श्रीनाथ म्हस्कोबा
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याचे मुख्यालय असलेल्या सासवड शहरापासून २५ किमी आणि अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्रीखंडेरायाच्या जेजुरीपासून ३० किमी अंतरावर पुणे व सातारा जिल्हयाच्या सीमेवर 'वीर गाव(ता.पुरंदर,जि.पुणे) नावाचे गाव असून येथे पूर्णगंगेच्या उत्तर तीरावर श्रीनाथ म्हस्कोबाचे पवित्र देवस्थान आहे.
हे मंदिर दगडी बांधकाम असणारे 'देऊळवाडा' या भव्य प्राकारात असून पूर्वाभिमुख मंदिराची सदर, सभामंडप, गाभारा अशी रचना केलेली आहे. मंदिराच्या चहुबाजूने उंच असा चिरेबंदी तट असून पूर्व व दक्षिण अशी दोन महाद्वारे आहेत. गाभाऱ्यात श्रीनाथ -जोगेश्वरी आई यांच्या स्वयंभू मूर्ती आहेत. श्रीनाथ हे काशीचे कोतवाल काळभैरव तसेच सोनारीचे सिद्धभैरव असून कमळाजी नामक धनगर भक्तामुळे वीर या ठिकाणी वास्तव्यास आले आहेत. हा देव स्मशानभूमीत प्रगट झाल्याने यांना म्हस्कोबा असे नाव मिळाले आहे.
श्रीक्षेत्र वीर येथे काशिखंडाचे श्री काळभैरव श्रीनाथ म्हस्कोबा महाराज यांचे जागृत देवस्थान आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य दरवाजातून प्रवेश केल्यावर पादुकामंदिर आणि श्रीनाथांचे वाहन (अश्व) घोडा आहे. यात्रा काळात पादुका मंदिराचे शिखरापासून मुख्य मंदिराच्या कळसापर्यत फेटा बांधतात. याला 'धज बांधणे' असे म्हणतात. यांच्या दरम्यान भव्य दगडी कासव आहे. कासवावर देवापुढे उभे राहून भक्तगण नवस बोलतात. देऊळवाड्याच्या तटाच्या आतील बाजूने श्रीनाथांचे मानकरी शिंगाडे, तरडे, बुरुंगले, व्हटकर, ढवाण, राऊत, यांना यात्राकाळात व इतर वेळी राहण्यासाठी ओवऱ्या आहेत. मंदिराच्या मुख्य द्वाराच्या पायरीवर बाहेरच्या बाजुला मोठा घंटा आहे. सदरेवरून गाभाऱ्यात प्रवेश करताना सभामंडपात डाव्या बाजुला श्रीनाथांचे वाहन अश्व आहे. याचे नाव 'चिंतामणी' असे आहे. आणि या अश्वासमोर 'आदिशक्ती तुकाईदेवी'ची महिषासूरमर्दिनी रूपातील काळ्या पाषाषाची अष्टभुजा मूर्ती आहे. तेथून आत गेल्यावर मुख्य गर्भगृहात श्रीनाथ म्हस्कोबा महाराज आणि आई जोगेश्वरी यांच्या शेंदूरचर्चित स्वयंभू मूर्ती आहेत. शेजारीच उजव्या बाजुला देवाचे शेजघर आहे. त्यामध्ये श्रीनाथांचा पलंग ठेवलेला आहे. दर्शन घेताना आधी प्रथम पादुका, कासव, चिंतामणी अश्व, तुकाईदेवी व नंतर गर्भगृहात श्रीनाथांचे दर्शन घेतल्यानंतर शेजघराजवळच्या दक्षिण दरवाजातून बाहेर पडून काळूबाईचे दर्शन घेतात. मंदिराच्या मागच्या बाजूच्या त्रिमूर्तीचे दर्शन घेऊन गोमुख दर्शन करून मंदिराच्या समोरील उजव्या बाजूस मारुतीचे दर्शन घेऊन पुन्हा पादुकांचे दर्शन घेऊन कासवावर आल्यानंतरच श्रीनाथांच्या भोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण होते. मंदिराला पूर्व आणि दक्षिण असे दोन दरवाजे आहेत. यात्रेदरम्यान सर्व काठया, पालख्या या पूर्व दरवाजातून आत प्रवेश करतात. तसेच माघ शुद्ध पौर्णिमेला लग्नाच्या दिवशी सर्व सासनकाठया, पालख्या 'अंधारचिंच' या पुरातनच्या वृक्षाखाली जाण्यासाठी दक्षिण दरवाजातून जातात. माघ पौर्णिमा ते दशमी हा मुख्य यात्रौत्सव, अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र व कार्तिक वद्य अष्टमीला श्रीकाळभैरव जन्मोत्सव हे श्रीनाथ म्हस्कोबा दैवताचे वर्षातील प्रमुख उत्सव आहेत.
