Jump to content

कला प्रकाश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कला प्रकाश (०२.०१.१९३४-०५.०८.२०१८). स्वातंत्रोत्तर कालखंडात सिंधी साहित्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लेखिका. कथा, कादंबरी आणि काव्यक्षेत्रात त्यांनी विपुल लेखन केले आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सिंधी समाज आपले मूळ शोधण्याचा संघर्ष करीत असताना कला प्रकाश यांचे लेखन सुरू होते. स्थलांतर या घटनेपोटी सिंधी समाजाला आलेली परात्मता लक्षात घेऊन “संपूर्ण मानव जातीच्या भविष्यासाठी चालू असलेला संघर्ष ” ह्या भावनेतून त्यांनी लेखन केले आहे. कला प्रकाश यांचा जन्म सध्या पाकीस्तानातील सिंध प्रांतातील कराची येथे झाला. फाळणीनंतर मुंबईला स्थायिक, प्रसिद्ध सिंधी लेखक, कवी आणि शिक्षणतज्ञ साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त डॉ . मोतीप्रकाश यांच्याशी १९५४ मध्ये त्यांचा विवाह झाला. १९७७ मध्ये दुबईला स्थायिक, २००२ मध्ये भारतात परत. प्राथमिक शिक्षण कराची येथे. माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत. थोडे दिवस सरकारी नोकरी केल्यानंतर अध्ययन या त्यांच्या आवडीच्या क्षेत्राकडे वळल्या.

प्रकाशित साहित्य

[संपादन]

कथासंग्रह

[संपादन]
  • मूर्क एईन ममतो (१९७३)
  • वरण मे गूल (१९९३)
  • इन्तेजार (२००८)

कादंबऱ्या

[संपादन]
  • हिकदिल हजार अरमान  (१९५७)
  • शिशे जी दिल  (१९६०)
  • हिक सपनो सूकान जो (१९७१)
  • हयाती ओठोन रे (१९७५)
  • वक्त विथून विचोथियून (१९८८)
  • आरशीया अडो (१९९२)
  • प्यार (१९९७), पकान जो प्रीत (१९९८)
  • समुंद ऐन किनारो (२००४)
  • अऊखा पंध प्यार झा (२०१०)

कवितासंग्रह

[संपादन]
  • ममता झून लहरून भाग-१, १९६३, भाग-२, २००६
  • जे हिमरे म्हंज हुरयान (१९८७)

‘दोही बे दोही’ ही कथा नई दुनिया या मासिकातून प्रसिद्ध प्रथम प्रकाशित झाली. ‘खाण व हान’ या लघुकथेमुळे यशस्वी लेखिका म्हणून त्यांना मान्यता मिळाली. या लघुकथेचे अनेक प्रादेशिक भाषेत भाषांतर झाले. सिंधी साहित्यातातील भावनिक परिपक्वता आणि अभिरुचीतील प्रामाणिकता असलेले लेखन म्हणून या कथेकडे पाहिले गेले. बेघर झालेल्या सिंधी जमातीची दोलायमान स्थिती आणि त्या जमातीसमोर आलेल्या अडचणी हा त्यांच्या सुरुवातीच्या लेखनाचा विषय राहिला.

आरशीया अडो  ही त्यांची कादंबरी सिंधी साहित्यातील महत्वाची कादंबरी ठरली. संवेदनशील आणि नाजूक विषयांची हाताळणी करणाऱ्या कला प्रकाश यांचे लेखन सर्व अभिरुची असलेल्या वाचकांसाठी असल्याने लेखिका म्हणून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. स्त्री या गौणपात्राला मुख्य पात्र करून मध्यमवर्गीय जीवनाचे चित्रण त्यांच्या साहित्यात आले. म्हणूनच स्वतःच्या उराशी स्वप्ने घेऊन एका अनोळखी प्रदेशात संघर्षमय प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनावर आधारलेल्या आरशीया अडो या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. थेट विषयाला हात घालणाल्या, पाल्हाळपणाला फाटा देणाऱ्या कला प्रकाश यांनी कथा , काव्य, कादंबरी यापलीकडे जाऊन चित्रकला, प्रवासवर्णन सारखे विषयही हाताळले. ममता झून लहरून या गद्य काव्यातून निष्पाप बालकाचे मन व त्याच्या प्रेमाला असलेला प्रतिसाद प्रकट केला आहे.

लालित्यपूर्ण शब्दरचना, अभिव्यक्तीतील शुद्धता सर्व समादेशक विचार आणि वैविध्यपूर्ण लेखनकौशल्य या गुणांमुळे कला प्रकाश यांचे साहित्य अद्वितीय ठरले आहे.

पुरस्कार

[संपादन]
  1. अखिल भारत सिंधी बोली अने साहित्य सभा अप्रीशियन सन्मान (१९६५)
  2. महाराष्ट्र साहित्य अकादमी पुरस्कार (१९९२)
  3. साहित्य अकादमी पुरस्कार (१९९४)
  4. ईश्वरो जीवतराम बुक्सानी अवार्ड (२००१)
  5. प्रियदर्शनी अकादेमी पुरस्कार (२०१०)
  6. सिंधी भाषा अकादेमी पुरस्कार (२०११) इत्यादी पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.

पतीसोबत साहित्य अकादमी मिळविणारे कला प्रकाश एकमेव दाम्पत्य, तर मुलगा श्रीकांत गझल काव्यप्रकारात नवे विचार आणि आधुनिक रुपकता आणणारे तरुण कवी आहेत.

मुंबई येथे त्यांचे निधन झाले आहे.