूईप्रमाणे सर्व तऱ्हेच्या त्वग्रोगांत वापरतात. उपदंश, रक्तपित्ती, अंगावर मोठाले लाल रंगाचे चट्टे उठणे, चाई व व्रण ह्या रोगांत १/२ ते १ गुंज या प्रमाणाने दिवसांतून तीन वेळा देतात आणि बियांचे तेल किंवा मूळ उगाळून लावितात. अशा लहान मात्रेंत अंकोल बरेच दिवस द्यावा लागतो.
  2. सर्दी, मोड्या ताप (एन्फ्लुएन्झा) किंवा सांधे दुखून येणारा ताप (डेंग्यु) ह्यांत अंकोलाचे मूळ वेखंड किंवा सुंठीबरोबर पेजेंत उकडून देतात आणि पाने ठेचून व जराशी गरम करून वायूने दुखत असलेल्या भागावर बांधतात.
  3. यकृदुदर, जलोदर व मूत्रपिंडोदर ह्यांत अंकोलाच्या मुळाची साल १ वाल प्रमाणाने देतात. ह्याने ढाळ होतात व यकृताची क्रिया सुधारते. ह्या रोगांत लघवीचे प्रमाण जास्त वाढण्यासाठी काळ्या तिळाच्या झाडाचा क्षार अथवा जवखार अंकोलाबरोबर दिल्यास चालतो. कबज आणि जंत असल्यास याचा उपयोग करितात
  4. उंदराचे विषारावर अंकोल हे उत्तम औषध आहे असे गुजराथेंतील वैद्य मानतात. सर्पविषारांतहि याचा उपयोग करतात.

संदर्भ[संपादन]

  • ओषधीसंग्रह- डॉ. वा. ग. देसाई