माघ पौर्णिमेला श्रीक्षेत्र वीर येथे मोठी यात्रा भरते. "नाथसाहेबाचं चांगभलं!" , "सवाई सर्जाचं चांगभलं! "च्या गजरात ढोल -ताशांच्या निनादात गुलाल -खोबऱ्याची चौफेर उधळण करत पारंपरिक व उत्साही वातावरणात श्रीक्षेत्र वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा दरवर्षी माघ महिन्यात साजरा होतो. रथसप्तमीच्या दिवशी देवांच्या लग्नपत्रिका वाटण्याचे काम घडशी-गुरव हे करतात. श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थानचा वार्षिक यात्रा महोत्सव देवाच्या हळदी समारंभाने माघ शुद्ध चतुर्दशीला सुरू होतो. चतुर्दशीच्या सायंकाळी वीर व राऊतवाडी येथील देवाचे मानकरी राऊत-माळी श्रीनाथ महाराजांना भरजरी पोषाख व आदिमाया जोगेश्वरी मातेला मानाची साडी-चोळी व हळद वाजतगाजत घेऊन येतात. गुरवपुजारी देवाला हळदीचा पोषाख नेसवतात. नंतर राऊत मंडळीच्या सुवासिनींच्या हस्ते देवाला हळद लावण्यात येते. यावेळी वीर गावातील व पंचक्रोशीतील सुवासिनी देऊळवाड्यात हळद लावण्यासाठी आवर्जुन गर्दी करतात.
पौर्णिमेच्या दिवशी गावात सर्वत्र गडगनेर असतो. पुरणपोळीचा गोड नैवेद्य करून मंदिरात आणला जातो. कारण गावातील प्रत्येक घरात कमीत कमी एकालातरी विवाहसोहळ्याच्या ५ दिवस आधी 'देवाच्या लग्नाचा ५ दिवसाचे उपवास' धरण्याचा रीवाज आहे. तो उपवास या दिवशी सोडतात. बाहेरून येणाऱ्या भाविकांना व वऱ्हाडी मंडळींना दुपारनंतर श्री.धुमाळ(वाडकर) परिवाराकडून महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. परंपरेनुसार कोडीत, वाई, कन्हेरी, राजेवाडी, भोंडवेवाडी, सोनवडी आणि पुण्यातील कसबापेठ येथून सोहळ्यासाठी पालख्या येतात.
मध्यरात्री ११:३० च्या सुमारास राऊतवाडीचे राऊतमंडळी मानाच्या आरत्या, लग्नाचा पोषाख व बाशिंगे मंदिरात आणतात. श्रीनाथ म्हस्कोबा महाराज माघ महिन्याच्या पौर्णिमेला रविवारी राऊत-माळी यांच्या शेतात प्रकट झाल्यामुळे ते वरपक्षाचे झाले देवाच्या हळदीचा व लग्नाचा मान त्यांना मिळाला आहे. याच वेळी सालकरी फुलमाळी चाफ्याच्या फुलाची मुंडावळी आणून देतात. लग्नाचा हा सर्व साजशृंगार गुरवपुजारी देवाला करतात. देवाचे मानकरी देवाच्या नावाचा जयघोष करतात. श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचा नावाचा चांगभलं करत मानकरी राऊत मंडळीमार्फत श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचा लग्न लावलं जातं.देवाच्या नावाचा जयघोष अर्थात चांगभलं ह्याच मानकरी राऊत मंडळीकडून श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या लग्नाच्या मंगलाष्टका असतात.
