Jump to content

गायकवाडवाडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गायकवाडवाडा (केसरी वाडा)

गायकवाडवाडा हा महाराष्ट्राच्या पुणे शहरातल्या नारायण पेठेतील वाडा आहे. या वाड्यात बाळ गंगाधर टिळकांचे वास्तव्य होते. हा वाडा लोकमान्य टिळकांनी १९०५ साली विकत घेतला. केसरी व मराठा या वृत्ततपत्रांची कार्यालयेही या वाड्यात हलवली. टिळकांनी स्थापन केलेल्या केसरी वृत्तपत्राचे कार्यालयही याच वाड्यात आहे. याच वाड्याला टिळक वाडा अथवा केसरी वाडा असेही म्हणतात.

इतिहास

[संपादन]

बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बाळ गंगाधर टिळकांना हा वाडा विकत दिला. या वाड्यात येण्यापूर्वी लोकमान्य टिळक सरदार विंचूरकर वाड्यात वास्तव्य करत असत.

या वाड्यास जसा टिळकवाद्यांचा सहवास लाभला तसाच लोकमान्य टिळकांचे पुत्र हे सुधारणावादी आणि रविकिरण मंडळ यात आघाडीत असल्यामुळे सुधारणावादी चळवळी आणि काव्य वाचनांचाही लाभ झाला.

लोकमान्यांचा काळ

[संपादन]

इ.स. १९०५ पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा गणेश उत्सव होऊ लागला. लोकमान्य टिळकांची व्याख्याने तेथे होत असत.

समता संघाची स्थापना

[संपादन]

इ.स. १९२५ नंतर लोकमान्यांचे चिरंजीव श्रीधरपंत टिळक आंबेडकरांकडे ओढले गेले. त्यांच्या अनेक कार्यक्रमात श्रीधरपंत हजर असल्याचे उल्लेख बहिष्कृतमध्ये आहेत. महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहातही श्रीधरपंतांची शुभेच्छांची तार सर्वांत आधी वाचून दाखवण्यात आली होती. लोकमान्य टिळक यांचे पुत्र रामचंद्र आणि श्रीधर हे दोघे बंधू मुंबईस आले तर आंबेडकरांना भेटल्याशिवाय पुण्यास जात नसत. साहेब पुण्यास गेले तर साहेबांना गायकवाडवाड्यातील आपल्या राहात्या घरी घेऊन जाण्याचे ते प्रयत्न करीत. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होईल, असे त्यांना समजावून सांगून साहेब त्यांना परत पाठवीत.

इ.स. १९२५ साली प्रबोधनकार ठाकऱ्यांच्या पुण्यातील वास्तव्यात श्रीधरपंत टिळकांनी त्यांची पहिल्याच दिवशी भेट घेतली. त्या भेटीत मागास बहुजनसमाज आणि प्रामुख्याने अस्पृश्य समाज यांच्या उत्कर्षाविषयी आपली कळकळ त्यांनी मनमोकळी व्यक्त केली होती.

श्रीधरपंत टिळकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चवदार तळ्यावर सत्याग्रहात सहभाग घेतला होता. ८ एप्रिल, इ.स. १९२८ रोजी समता संघाची पुण्याची शाखा त्यांनी स्वतःच्या गायकवाड वाड्यात सुरू केली. उद्‌घाटनाकरिता स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर हजर होते.

समतासंघाच्या स्थापनेच्या वेळच्या त्या सहभोजनाच्या वेळी ग्रंथालयाच्या सभागृहात जेवणाच्या पंक्ती मांडल्या होत्या. दलित नेते पां.ना. राजभोज तेथे होते. श्रीधरपंतांनी टिळकवाड्यात समाजसमता संघाची स्थापना केल्यामुळे आणि सहभोजनाच्या कार्यक्रमामुळे पुराणमतवादी मंडळींना राग आला व त्यांनी अनेक तऱ्हेने श्रीधरपंतांना त्रास देण्यास सुरुवात केली. सहभोजनाच्या वेळी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. खोट्या अफवा उठवल्या गेल्या, पण गोड्या तेलाचे दिवे पेटवून डॉ. आंबेडकरांसह सहभोजन आनंदाने पार पडले.

