Jump to content

सरेकोप्पा बंगारप्पा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सरेकोप्पा बंगारप्पा (कन्नड: ಸಾರೆಕೊಪ್ಪ ಬಂಗಾರಪ್ಪ ; रोमन लिपी: Sarekoppa Bangarappa) (२६ ऑक्टोबर, इ.स. १९३२; शिमोगा; ब्रिटिश भारत - २६ डिसेंबर, इ.स. २०११; बंगळूर, कर्नाटक) हे कन्नड, भारतीय राजकारणी व कर्नाटकाचे १२वे मुख्यमंत्री होते. १७ ऑक्टोबर, इ.स. १९९० ते १९ नोव्हेंबर, इ.स. १९९२ या कालखंडात यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सांभाळली. हे आपल्या राजकीय कारकिर्दीत वेगवेगळ्या टप्प्यांवर जनता दल (धर्मनिरपेक्ष), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, समाजवादी पक्ष इत्यादी पक्षांचे सदस्य होते.

राजकीय कारकीर्द

[संपादन]

बंगारप्पा इ.स. १९६७ साली कर्नाटक विधानसभेवर प्रथम निवडून आले. त्यानंतर इ.स. १९९०-९२ सालांदरम्यान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या शासनकाळात ते कर्नाटकाचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्रिपदाची मुदत पुरी होण्याअगोदरच त्यांना पद सोडावे लागले. त्यानंतर इ.स. १९९४ च्या सुमारास त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोडून कर्नाटक काँग्रेस पक्ष स्थापला. इ.स. १९९४ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकींत नवनिर्मित पक्षाला फारसे यश मिळाले नाही. तेव्हा राजकीय परिस्थिती निरखून बंगारप्पांनी आपला पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात विलीन करत पक्षात पुनर्प्रवेश केला. पुन्हा इ.स. १९९६ साली बंगारप्पांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षास रामराम ठोकून कर्नाटक विकास पक्ष नावाचा नवीन पक्ष स्थापला. परंतु काही काळातच त्यांनी काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश केला. इ.स. १९९६ साली ते भारताच्या ११व्या लोकसभा निवडणुकींमध्ये खासदार म्हणून प्रथमच निवडून आले. त्यानंतर इ.स. १९९९ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर १३व्या लोकसभेत आणि इ.स. २००३ साली भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर १४ व्या लोकसभेत ते निवडून गेले. इ.स. २००५ साली भारतीय जनता पक्ष सोडून ते समाजवादी पक्षात शिरले. इ.स. २००९ साली समाजवादी पक्ष सोडून ते पुन्हा एकदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झाले. मे, इ.स. २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकींत ते बी.एस. राघवेंद्र यांच्याविरुद्ध निवडणुकींत हरले.

मृत्यू

[संपादन]

अखेरच्या काळात बंगारप्पांना मधुमेहमूत्रपिंडांच्या विकाराचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ७ डिसेंबर, इ.स. २०११पासून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार चालू करण्यात आले. मात्र मूत्रपिंडे निकामी झाल्यामुळे २६ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सुमारे १२:४० वाजता बंगारप्पांचे बंगळुरातील मल्ल्या हॉस्पिटलात निधन झाले[].

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ "एस. बंगारप्पा यांचे निधन". २८ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]