आर्थर फिलिप
आर्थर फिलिप (ऑक्टोबर ११, इ.स. १७३८:लंडन - ऑगस्ट ३१, इ.स. १८१४:बाथ, इंग्लंड) हा ब्रिटिश आरमारी अधिकारी आणि ऑस्ट्रेलियातील पहिल्या युरोपीय वसाहतीचा राज्यपाल होता.
आरमारी सेवा
[संपादन]आर्थर हा एलिझाबेथ व जेकब फिलिपचा मुलगा होता. थोडेसे शालेय शिक्षण घेतल्यावर तो वयाच्या १३व्या वर्षी जहाजावर प्रशिक्षणासाठी गेला. पंधराव्या वर्षी तो ब्रिटिश आरमारात दाखल झाला. या काळात त्याने मिनोर्काच्या लढाईत भाग घेतला. युद्ध संपल्यावर त्याने हॅंपशायरमध्ये शेती पत्करली. इ.स. १७७४मध्ये तो पोर्तुगीझ आरमारात कॅप्टन म्हणून रुजू झाला व स्पेनविरूद्ध लढाईत लढला. इ.स. १७७८मध्ये ईंग्लंडने फ्रांसशी युद्ध पुकारले व फिलिपला परत बोलावले. इ.स. १७७९मध्ये त्याला स्वतःचे जहाज (बेसिलिस्क) मिळाले. इ.स. १७८४त पुन्हा तो हॅम्पशायरला गेला.
न्यू साउथ वेल्स
[संपादन]इ.स. १७८६मध्ये आपल्या शेजाऱ्याच्या मदतीने त्याने न्यू साउथ वेल्सचे राज्यपालपद व सिरियस नावाचे जहाज मिळवले. ब्रिटिश सरकारने याबरोबर त्याला ७७८ कैदी व काही शिपाई देउन नवीन देश वसवण्याचा आदेश दिला. आठ महिन्यांनी जानेवारी २६, इ.स. १७८८ रोजी तो सध्याच्या सिडनी येथे पोचला व तेथे शहर स्थापले. अनेक खडतर प्रसंगांना तोंड देउन त्याने ही वसाहत यशस्वी केली.
इ.स. १७९३च्या मे महिन्यात तो परत लंडनला गेला व निवृत्ति स्वीकारली. त्यानंतरचा काल त्याने समुद्रकिनाऱ्यावर बाथ येथे घालवला.