सासवड
सासवड हे पुण्याजवळचे एक नगरपरिषद असलेले एक शहर आहे. हे शहर पुरंदर तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
कऱ्हे पठार
[संपादन]महाराष्ट्राच्या शौर्यधैर्यादी वीर वृत्तीचे उगमस्थान त्यांचा आवडता सह्याद्री होय. सह्याद्रीची उत्तुंग शिखरे, बिकट कडे, खोल दऱ्या आणि त्याच्या आश्रयातील घनदाट अरण्ये ही आम्हां मराठ्यांच्या महाराष्ट्र वृत्तीची जननी आहे.
बापदेव घाटाजवळ एक दक्षिणोत्तर जाणारी डोंगररांग दिसते. पूर्वेच्या उजव्या बाजूस पुण्यापासून १० मैलांवर दिवे घाटाची दरड उभी आहे. दिवे घाट चढून गेले की, कऱ्हे पठाराची सीमा लागते. पूर्व-पश्चिम जाणारी ही डोंगररांग कर्णाकृती होऊन १०-२० मैल जाऊन विराम पावते. या पठाराच्या पूर्वेस आनंद भैरव नांदतो. साबगर खिंड, पानवडीची खिंड, पांगर खिंड आणि पुरंदर गड, वज्रगड, जेजुरीगड प्रसिद्ध स्थळांत मोडतात. सिंहगड रांग व पुरंदर रांग या दोन्ही एका ३-४ मैलांच्या रांगेने एकमेकांस संलग्न होतात.
आणि ह्या तिन्हीही रांगामुळे एक मोठे विस्तृत पठार तयार झाले आहे, या पठाराला कऱ्हे पठार म्हणतात. या पठाराची व्याप्ती सुमारे १०० चौरस मैलाची आहे. या पठाराच्या एका टोकास भुलेश्वर व दुसऱ्या टोकास मल्हारी मार्तंड उभे आहेत. आणि या पठाराच्या गर्भातून कऱ्हामाईचा झुळझुळ प्रवाह वाहत आहे. या प्रदेशावर पुराणप्रसिद्ध व इतिहासप्रसिद्ध अनेक स्थळांची गर्दी झालेली दिसून येईल.
भागवतधर्माचे सासवडचे संत सोपान देव, गणेशभक्तांचे आधिदैवत श्री मोरेश्वर आणि कऱ्हेच्या पावन तीरावरील स्वयंभू शिवालये ही या विस्तीर्ण पठाराची भूषणे आहेत. श्रीशिवरायांनी स्वराज्याचा पाया इथेच घातला. मोगलांशी लढता लढता स्वराज्याचा पहिला सरसेनापती वीर बाजी पासलकर याने येथेच देह ठेवला. छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला पुरंदर किल्ला येथून जवळच आहे.. व पेशव्यांनी स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करण्याचा उपक्रम इथेच केला. शिवकालीन स्वराज्याचे निष्ठावंत शूर सेवक जाधववाडीचे पिलाजीराव जाधवराव, पानिपतच्या संग्रारमातून पार्वतीबाईंना सुखरूप आणणारा भिवडीचा जानू भिंताडा, नारायणराव पेशवे यांच्या वधप्रसंगी स्वामिनिष्ठेने धन्यास वाचविण्याच्या प्रयत्नांत अंगाच्या खांडोळ्या झालेला एखतपूरचा स्वामिभक्त चाफाजी टिळेकर, अठराशे सत्तावनच्या क्रांतीनंतर इंग्रजांना सतावून सोडणारा भिवडीचा शूर उमाजी नाईक, प्रसिद्ध समाजसुधारक सत्यशोधक महात्मा फुले, लावणीकार पठ्ठे बापूराव व सगन भाऊ, होनाजी बाळा, आचार्य प्र,के. अत्रे, जेजुरीच साहित्यमार्तंंड यशवंतराव सावंत, माळशिरस भुलेश्वरचे प्रसिद्ध साहित्यिक दशरथ यादव आदींच्या कर्तबगारीने, धैर्यशौर्याने उजळून निघालेले हेच ते कऱ्हेपठार. श्री यादव यांनी क-हाकाठावर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन खानवडी येथे सुरू केले. छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनही गेली अकरा वर्षे ते भरवीत आहेत. मराठी साहित्यक्षेत्रात त्यांनी भरीव काम करून पुरंदरच्या वैभवात भरच टाकली आहे. यादवकालीन भुलेश्वर, वारीच्या वाटेवर या महाकादंबरीचे ते लेखक आहेत. सासवड येथे २०१४ रोजी झालेल्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते राज्य प्रसिद्धी समितीचे अध्यक्ष होते.
