कीर्ति शिलेदार
किर्ती शिलेदार | |
---|---|
जन्म |
किर्ती शिलेदार १६ ऑगस्ट, १९५२ मुंबई |
मृत्यू |
२२ जानेवारी २०२२ पुणे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख नाटके | संगीत स्वरसम्राज्ञी |
वडील | जयराम शिलेदार |
आई | जयमाला शिलेदार |
किर्ती शिलेदार (१६ ऑगस्ट, १९५२ - २२ जानेवारी, २०२२) या मराठी गायकअभिनेत्री होत्या. संगीत नाटकांतील गायनाकरता त्या विशेष ओळखल्या जातात. मराठी अभिनेते जयराम शिलेदार आणि त्यांच्या अभिनेत्री पत्नी जयमाला हे कीर्तीचे वडील आणि आई होत.
जीवन आणि कारकीर्द
[संपादन]आपल्या आई, वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीताची आराधना केलेल्या कीर्ती शिलेदार यांनी वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. त्यांचे शास्त्रीय संगीताचे उच्च शिक्षण नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे झाले.
पुणे विद्यापीठातून साहित्य शाखेच्या पदवी घेतलेल्या कीर्ती शिलेदार यांच्ची भूमिका असलेल्या नाटकांचे आजवर ४०००हून अधिक प्रयोग झाले आहे. देशातल्या मराठी रसिकांसाठीही त्यांनी देशाच्या विविध शहरांत मराठी संगीत नाटकांचे प्रयोग केले. संगीत कान्होपात्रासह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. गोड गळा आणि शास्त्रीय संगीतासाठी केलेल्या प्रचंड परिश्रमामुळे कीर्ती शिलेदार यांनी संगीत मराठी नाटकात केलेल्या सर्वच भूमिका गाजल्या. बालगंधर्वांच्या सुवर्ण युगाची आठवण यावी, अशा एकरूपतेने कीर्ती शिलेदार यांनी गायलेली गीते रसिकांनी डोक्यावर घेतली. संगीत नाटक हेच त्यांच्या आई, वडिलांचा श्वास आणि ध्यास होता. आपल्या आई, वडिलांची संगीत मराठी नाटकांच्या सेवेचा हाच वारसा जपताना कीर्ती शिलेदार यांनी, कीर्ती आणि पैशाचा मोह बाजूला ठेवत, मराठी संगीत रंगभूमीची सेवा पन्नासहून अधिक वर्षे अविरतपणे केली आहे. मराठी संगीत रंगभूमीच्या त्या सर्वार्थाने बिनीच्या शिलेदार आहेत.
रंगभूमीवर भूमिका रंगवताना त्यांनी नेहमी अभ्यासपूर्ण सौंदर्यशोध घेतला. त्यामुळेच त्यांच्या सर्व भूमिका आगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत. संगीत रंगभूमीवर त्यांनी स्वतःचे आगळे स्थान निर्माण केले आहे. संगीत नाटके व स्वतंत्र मैफलींच्या निमित्ताने भारतभर तसेच इंग्लंड-अमेरिकेत त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. सौंदर्यशोधक दृष्टीने शास्त्रीय संगीतातील अकारण होणारे शब्दोच्चारांचे दुर्लक्ष टाळले जावे, या हेतूने त्यांनी ’स्वर ताल शब्द संगती’या नावाचे हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले आहे.
विदेशात त्यांनी शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताच्या मैफिली गाजवल्या आहेत. महाराष्ट्राच्या प्रतिनिधी या नात्याने त्यांनी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीमध्ये सदस्य म्हणूनही काम केले आहे.
संगीत स्वरसम्राज्ञी हे कीर्ती शिलेदार यांचे अत्यंत गाजलेले नाटक आहे. या नाटकाव्यतिरिक्त कीर्ती शिलेदार, लता शिलेदार आणि सुरेश शिलेदार हे तिघेही मिळून जे तीनपात्री सौभद्र सादर करतात, त्या तीनपात्रीचे रंगमंचावर अनेक प्रयोग झाले आहेत.
नाटके आणि त्यांतील भूमिका
[संपादन]- अभोगी (गगनगंधा)
- एकच प्याला (सिंधू)
- कान्होपात्रा (कान्होपात्रा)
- द्रौपदी (द्रौपदी)
- भेटता प्रिया (महाश्वेता)
- मंदोदरी (मंदोदरी)
- मानापमान (भामिनी)
- मृच्छकटिक (वसंतसेना)
- ययाति आणि देवयानी (शर्मिष्ठा)
- रंगात रंगला श्रीरंग (माधवी)
- रामराज्यवियोग (मंथरा)
- रूपमती (रूपमती)
- विद्याहरण (देवयानी)
- शाकुंतल (शकुंतला)
- शारदा (शारदा)
- श्रीरंग प्रेमभंग (राधा)
- संशयकल्लोळ (रेवती)
- सौभद्र (कृष्ण, नटी, नारद, रुक्मिणी, सुभद्रा)
- स्वयंवर (रुक्मिणी)
- स्वरसम्राज्ञी (मैनाराणी)
नाट्यगीते
[संपादन]- अहो इथं मांडिला (संगीत स्वरसम्राज्ञी)
- एकला नयनाला विषय (संगीत स्वयंवर)
- एकलीच दीपकळी मी (संगीत स्वरसम्राज्ञी)
- कशि केलीस माझी दैना (संगीत स्वरसम्राज्ञी)
- दयाछाया घे निवारुनिया (संगीत एकच प्याला)
- नरवर कृष्णासमान (संगीत स्वयंवर)
- नाही मी बोलत (संगीत एकच प्याला)
- नृपकन्या तव जाया (संगीत स्वयंवर)
- पांडवा सम्राट पदाला (संगीत द्रौपदी)
- पावना-वामना-या मना (संगीत सौभद्र)
- पाही सदा मी (संगीत मानापमान)
- बलमा आये रंगीले (संगीत स्वरसम्राज्ञी)
- भक्ताचिया काजासाठी (संत अमृतराय महाराज यांचा अभंग)
- मम सुखाचि ठेव (संगीत स्वयंवर)
- येतील कधी यदुवीर
- रे तुझ्यावाचून काही (संगीत स्वरसम्राज्ञी)
- लाजविले वैऱ्यांना (संगीत द्रौपदी)
- सखे बाई सांगते मी (रंगात रंगला श्रीरंग)
- हरीची ऐकताच मुरली (रंगात रंगला श्रीरंग)
पुस्तक
[संपादन]- कीर्ती शिलेदार यांनी ’स्वर ताल शब्द संगती’या नावाचे एक पुस्तक लिहिले आहे.
पुरस्कार
[संपादन]- २०१४ सालचा महाराष्ट्र सरकारचा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार. या पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे आहे.
- दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा विशेष पुरस्कार.
- बालगंधर्व पुरस्कार