त्यानंतर वीर आणि इतर गावच्या काठ्या पालख्या अंधारचिंच येथे जातात. देवाचे सर्व मानकरी व भाविकांच्या उपस्थितीत वाई (सुर्यवंशी) आणि कन्हेरी (पाटणे) पालख्यांचे स्वागत करतात. यावेळी सालकरी फुलमाळ्यांनी आणलेल्या कन्हेरीच्या फुलाच्या माळा गुरव-पुजारी देवाच्या शिंगाडे, तरडे, बुरुंगले, व्हटकर, ढवाण या ५ मानकऱ्यांच्या प्रतिनिधींना घालतात, त्यांना 'माळकरी' असे म्हणतात. कोडितच्या काठीची व वाईच्या तसेच कन्हेरीच्या काठयांची भेटाभेट होते. हा वऱ्हाडी मंडळीचा भेटीचा कार्यक्रम 'अंधारचिंच' (बाजारतळ) येथे होतो. यानंतर सर्व पालख्या, काठया, ढोल ताशासह वाजतगाजत दक्षिण महाद्वाराने रात्री १:३० वाजण्याच्या सुमारास देऊळवाडयात प्रवेश होतो. सोहळ्याचे सर्व धार्मिक विधी मानकरी यांच्यासह समस्त ग्रामस्थ, विश्वस्त, भाविकभक्त आदींच्या उपस्थितीत पार पडले जातात. गुरव-पुजारी देवाच्या मुख्य मूर्तींना व पालखीतील उत्सव मूर्तीस अलंकार व पारंपरिक वस्त्रांनी सजवितात. ग्रामपुरोहितांकडुन शास्त्रोक्त मंत्रोच्चार होतात. रात्री २ वाजण्याच्या सुमारास मंगलाष्टकांना सुरुवात होते. श्रीनाथ म्हस्कोबा-देवी जोगेश्वरीच्या लग्नाला लाखो लोक वऱ्हाडी म्हणून मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. गुलालात न्हालेल्या भाविकांच्या वऱ्हाडांकडून पडणाऱ्या अक्षता , वर पौर्णिमेचे टिपूर चांदणेयुक्त मांडव, आणि पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीने उत्साही वातावरणात पहाटे २ च्या सुमारास श्रीक्षेत्र वीर येथे देवांचा पारंपरिक लग्न सोहळा संपन्न होतो. हा लग्न सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येथे उपस्थिती लावतात. यावेळी संपूर्ण वीर परिसर भक्तीरसात न्हाऊन निघतो. विवाहसोहळा पार पाडल्यानंतर वरात निघते. या वरातीत सर्व सासनकाठ्या, पालख्या, मानकरी लवाजम्याम्यासह भक्त कमळाजी माळावर श्रीकमळसिद्ध व त्याच्या मुलांच्या भेटीला जातात तिथे धुपआरती होऊन पुढे 'जमदाडकी' (जमदाडे-माळी यांचे शेत) मधून श्रीतुकाई माळाकडे जातात. तेथील चौपाळ्यावर धुपारती होते काठ्यांची भेटाभेट होते. तिथून पुढे नाईकवाड्यातून पालखी सोहळा श्रीविठ्ठल मंदिरासमोरून मुंजाबा पाराजवळ येतो. अंधारचिंचेखालुन चावडी चौकात येतो. गुरव आळीतून वरातीचा सोहळा पूर्णगंगेच्या दक्षिण तीरावर येतो. तेथे अजापुत्राचा बळी दिला जातो. ढोल-ताशांच्या गजरात रात्रभर ग्रामप्रदक्षिणा होते. पहाटे सर्व पालख्या मंदिरात दक्षिण महाद्वारातुन प्रवेश करतात. मंदिराला एक प्रदक्षिणा होऊन छबिन्याची समाप्ती होते. दर्शनाचा लाभ घेऊन भल्या पहाटे सर्व पालख्या आपापल्या तळावर विसावतात. विवाहसोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी समस्त राऊतमंडळींच्या वतीने सर्व वऱ्हाडी मंडळींची भोजन व्यवस्था केली जाते.
दहा दिवस चालणाऱ्या या यात्रेत रोज दुपारी व रात्री देऊळवाड्यात छबिना भरतो. भाविक-भक्त, आबालवृद्ध बेभान होऊन नाचत असतात. वद्य पंचमीपासून श्रीनाथांचा संचार सुरू होऊन भाकणूक (भविष्यवाणी) सुरू होते. वार्षिक पीक-पाणी, रोगराई संबंधीची भविष्यवाणी सांगण्यात येते. तसेच या पंचमीपासूनच 'गजेजेवण' घालणे ही सुरू होते. ज्याप्रमाणे देवीच्या नावाने सवाष्ण जेवायला बोलवितात तसे 'गजेजेवण म्हणजे श्रीनाथांच्या नावाने कमीतकमी ५ बाळगोपाळ जेऊ घालणे.
