स्वरानंद प्रतिष्ठान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्वरानंद ही संस्था ७ नोव्हेंबर १९७०रोजी स्थापन झाली आणि १९९५ साली तिचे नाव स्वरानंद प्रतिष्ठान झाले.

संस्थापक : विश्वनाथ ओक आणि हरीश देसाई
संस्थापक आणि मानद अध्यक्ष : कै, गजानन वाटवे
आजी-माजी अध्यक्ष, कार्याध्यक्ष, विश्वस्त आणि कार्यकारिणीचे सदस्य : यशवंत देव, सुधीर मोघे, प्रकाश भोंडे, अरुण नूलकर, शैला मुकुंद, गिरीश जोशी. वंदना खांडेकर, विजय मागीकर, वगैरे.

इतिहास[संपादन]

स्वरानंद ही संस्था ७ नोव्हेंबर १९७० रोजी स्थापन झाली आणि १९९५ साली तिचे नाव स्वरानंद प्रतिष्ठान झाले. इ.स. १९७० च्या सुमारास पुण्यातील विश्वनाथ ओक व हरीश देसाई यांनी 'आपली आवड' या शीर्षकाखाली प्रथमच मराठी वाद्यवृन्दाचा कार्यक्रम केला. त्याला त्या काळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांचाबरोबर अरुण नूलकर , सुधीर दातार, अजित सोमण, सुहास तांबे, सुरेश करंदीकर, प्रकाश भोंडे या मित्रांनी सक्रिय सहभाग घेतला. पुढे विविध संकल्पनांवर आधारित कार्यक्रम होतच गेले. त्यातूनच स्वरानंद ही संस्था स्थापन झाली. केवळ मराठी सुगम संगीताचे रंगमंचीय कार्यक्रम करणारी 'स्वरानंद प्रतिष्ठान' ही तसे करणारी आद्य संस्था म्हणून ओळखली जाते.

स्वरानंदचे कार्यक्रम[संपादन]

'स्वरानंद' नेहमीच रसिकश्रोता हा केंद्रबिंदू मानत आली आहे व कार्यक्रमांची आखणी व बांधणी केली आहे. अडीच-तीन तास रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी लोकप्रिय भावगीते, चित्रगीते, अभंग, लावणी, नाट्यगीते, कोळीगीते, लोकसंगीत आदी गानप्रकारांची गाणी स्वरानंदाच्या कार्यक्रमांत सादर होतात.

संस्था स्थापनेचा उद्देश[संपादन]

  • भारतीय अभिजात आणि ललित संगीताची अभिरुची जनात वाढविणे, त्याचा प्रसार करणे.
  • संगीतविषयक प्रशिक्षण, मार्गदर्शनपर उपक्रम राबविणे तसेच तशा प्रकारच्या इतरांच्या उपक्रमांचे आयोजन करणे. नवीन कलाकारांना योग्य त्या संधी देणे.
  • दृक्‌श्राव्य माध्यमांद्वारे संगीताची अभिरुची वाढवणे, प्रचार करणे अगर अशा उपक्रमांना सक्रिय सहाय्य देणे, संगीताबद्दल संशोधनात्मक कार्य करणे.
  • बालकलाकार, युवा कलाकार यांना योग्य प्रकारे उत्तेजन मिळेल असे सांस्कृतिक, संगीत विषयक उपक्रम राबविणे, संगीतविषयक साहित्याचेना नफाना तोटा पद्धतीने प्रकाशन करणे तसेच अशा प्रकाशनास उत्तेजन देणे.

संस्था करीत असलेले कार्य[संपादन]

फक्त रंगमंचीय कार्यक्रम करणे हा संकुचित हेतू न ठेवता मराठी सुगम संगीतातील बुजुर्ग कवी, संगीतकार, गायक, वादक यांचे कृतज्ञतादर्शक सोहोळेही स्वरानंदतर्फे होत असतात.

ही संस्था संगीत विषयक कार्यशाळा, व्याख्याने, दृक्‌-श्राव्य कार्यक्रम वगैरे आयोजित करते. संस्थेचे सुसज्ज ग्रंथालय आहे आणि त्यांच्याकडे ध्वनिफितींचा मोठा संग्रहही आहे. मराठी भावगीतांचा इतिहास हा महत्त्वाचा प्रकल्प स्वरानंद प्रतिष्ठानने हाती घेतला आहे.

स्वरानंद प्रतिष्ठानने केलेले रंगमंचावरचे कार्यक्रम[संपादन]

