अशोक रामचंद्र केळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ.अशोक रामचंद्र केळकर (जन्म : पुणे, २२ एप्रिल १९२९; - २० सप्टेंबर, २०१४) हे एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषावैज्ञानिक आणि साहित्य समीक्षक होते. मराठी अभ्यास परिषदेचे ते सुमारे ७ वर्षे अध्यक्ष, आणि त्यांचे मुखपत्र ’भाषा आणि जीवन’चे प्रमुख संपादक होते.

शैक्षणिक कारकीर्द[संपादन]

अशोक रा. केळकर यांचे शालेय शिक्षण पुणे शहराच्या रमणबागेतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. व्याकरणाची आवड आणि भाषिक प्रश्नांबद्दलच्या कुतूहलामुळे ते भाषाविज्ञानाच्या अभ्यासाकडे वळले. फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी तत्वज्ञान आणि इंग्लिश या विषयांची पदवी प्राप्त केली. रॉकफेलर आणि लिली या प्रतिष्ठानांतर्फे अनुक्रमे भाषाविज्ञान (१९५६ - ५८) आणि तौलनिक साहित्य व समीक्षा (१९५८) यांच्या अभ्यासासाठी त्यांस छात्रवृत्त्या मिळाल्या होत्या.

अशोक रा. केळकर यांनी प्रारंभीच्या काळात त्यांनी आग्रा विद्यापीठात १९५८-६२ या कालावधीत भाषाशास्त्राचे अध्यापन केले. १९६२-६७ दरम्यान ते पुणे विद्यापीठात रीडर होते. पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी १९६७-८९. दरम्यान भाषाशास्त्र विषयाचे साहाय्यक प्राध्यापक म्हणून, काम केले. त्या कॉलेजातील ’सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड स्टडी इन लिंग्विस्टिक्स’चे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून अशोक केळकरांनी भाषाविज्ञान व मानववंशशास्त्र (लिंग्विस्टिक्स विथ ॲन्थ्रॉपॉलॉजी) या विषयात पीएच.डी.केली आहे.

अशोक रा. केळकर हे भाषाविज्ञानामध्ये एम.फिल. आणि पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत.

आंतरराष्ट्रीय कारकीर्द[संपादन]

अमेरिका, नेपाळ, ऑस्ट्रिया, जर्मनी, इंग्लंड, पोर्तुगाल, रशिया, कॅनडा, अशा अनेक देशांमध्ये झालेल्या भाषेशी संबंधित चर्चासत्रांमध्ये अशोक केळकर सहभागी होत असत. शिक्षक, मार्गदर्शक आणि संशोधक या भूमिकांमध्ये न अडकता त्यांनी भाषेशी संबंधित विविध क्षेत्रांचा अभ्यास करून, त्यावर लिखाण केले. भाषा आणि सांकेतिक सिद्धान्त, साहित्य आणि कलेतील समस्या, भाषेचा शास्त्रीय अभ्यास, भाषीय समस्या, यांवर केळकरांनी वारंवार प्रकाश टाकला.

सामाजिक कार्यातला सहभाग[संपादन]

अशोक रा. केळकर हे महाराष्ट्र साहित्य परिषद, लिंग्विस्टिक सोसायटी ऑफ अमेरिका, नित्यभारती कथ्थक नृत्य अकादमी (पुणे), सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश ॲन्ड फॉरिन लॅंग्वेजेस, मराठी अभ्यास परिषद, राज्य मराठी विकास संस्था, अशा विविध संस्थांच्या माध्यमातून ते कार्यरत होते. भारत, कॅनडा आणि रशियातील विविध विद्यापीठे, शैक्षणिक संस्था आणि सरकारी संस्थांसाठी त्यांनी सल्लागार म्हणून भूमिका बजावली. सध्या अस्तित्वात असलेली १०+२+३ या शिक्षणपद्धतीची शिफारस केळकरांनीच शिक्षण समितीकडे केली होती.

लेखन[संपादन]

अशोक रा. केळकर यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांतून त्यांनी साहित्यसिद्धान्त, चिन्हभाषाशास्त्र व भाषा तत्त्वज्ञान या विषयांवर लेखन केले आहे.

केळकरांची १५०हून अधिक संशोधनपत्रे, लेख, मुलाखती व पुस्तके प्रसिद्घ झाली आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील त्यांचे लिखाण कन्नड, बंगाली, गोंडी, फ्रेंच, कोकणी, ओरिया आणि गुजराती भाषांत भाषांतरित झाले आहे. इंग्रजी, फ्रेंच, हिंदी, जर्मन, पोलिश, स्पॅनिश, तेलुगू, मल्याळम आणि रशियन या भाषांतील साहित्य त्यांनी मराठीत आणले आहे.

अशोक रा. केळकर यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • कवितेचे अध्यापन
  • त्रिवेणी
  • द फोनॉलॉजी ॲन्ड मॉरफॉलॉजी ऑफ मराठी (इंग्रजी पुस्तक-१९५९).
  • प्राचीन भारतीय साहित्यमीमांसा (१९७९)
  • प्रोलेगोमेना टु ॲन अंडरस्टॅन्डिंग ऑफ सेमिऑसिस ॲन्ड कल्चर (इंग्रजी पुस्तक -१९८०)
  • भेदविलोपन : एक आकलन (१९९५)
  • मध्यमा :भाषा आणि भाषाव्यवहार (१९९६)
  • मराठी भाषेचा आर्थिक संसार (१९७८)
  • रुजुवात
  • वैखरी : भाषा आणि भाषाव्यवहार (१९८३)
  • स्टडीज इन हिंदी-उर्दू : इन्ट्रॉडक्शन ॲन्ड वर्ड फोनॉलॉजी (इंग्रजी पुस्तक -१९५८)

पुरस्कार[संपादन]

अशोक केळकर यांच्या नावाचे पुरस्कार[संपादन]

  • डॉ. अशोक केळकर यांच्या नावाने महाराष्ट्र सरकार दरवर्षी भाषाअभ्यासक पुरस्कार देते. २०१७ सालचा अविनाश बिनीवाले यांना तर २०१८ सालचा पुरस्कार डॉ.कल्याण काळे यांना मिळाला आहे.
  • २०१६ सालचा पुरस्कार व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख यांना.
  • २०२२ सालचा पुरस्कार मराठी अभ्यास परिषदेला देण्यात आला.[१]

बाहय दुवे[संपादन]

डॉ. अशोक केळकर यांचे निधन - महाराष्ट्र टाइम्स

भाषेची मर्मदृष्टी देणारा विचारवंत - सकाळ Archived 2014-09-23 at the Wayback Machine.

आंतरराष्ट्रीय भाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर यांचे निधन - लोकसत्ता

संदर्भ[संपादन]

  1. ^ "परिषद वार्ता". भाषा आणि जीवन. वर्ष ४०, अंक ०३ : पावसाळा २०२२.