नवमीच्या दिवशी देवांचा रूखवत परंपरेप्रमाणे धुमाळ(वाडकर) यांच्या परिवारातर्फे वाजत गाजत आणला जातो. रात्रीचा छबिना मध्यरात्री सुरू होतो, त्याची समाप्ती सूर्योदय झाल्यावर होते. याला 'जागराचा छबिना' असे म्हणतात. दरम्यान पहाटेपासूनच वीर गावातील असंख्य भाविक हौसे-नवसाचे दंडवत घालत मंदिरात येतात. यामध्ये माता-भगिनींची संख्या जास्त असते. माघ वद्य दशमी हा यात्रेचा मुख्य दिवस (मारामारी) असतो. त्यादिवशी दुपारी १२:३० वाजता सर्व काठया,पालख्या ढोल ताशासह देऊळवाड्यात येतात. शेकडो ढोल, ताशा, झांजांच्या निनादात गुलालात न्हाऊन निघालेल्या हजारो भाविकभक्तांच्या जयघोषात आणि पालखीपुढे नाचणाऱ्या भाविकांच्या उपस्थितीत दुपारी २:०० वाजता मानाच्या जांभळ्या रंगाचे शिंपण समस्त जमदाडे यांच्यामार्फत आधी श्रीनाथ जोगेश्वरी यांच्या मूर्तीवर व नंतर भाविकभक्तांवर केले जाते, यालाच 'मारामारी' म्हणतात. याच वेळी पूर्व महाद्वाराच्या बाहेर डावीकडे असणारे 'श्रीनाथांचे बगाड' गोलाकार फिरवले जाते. वीर गावातील 'मुळीक' परिवाराला बगाड घेण्याची सेवा आहे. छबिना उतरल्यावर बारा दिवस सेवा करणाऱ्या सेवकऱ्यांना गुरवपुजारी रोजमारा वाटतात. रंगशिंपण झाल्यावर अजापुत्रांचा बळी दिला जातो. हीच गावची जत्रा!! त्यानंतर दुस-या दिवशी शिंगाडे, तरडे, बुरुंगले, व्हटकर, ढवान यांच्या नवसाच्या गादीपुजनाचा कार्यक्रम होतो. यावेळी गादीवर पावन झालेले नवस फेडले जातात तसेच नवीन नवस बोलले जातात. यात्रेचा प्रसाद घेऊन या यात्रेचा समारोप होतो. अशाप्रकारे १० दिवस चालणारा हा यात्रा महोत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न होतो. या कालावधीत भाविकांना दर्शनाचा लाभ व्हावा यासाठी देऊळवाड्यात स्वयंसेवक यांच्यामार्फत रांगा लावल्या जातात. " सवाई सर्जाचं चांगभलं"च्या घोषात पूर्ण परिसर दुमदुमून जातो.
माघ पौर्णिमेपासून दशमीपर्यत दहा दिवस यात्रा चालते.महाराजांची काठी, पालखी व छबिना दहा दिवसांपर्यत चालतो. तसेच पंचमीपासून ते दशमीपर्यत संपूर्ण वर्षाचे भविष्य (भाकणूक) सांगितले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी गावातील तरुणमंडळी, पुजारीवर्ग, घडशी, गोसावी पहाटेपासूच गुलाल-खोबऱ्याने माखलेले मंदिर व देऊळवाडा पाण्याने धूवुन काढतात. नंतर देवांची दही, दूध, तूप, मध,आणि साखर या पंचामृताने पाखाळणी पूजा करण्यात येते. माघ अमावस्येच्या दिवशी दुपारनंतर श्रीनाथ जोगेश्वरींच्या स्वयंभू मूर्तीवर चांदीचे मुखवटे लावून भरजरी पोषाख करतात, देवांचे सर्व सुवर्ण अलंकार, दागदागिने घालतात हे रूप खूपच मनमोहक दिसते. ते पाहण्यासाठी रात्री १० वाजेपर्यंत देऊळवाड्यात भाविक गर्दी करतात. मुख्य यात्रा १०/१२ दिवसच असली तरी माघ श.१४ ते माघ कृ.३० अशी जवळपास १६ दिवस यात्रा चालणारे महाराष्ट्रातील एकमेव श्रीक्षेत्र वीर देवस्थान आहे, दरवर्षी साधारण १० लाखाच्या आसपास भाविक यात्रेत सामील होतात. सोमवती अमावस्या, सुर्यग्रहण पर्वकाळ निमीत्त पालखी सोहळा श्रीनाथांचे मुळस्थान घोडेउड्डाण येथे स्नानासाठी जातो. तेथे छबिना होतो, पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासात ग्रामप्रदक्षिणा होऊन देऊळवाडयात समाप्ती होते. दर रविवारी रात्रौ. ९:३० ते ११ वा.देऊळवाडयात छबिना निघतो. येथे प्रत्येक अमावस्या, पौर्णिमा तसेच रविवारी भंडारा म्हणजेच महाप्रसाद असतो. वीर गावाच्या दक्षिण सीमेवर निरा नदीचा पवित्र परिसर आहे तसेच त्यावर बांधलेले वीर धरण पाहण्यासारखे आहे. अशा या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या गावात श्रीनाथांच्या मंदिरामुळे नावलौकिकात अधिकच भर पडते.
, श्रीक्षेत्र वीर.