कऱ्हे पठारालाच काहीजण कडे पठार म्हणतात.
कऱ्हामाई
[संपादन]पांडेश्वर येथे द्रौपदी व कुंतीमातेसह पांडव वास्तव्य करून रहात असत, सदर भागात पाण्याचे दुर्भिक्ष होते. भगवान श्रीकृष्णाने पांडवांना या भागातील पाण्याची टंचाई दूर करण्यासंबंधी विनविले. त्याच वेळी भगवान श्रीकृष्णाने असेही सुचविले की, गराडे येथे ब्रह्मदेव जलपूर्ण कमंडलू घेऊन बसले आहेत. तो कमंडलू कलंडून दिल्यास त्यातून निर्माण होणाऱ्या धारेतून सरिता वाहील. भीम ब्रम्हदेवापाशी गेला, त्याने समाधीमग्न असलेल्या चतुराननास जागृत करण्याचा खूप प्रयत्न केला. ब्रम्हदेव समाधीतून जागे होईनात. नाईलाजाने शेवटी ब्रम्हदेवास सावध करण्यासाठी भीमाने ब्रह्राच्या मस्तकावर शीतल पाण्याचा कमंडलू ओतला. ब्रह्माचा कोप होऊ नये या भीतीने म्हणून तो पूर्वेस पळत सुटला. त्याच्या बरोबरच त्या करातील पाण्याचा प्रवाहही वाहू लागला, थंडपाण्याच्या स्पर्शाने ब्रह्म जागृत झाला व भीमाच्या मागे लागला. श्रीकृष्णाने पूर्वीच सुचविल्याप्रमाणे भीमाने त्या जलप्रवाहाकाठी शिवभक्त ब्रम्हाकरिता पार्थिव शिवलिंगे तयार केली होती. ब्रह्मदेव हा शिवभक्त असल्याने पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्याखेरीज त्यास मार्ग आक्रमिता येईना. त्यामुळे ब्रह्मदेव शिवलिंगस्थळी थांबत व त्या अवधीत भीम पुढे जाई. भीम व जलप्रवाह पुढे पुढे आणि ब्रह्मदेव मागे मागे अशी ही शर्यत पांडेश्वरी समाप्त झाली, पांडेश्वरी श्री कृष्णासह वर्तमान पांडव यज्ञकर्म आचरीत होते. त्यामध्ये ब्रह्मदेवही सामील झाले, त्यांच्या कमंडलूचे नाव होते कर. करामधून जन्मलेली ती कर-जा म्हणजे कऱ्हा. भीमाने ज्या ज्या ठिकाणी पार्थिव शिवलिंगे तयार केली त्या त्या ठिकाणी आजही भव्य शिवालये उभी आहेत. कोटेश्वर, सिद्धेश्वर, वटेश्वर, संगमेश्वर, कमलेश्वर, लवथळेश्वर, पांडेश्वर ही कऱ्हाकाठची शिवालये याच कथेची साक्ष देत आहेत. पांडवांचा यज्ञ संपला परंतु ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून सुरू झालेली कऱ्हा शतके लोटली, युगे लोटली तरी अजूनही वाहतेच आहे. आणि तीरावरील जीवनमळे फुलवीत आहे.