टिळकांच्या वाड्यात अस्पृश्यांचा मेळा

[संपादन]

ब्राह्मणेतर मंडळींच्या पाठिंब्याने टिळकबंधू रामभाऊ आणि बापू मनात आणतील ते करत असल्यामुळे त्यांनी अस्पृश्यांचा मेळा गायकवाड वाड्यात आणू नये म्हणून वाड्याच्या ट्रस्टींनी दोन गोष्टी केल्या. पहिली ही अस्पृश्य मेळा वाड्यात आणू नये असा मनाई हुकूम बजावून घेतला. पण टिळक बंधूंनी असे हुकूम बेधडक झुगारून फेटाळण्याचा आणि परिणामांना तोंड देण्याचा धीटपणा अनेक वेळा दाखविला होता. तो अनुभव लक्षात घेऊन ट्रस्टींनी दुसरी एक शक्कल काढली. फौजदारी प्रतिबंधाला ठोकरून त्या पोरांनी मेळा आत घुसवलाच, तर निदान गणपतीबाप्पाला अस्पृश्यांच्या स्पर्श तरी होऊ नये, एवढ्यासाठी वाड्यातल्या गणपतीच्या मखराभोवती लोखंडी पिंजरा उभारून त्याला भलेभक्कम टाळे ठोकले. पण हे टाळेही फोडले तर? त्याचाही एक मनाई हुकूम ट्रस्टींनी मिळवून तो टिळक बंधूंवर बजावण्यासाठी बेलिफाला वाड्याच्या दरवाजावर आणून बसवला.

लोकमान्यांचा गणपती ट्रस्टींच्या तुरुंगात

[संपादन]

सकाळी एकदोन वेळा वाड्यात येऊन बेलिफाने रामभाऊनी बापू यांना नोटीस घेण्याबद्दल विनंती केली. दोघांनीही बाहेर बस, आत वाड्यात पाऊल टाकलेस तर याद राखून ठेव, असे धमकावून त्याला बाहेर घालवला. एकदा तर रामभाऊ त्याच्या अंगावर धावून गेले. सामोपचाराने बेलिफाला नोटीस लागू करता येणार नाही, असे दिसतातच, ट्रस्टींपैकी एकाने कोर्टाकडे धाव घेऊन खुद्द नाझरलाच वाड्यात आणले. त्यांनी टिळकबंधूंशी शक्य तितक्या सभ्यतेने आणि शांततेने चर्चा केली. हा प्रकार गणपतीच्या पिंजऱ्याजवळच चालला होता. रामभाऊंनी एक मोठा हातोडा सदऱ्याखाली लपवून आणला होता. नाझर साहेबांचा कायदेबाजीचा सगळा वेदान्त ऐकल्यावर रामभाऊ ठासून म्हणाला, अहो नाझर साहेब, आमच्या थोर वडिलांची सारी हयात तुमच्या सरकारने तुरुंगातच खतम केलीत ना? आता सहन होणार नाही, तुमची नोटीस ठेवा तुमच्या खिशात. आमचे काम हेच. असे म्हणून रामभाऊने ताडकन हातोड्याचा प्रहार करून पिंजऱ्याचे टाळे फोडले आणि सगळा पिंजरा उखडून दूर भिरकावून दिला. बिचारा नाझर काय करणार? आला तसा निमूट परत गेला.

याच दिवशी संध्याकाळी पांडोबा राजभोज यांचा अस्पृश्यांचा श्रीकृष्ण मेळा गायकवाड वाड्यात जाणार होता. वरील प्रकार झाल्यानंतर मेळा बरोबर आणल्याशिवाय पुन्हा इकडे फिरकू नकोस. मी आहे येथे खबरदार, असे बजावून रामभाऊने श्रीधरपंतांना प्रबोधनकार ठाकऱ्यांकडे जाऊन बसण्यास सांगितले. वाड्यात काय चालले आहे याची माहिती श्रीधरपंतांनी प्रबोधनकारांना दिली. श्रीधरपंत सबंध दिवस ठाकऱ्यांकडे बसलेले होते.

संध्याकाळी दिवेलागणी होताच श्रीधरपंत पुणे कॅंपात भोकरवाडीला गेला. रात्री ८ वाजता मेळ्याला घेऊन ते प्रबोधन कचेरीवर आले. तेथे सडकेवरच मेळ्याच्या गायनाचा कार्यक्रम झाला. कचेरी असलेल्या सदाशिव पेठेसारख्या ब्राम्हणी अड्डयात अस्पृश्यांच्या मेळ्याचा कार्यक्रम एक चमत्कारिक आकर्षणाची बाब होती. आजूबाजूला बघ्यांची खूप गर्दी जमली होती. मेळा तेथून गायकवाड वाड्यात जाणार असा सगळीकडे बोभाटा झालाच होता.