  • असेन मी नसेन मी (शांता शेळके यांच्या रचना) (११ जून २००६)
  • आनंदतरंग (श्रीनिवास खळे अमृतमहोत्सव) (२३ ऑगस्ट २०००)
  • आपली आवड (लोकप्रिय मराठी गाण्यांचा कार्यक्रम) (७ नोव्हेंबर १९७०)
  • गदिमा आणि बाबूजी दृक्‌श्राव्य कार्यक्रम
  • जय जवान (समर गीतांचा कार्यक्रम) (२९ ऑक्टोबर २०१०)
  • पुलकित गीते ([पु.ल. देशपांडे]] यांनी स्वरबद्ध केलेल्या गाण्यांचा कार्यक्रम (१७ ऑगस्ट १९७७)
  • मंतरलेल्या चैत्रबनात (ग.दि.माडगूळकर यांच्या हा चित्रपटगीतांचा कार्यक्रम) (१७ डिसेंबर १९७५)
  • मी निरांजनातील वात (गजानन वाटवे यांच्या गाण्यांचा कार्यक्रम (८ जून १९९७)
  • वसंत नाट्य वैभव (वसंत कानेटकर यांच्या नाट्य कर्तृत्वाचा मागोवा घेणारा दृक्‌-श्राव्य कार्यक्रम) (२० मार्च २०११)
  • स्वरप्रतिभा (पंडित पं.जितेंद्र अभिषेकींचा सांगीतिक मागोवा घेणारा दृक्‌-श्राव्य कार्यक्रम) (६ जून १९९९)

स्वरानंद प्रतिष्ठान करीत असलेले अन्य उपक्रम[संपादन]

  • नामवंत कलाकारांचे सत्कारसोहोळ
  • भावगीत प्रकल्प
  • वाटवे करंडक भावगीत स्पर्धा
  • सुप्रसिद्ध कलाकारांच्या नावाचे पुरस्कार प्रदान समारंभ, वगैरे.

संस्थेने आयोजित केलेले अन्य कार्यक्रम[संपादन]

  • कविता पानोपानी (तपपूर्ती सोहळा?)
  • गीतरामायण (गीतरामायण सुवर्ण महोत्सव) (१३ नोव्हेंबर २००५)
  • तू अन्‌ मी (द्वंद्वगीते) (७ एप्रिल २००६)
  • मंतरलेल्या चैत्रबनात - नवी पालवी (?) (२४ डिसेंबर २०००)
  • पुलोत्सव (२ नोव्हेंवर १९९९)
  • भावसंगीताची वाटचाल (२ नोव्हेंबर १९९९)
  • मंगलप्रभात (भक्तिगीते) (२९ जून २००६)
  • रंगवर्षा (वर्षागीतांचा कार्यक्रम) २१ सप्टेंबर २००७), वगैरे.

पुरस्कार[संपादन]

स्वरानंद प्रतिष्ठान ही संस्था संगीत क्षेत्रातील कलावंतांना नियमितपणे काही पुरस्कार देते. पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये रोख आणि सन्मान चिन्ह असे आहे. पुरस्काराची नावे :-

  • वादकाला विजयाबाई गदगकर पुरस्कार
  • शास्त्रीय किंवा सुगम संगीत गायकाला माणिक वर्मा पुरस्कार
  • संगीत रचनाकाराला केशवराव भोळे पुरस्कार
  • सुगम संगीत गायकाला देण्यात येणारा उषा अत्रे (उषा वाघ) पुरस्कार
  • इ.स. २०१०पासून 'स्वरानंद प्रतिष्ठान'चे मानद अध्यक्ष काव्यगायक कै. गजाननराव वाटवे यांच्या नावाने सुरू केलेला एक स्वतंत्र पुरस्कार, भावसंगीताच्या क्षेत्रात प्रदीर्घ सेवा करणाऱ्या बुजुर्ग कलाकाराला दिला जात आहे. पहिला पुरस्कार भावगीत गायक अरुण दाते यांना दिला गेला.

स्वरानंद’चे पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती आणि वर्ष[संपादन]

  • केशवराव भोळे पुरस्कार : संगीतकार अविनाश चंद्रचूड आणि विश्‍वजित जोशी (२०१२); आशिष मुजुमदार (२०१३); केदार पंडित (२०१०); संगीतकार चिनार-महेश (२०१८), निलेश मोहरीर (२०११); संगीतकार राहुल रानडे (२०१४); कौशल इनामदार (१९९९) सलील कुलकर्णी (१९९८);
  • माणिक वर्मा पुरस्कार : आनंद भाटे (२०११); गायक उपेंद्र भट (२०१४); वादक कमलेश भडकमकर (२०१०); संवादिनी वादक तन्मय देवचके (२००९); मंजिरी आलेगावकर (२०१२); विजय कोपरकर (२०१०), गायिका सुमेधा देसाई (२०१८), हेमंत पेंडसे (२०१३);
  • विजयाबाई गदगकर पुरस्कार : बासरीवादक अमर ओक (२०१४); हार्मोनियम वादक डॉ. नरेंद्र चिपळूणकर (२०१३); व्हायोलिनवादक महेश खानोलकर (२०१२); सतारवादक प्रसाद गोंदकर (२०१८); वादक ज्ञानेश देव (२०११);
  • डॉ. उषा अत्रे-वाघ पुरस्कार : प्रियांका बर्वे-कुलकर्णी (२०१८), बेला शेंडे (२०१०), युवा गायक मंदार आपटे (२०१४); योगिता गोडबोले (२०११); वैशाली सामंत (२०१३); सुचित्रा भागवत (२०१२);
  • गजानन वाटवे पुरस्कार : अरुण दाते (२०१०), श्रीधर फडके (२०१७)

संदर्भ[संपादन]

[१] Archived 2016-03-04 at the Wayback Machine. ’स्वरानंद’ने केलेले कार्यक्रम