कसबे सासवड
[संपादन]कऱ्हेपठारावर १८.२१° उत्तर अक्षांश व ७४.१° पूर्व रेखांशावर सासवड वसलेले आहे. फार प्राचीन काळी ब्रह्मदेवाने या पुण्यभूमीत गहन तप केले. ही भूमी ब्रह्मदेवाच्या पदस्पर्शाने पुनीत झाली म्हणून तीस त्या काळी ब्रह्मपुरी म्हणत.
ब्रह्मपुरीप्रमाणेच सासवडला ज्ञानेश्वरांच्या काळी संवत्सर असेही नामाभिधान होते. श्रीसंत सोपानमहाराजांच्या समाधीच्या प्रसंगी अनेक अभंगांतून याचे पुरावे आपणांस मिळतात. नामदेवास भगवंत म्हणतात संवत्सरा जाऊनीया त्वरित | समाधी देऊ सोपाना ||
तसेच सोपानमहाराजांनी समाधी घेतल्यानंतर भक्त पुंडलीक आणि उद्धव म्हणतात.
म्हणती पहा हो भाग्याचे केव्हढे | जे कैवल्य ब्रह्म उघडे ||
ऐसे संवत्सर ग्रामे वाडे कोडे | देखीले सकळी की ||
समाधि सोहळ्याचे वर्णन अभंगात नामदेवराय म्हणतात
भक्त समागमे हरी | सत्त्वर आले संवत्सरी ||
फार पूर्वी येथे सहा वाड्या वस्त्या (होत्या).
- वटेश्वरापाशी ‘वरखेडवाडी’
- सिद्धेश्वरपाशी ‘सरडी’
- सदतेहे बोरीचे पटांगण
- ‘संवत्सर गांव’ सोपानदेवापाशी
- ‘दाणे पिंपळगाव’ टाकमाई मंदिरापाशी
- जुन्या भैरवनाथाजवळ ‘सनवडी’
कालमानाने या वाड्यांचे स्वरूप व विस्तार बदलून त्याचे सासवडनामे गावात रूपांतर झाले. या सहा वाड्यांचे सासवड असे नाव पडले असावे असाही एक तर्क आहे.
फार प्राचीन काळी या ठिकाणी सात विशाल वड होते, या सात वडांवरून हे गाव सातवड असे ओळखले जाई. कालांतराने सातवडचा उच्चार सासवड बनला असावा, असाही एक समज आहे.
ऐतिहासिक सासवड
[संपादन]पौराणिक कालापासून देवांची व संतांची पुण्यशील तपोभूमी म्हणून प्रसिद्ध असलेली ही सासवड नगरी कऱ्हामाई व भोगावती (चांबळी) यांच्या पवित्र संगमाच्या उत्तर तीरावर वसलेली आहे.
शिवछत्रपतींच्या तीर्थरूपांचे हे जहागिरीतील गाव. साबगरखिंड, पांगारखिंड, पानवडीची खिंड, बोपदेव घाट, पुरंदर घाट, भुलेश्वरघाट, दिवे घाट, शिंदवणेघाट इत्यादी ठिकाणाहून विविध मार्ग सासवडी एकत्र येतात. त्यामुळे प्राचीन काळापासून एक महत्त्वाचे लष्करी ठिकाण म्हणून सासवड प्रसिद्ध आहे. पुण्यावर हल्ला करण्यास किंवा पुण्याचे रक्षणास या ठिकाणचा सर्वचजण उपयोग करीत. त्यामुळे सासवडला पुण्याचा छावा असे जे संबोधण्यास येते रास्त होय. निसर्गदृष्ट्या सासवड जितके नयनमनोहर, तितकेच हे ऐतिहासिक दृष्ट्या रोमहर्षक, स्फूर्तिदायी आणि वैभवशाली आहे. सासवडच्या अणुरेणूतही तेजस्वी इतिहासाची साक्ष आपणांस आजही इथे उभ्या असलेल्या प्राचीन भव्य वास्तू व ठिकठिकाणी विखुरलेल्या अवशेषांमधून मिळते. यामध्ये भैरोबा मंदिर, सोपानदेवांची समाधी, संगमेश्वर मंदिर, चांगावटेश्वर मंदिर, कऱ्हाबाई मंदिर आदी ठिकाणे येतात. युगपुरुष शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या अनंत इच्छांच्या नौबतीवर इथे पहिले टिपरू पडले. आणि शिवशाहीच्या इतिहासाचा उषःकाल येथेच झाला. फत्तेखानास पराभूत करून लढाईत धारातीर्थी पडलेला वीर पासलकर ऊर्फ यशवंतराव याची समाधी इथे आजही साक्ष देईल.
