Jump to content

अशोक रामचंद्र केळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ.अशोक रामचंद्र केळकर (जन्म : पुणे, २२ एप्रिल १९२९ - २० सप्टेंबर, २०१४) हे एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषावैज्ञानिक, साहित्याचे जाणकार समीक्षक आणि संस्कृतीचे सखोल अभ्यासक होते. मराठी अभ्यास परिषदेचे जवळपास २५ वर्षे अध्यक्ष, आणि मराठी अभ्यास परिषदेचे त्रैमासिक ’भाषा आणि जीवन’चे पहिले ६ वर्षे संपादक होते.

शैक्षणिक कारकीर्द

[संपादन]

अशोक केळकर यांचे शालेय शिक्षण पुण्यातील रमणबागेतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी इंग्लिश व फ्रेंच या विषयांत पदवी प्राप्त केली. व्याकरणाची आवड आणि भाषिक प्रश्नांबद्दलच्या कुतूहलामुळे ते भाषाविज्ञानाच्या अभ्यासाकडे वळले. रॉकफेलर आणि लिली या प्रतिष्ठानांतर्फे अनुक्रमे भाषाविज्ञान (१९५६ - ५८) आणि मानववंशशास्त्र (१९५८) यांच्या अभ्यासासाठी त्यांना छात्रवृत्ती मिळाली. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात सुप्रसिद्ध भाषावैज्ञानिक Charles F. Hockett यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी The Phonology and Morphology of Marathi या विषयावर प्रबंध लिहिला आणि पीएच.डी. प्राप्त केली.

अशोक केळकर यांनी आग्रा विद्यापीठात १९५३-५६ आणि १९५८-६२ या कालावधीत इंग्रजी आणि भाषाविज्ञानाचे अध्यापन केले. १९६२-६७ दरम्यान, ते पुणे विद्यापीठात प्रपाठक होते. १९६७-८९ दरम्यान, ते पुण्यातील डेक्कन कॉलेजात भाषाविज्ञानाचे प्राध्यापक होते. तेथील Centre for Advanced Studies in Linguistics चे ते संचालकही होते.

अशोक केळकर यांचे एम. फिल आणि पीएच.डी. पदवीसाठी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

आंतरराष्ट्रीय कारकीर्द

[संपादन]

जगातील विविध देशांमध्ये झालेल्या भाषाविषयक चर्चासत्रांमध्ये अशोक केळकर सहभागी होत असत. भारत, कॅनडा, फ्रान्स, इराण आणि रशियातील विविध विद्यापीठे, शैक्षणिक संस्था आणि सरकारी संस्थांसाठी त्यांनी सल्लागार म्हणून भूमिका बजावली. अशोक केळकरांनी सोस्यूर, स्पीकर, याकोबसन, चॉम्स्की इत्यादी भाषावैज्ञानिकांच्या विचारांचा परिचय मराठी भाषिकांना कसा होईल, याकडे लक्ष दिले.

सामाजिक कार्यातला सहभाग

[संपादन]

अशोक केळकर हे महाराष्ट्र साहित्य परिषद, लिंग्विस्टिक सोसायटी ऑफ इंडिया, नृत्यभारती कथ्थक नृत्य अकादमी (पुणे), सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश ॲन्ड फॉरिन लॅंग्वेजिज्, मराठी अभ्यास परिषद, राज्य मराठी विकास संस्था, अशा विविध संस्थांच्या माध्यमातून ते तज्ज्ञ किंवा पदाधिकारी म्हणून कार्यरत होते.

लेखन

[संपादन]

अशोक रा. केळकर यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांतून त्यांनी साहित्यसिद्धान्त, चिन्हभाषाशास्त्र व भाषा तत्त्वज्ञान या विषयांवर लेखन केले आहे.

केळकरांची १५०हून अधिक संशोधनपत्रे, लेख, मुलाखती व पुस्तके प्रसिद्घ झाली आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील त्यांचे लिखाण कन्नड, बंगाली, गोंडी, फ्रेंच, कोकणी, ओरिया आणि गुजराती भाषांत भाषांतरित झाले आहे. इंग्रजी, फ्रेंच, हिंदी, जर्मन, पोलिश, स्पॅनिश, तेलुगू, मल्याळम आणि रशियन या भाषांतील साहित्य त्यांनी मराठीत आणले आहे.

अशोक रा. केळकर यांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • कवितेचे अध्यापन
  • त्रिवेणी
  • द फोनॉलॉजी अँड मॉरफॉलॉजी ऑफ मराठी (इंग्रजी पुस्तक-१९५९).
  • प्राचीन भारतीय साहित्यमीमांसा (१९७९)
  • प्रोलेगोमेना टु ॲन अंडरस्टॅन्डिंग ऑफ सेमिऑसिस अँड कल्चर (इंग्रजी पुस्तक -१९८०)
  • भेदविलोपन : एक आकलन (१९९५)
  • मध्यमा :भाषा आणि भाषाव्यवहार (१९९६)
  • मराठी भाषेचा आर्थिक संसार (१९७८)
  • रुजुवात
  • वैखरी : भाषा आणि भाषाव्यवहार (१९८३)
  • स्टडीज इन हिंदी-उर्दू : इन्ट्रॉडक्शन अँड वर्ड फोनॉलॉजी (इंग्रजी पुस्तक -१९५८)

पुरस्कार

[संपादन]

अशोक केळकर यांच्या नावाचे पुरस्कार

[संपादन]
  • डॉ. अशोक केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र सरकार दरवर्षी भाषाअभ्यासक पुरस्कार देते. २०१७ सालचा अविनाश बिनीवाले यांना तर २०१८ सालचा पुरस्कार डॉ.कल्याण काळे यांना मिळाला आहे.
  • २०१६ सालचा पुरस्कार व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख यांना.
  • २०२२ सालचा पुरस्कार मराठी अभ्यास परिषदेला देण्यात आला.[]

बाहय दुवे

[संपादन]

डॉ. अशोक केळकर यांचे निधन - महाराष्ट्र टाइम्स Archived 2015-06-18 at the Wayback Machine.

भाषेची मर्मदृष्टी देणारा विचारवंत - सकाळ Archived 2014-09-23 at the Wayback Machine.

आंतरराष्ट्रीय भाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर यांचे निधन - लोकसत्ता

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "परिषद वार्ता". भाषा आणि जीवन. वर्ष ४०, अंक ०३ : पावसाळा २०२२.