इकडे गायकवाड वाड्याच्या दरवाजावर दोन गोऱ्याया सार्जंटांच्या अधिपत्याखाली एक पोलिसपार्टी अडसरासारखी उभी होती. रामभाऊ वाड्याबाहेर दरवाजासमोर एकटाच शतपावली घालीत फिरत होता. आमच्याकडून एक सायकलस्वार ५-५, १०-१० मिनिटांनी तिकडे फेऱ्या घालून रामभाऊंच्या सूचना आणीत होता. खुशाल या, असा रामभाऊचा सिग्नल मिळताच मेळा गाणी गात वाड्याकडे निघाला. रस्त्यात बघ्यांची गर्दी होतीच. छत्रपती मेळ्याची मंडळीही वाड्यासमोर चंग बांधून तयार होती.

मेळा गात गर्जत वाड्याजवळ येताच बापू (श्रीधपंत टिळक) आणि रामभाऊ आघाडीला उभे राहिले. दरवाजाजवळ येताच पोलीसपार्टीने दरवाजाला आपले कूस घातले. एका सार्जंटाने दोन्ही हात पसरून 'यू कॅनॉट एंटर द वाडा' असा दम भरला. रामभाऊने एक मुसंडी मारून त्याला बाजूला सारले आणि पोलिसांची फळी फोडून तो आत घुसताच बरीच मंडळीही घुसली. त्या प्रचंड जनप्रवाहाला पाहून पोलीस आणि सार्जंट बाजूला झाले. मेळा गणपतीसमोर जाऊन थांबताच पद्य गायनाला जोरात सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास कार्यक्रम झाल्यावर, गुलाल प्रसाद वगैरे शिष्टाचार झाले आणि मेळा शांतपणे आला तसा बाहेर गेला. कार्यक्रम चालू असतानाही बिचारा कोर्टाचा बेलीफ दोन तीन वेळा नोटिशीचा कागद हालवीत बापूजवळ आला. त्याने त्याला हुसकावून बाजूला बसायला सांगितले गेले. मेळा निघून गेल्यावर तो पुन्हा बापूजवळ आला. वास्तविक ज्या कामाची मनाई करण्यात आली होती ते काम तर झालेच होते. बापूने नोटीशीचा कागद हातात घेतला आणि टराटरा फाडून टाकला.

मेळा गेल्यावर बापू आणि इतर ५-६ मंडळी प्रबोधन कचेरीत आली. हा शुक्रवारचा दिवस होता. प्रबोधनकारांनी केलेल्या लोकहितवादी साप्‍ताहिकाचा अंक दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी बाहेर पडायचा होता. मेळ्याची सविस्तर माहिती देण्यासाठी शेवटचे ८ वे पान राखून ठेवण्याचे बापूने सांगितले होते. मंडळी छापखान्यात येताच बापूने झाल्या हकीकतीचा वृत्तान्त सांगितला आणि तो श्रीपतराव शिंद्यांच्या चिरंजीवाने (माधवरावने) लिहून काढला. कंपोझिटर्स तयार होतेच. मजकूर कंपोझ होऊन, 'गायकवाड वाड्यावर अस्पृश्यांच्या मेळ्याची स्वारी', या मथळ्याखाली लोकहितवादी साप्‍ताहिकात सबंध पानभर हकीकत छापून वक्तशीरपणे बाहेर पडली.

रविकिरण मंडळ

[संपादन]

लोकमान्यांचे सुपुत्र श्रीधरपंत टिळक यांच्या प्रोत्साहनाने आणि आधारामुळे रविकिरण मंडळाच्या काव्यमैफली टिळकांच्या गायकवाड्यातच व्हायच्या.

गणेशोत्सव

[संपादन]

पुण्याच्या केसरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या संस्थेचा गणपती इ.स. १८९४ पासून बसू लागला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहात होते. इ.स. १९०५ पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला. लोकमान्य टिळकांची व्याख्याने तेथे होत असत. या गणपतीची पालखीतून मिरवणूक निघते. हा पुण्यातील मानाच्या पाच गणपतीपैकी एक समजला जातो. इ.स. १९९८ मध्ये श्रींची मूर्ती संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली.

संग्रहालय

[संपादन]

या वास्तूत आता संग्रहालय आहे. वास्तूतील लोकमान्यांचा पुतळ्याचे अनावरण मोतीलाल नेहरूंच्या हस्ते झाले होते. हा पुतळा मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरील टिळकांच्या पहिल्या पुतळ्याची प्रतिकृती आहे. (टिळकांचा पहिला पुतळा त्यांच्या हयातीतच वाघ स्टुडिओचे संस्थापक विनायकराव वाघ यांनी १९१६ साली लोकमान्यांच्या इच्छेनुसार समोर बसवून हा पुतळा बनवून घेतला होता.)