भैरोबा मंदिर : हे गावातील एक पुरातन मंदिर आहे. याला सुंदर तटबंदी आहे. मंदिर कऱ्हा नदीजवळ असून मंदिरात जाण्यासाठी १०-१२ पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिराच्या दाराजवळ जय-विजय यांच्या मुर्त्या आहेत. दारातून आत जाताच उजव्या हाताला नगारखाना आहे. सणासुदीला हा वाजवला जातो. भैरोबाखेरीज येथे विष्णूच्या दशावतारांचे देखील दर्शन घडते. मंदिराच्या आतील भिंतींवर रामायण, महाभारत, शिवचरित्र आदींमधील चित्रे रेखाटली आहेत.
सोपानदेवांची समाधी : संत ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधू 'संत सोपानदेव' यांची समाधी सासवड येथे आहे. मंदिरात जाण्यासाठी सासवड गावातून रस्ता आहे. हेही मंदिर कऱ्हा नदीतीरी असून मंदिरात जाण्यासाठी १०-१५ पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिरात प्रवेश करताच समोर सिद्धेश्वराचे (शिवमंदिर) मंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात बारा ज्योतिर्लिंगांची सुंदर चित्रे होती. या मंदिराच्या बरोबर मागे सोपानदेव महाराजांचे समाधी स्थळ आहे. मंदिराच्या सभागृहात ६-६.५ फूट उंच अशी मारुतीरायाची मूर्ती आहे. या मूर्तीसमोर अखंड वीणावादन सुरू असते. समाधीस्थळी चौथरा असून त्यावर पितळेचा सुंदर मुखवटा आहे. गाभाऱ्यात विठ्ठल-रुक्मिणी आणि राम-लक्ष्मण-सीता आणि मारुती यांच्यादेखील सुंदर मूर्ती आहे. समाधीचे दर्शन घेऊन प्रदक्षिणेसाठी बाहेर आल्यावर दत्त मंदिर लागते. त्या छोटेखानी मंदिरातील दत्त मूर्तीही देहभान विसरावे अशी सुंदर आहे. तेथून पुढे आल्यावर एका विशाल चिंचेच्या वृक्षाचे दर्शन घडते. या वृक्षाखालूनच समाधीस्थळी सोपानदेव महाराजांनी प्रस्थान केले होते. मंदिराबाहेर आल्यावर उजव्या हाताला नदीपात्रात एक सुंदर कुंड आहे. ते कधीही आटत नाही असे म्हणतात. या कुंडात असलेली गणेशमूर्ती आवर्जून पहावी.
पुरंदर तालुक्याचे ठिकाण असलेले हे गाव व परिसर वैभवी असाच आहे.
मराठयाचा इतिहासाच्या कालखंड मधील पुरंदरचा किल्ला हा महत्त्वाचा किल्ला म्हून ओळखला जातो शिवाजी महाराजाचा पुरंदरचा तहयच्च झाला होता छत्रपती संभाजी महाराजायांचा जन्म याच पुरंदर किल्लावर झाला होता.
बाह्य दुवे
[संपादन]- सासवडची शिवालये Archived 2014-07-10 at the Wayback Machine. - मराठीमाती
- सासवड.इन Archived 2016-04-10 at the Wayback Machine.
संदर्भ
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |