Jump to content

शि.द. फडणीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शिवराम दत्तात्रेय फडणीस या पानावरून पुनर्निर्देशित)
शि. द. फडणीस

पूर्ण नावशिवराम दत्तात्रेय फडणीस
जन्म जुलै २९, १९२५
भोज, बेळगाव जिल्हा, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
प्रशिक्षण सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई
शैली व्यंगचित्र
प्रसिद्ध कलाकृती हसरी गॅलरी, मिस्किल गॅलरी
पत्नी शकुंतला फडणीस
अपत्ये लिना आणि रूपा
संकेतस्थळ

शिवराम दत्तात्रेय फडणीस ( जुलै २९, १९२५, भोज, बेळगाव - हयात) हे मराठी व्यंगचित्रकार आहेत.[]

आपल्या ठसठशीत आणि लयबद्ध शैलीने फडणीस यांनी पाच दशकांहून अधिक वर्षे वाचकांना हसवले आहे. व्यंग्यचित्रे ही नेहमी वेडीवाकडी असतात, त्यांत नेहमी बोचरी टीका असते, असे समज फडणीसांच्या चित्रांनी खोटे ठरवले. विसंगती टिपणारे अनेक प्रसंग त्यांनी आपल्या व्यंग्यचित्रांतून रेखाटले, आणि विसंगतीतून किती निर्विष, सुखावणारा विनोद निर्माण करता येतो, याचा वस्तुपाठ घालून दिला. त्यांच्या शब्दविरहित चित्रांनी अनेक नियतकालिकांची, पुस्तकांची मुखपृष्ठे सजली. पु. ल. देशपांडे, चिं. वि. जोशी यांच्यासारख्या दिग्गज लेखकांच्या पुस्तकांची लज्जतही त्यांच्या चित्रांनी वाढवली.[]

बालपण

[संपादन]

बेळगाव जिल्ह्यातले भोज हे शि. द. फडणीसांचे जन्मगाव असले, तरी ते कोल्हापुरात वाढले. कोल्हापुरात चित्रकलेसाठी अतिशय पोषक असे वातावरण होते. मंडईत किंवा रंकाळ्याला वगैरे ठिकाणी स्केचिंगसाठी मुले जात असतात. फडणीसही या मुलांमध्ये असत. चित्रकलेतली साक्षरता तपासणाऱ्या एलिमेंटरी आणि इंटरमीजिएट ग्रेडच्या परीक्षा शि. द. फडणीसांनी दिल्या, तेव्हा आपल्यातही एक चित्रकार दडला आहे, हे त्यांना कळाले. कलाशिक्षणाची पंढरी असलेल्या मुंबईतील जे. जे. कलामहाविद्यालयात मग त्यांनी प्रवेश घेतला.[]

कारकीर्द

[संपादन]

जे. जे. मधील शिक्षण पूर्ण झाल्यावर आणि व्यंगचित्रकलेची अतिशय आवड असल्याने शि. द. फडणीस हे अनंत अंतरकर यांच्या मदतीने पुण्याला गेले. तेव्हापासून त्यांची चित्रे हंस, मोहिनी, नवल, या मासिकांतून आणि अनेक पुस्तके व नियतकालिकांतून प्रसिद्ध होत राहिली. पुढे १९५२ सालापासून सलग साठ वर्षं अंतरकरांच्या 'मोहिनी'च्या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ रेखाटण्याचा विक्रमही शिदेंनी केला.[]

१९५२ मध्ये मोहिनीच्या मुखपृष्ठासाठी फडणीस यांनी तयार केलेला व्यंगचित्र

त्यांची अनेक चित्रे इंटरनॅशन सलून ऑफ कार्टून्स, माँत्रियाल, कॅनडा येथेही प्रदर्शित करण्यात आली आहेत. त्यांच्या हसरी गॅलरी, चित्रहास, चिमुकली गॅलरी ही चित्रांची प्रदर्शनेही ४० वर्षांत जवळजवळ २० वेगवेगळ्या शहरात मांडण्यात आली आहेत.[]

चित्रकारांची चित्रे त्यांच्या परवानगीशिवाय वापरली जाऊ नयेत यासाठी, शि. द. फडणीस यांनी कायद्याच्या मदतीने प्रताधिकाराचे, म्हणजे कॉपीराइटचे हक्क चित्रकारांना मिळवून दिले.[]

प्रकाशित पुस्तके

[संपादन]
  • Laughing Gallery (हसरी गॅलरी)[]
  • छोट्यांसाठी चित्रकला भाग १[] आणि २[]
  • मिस्किल गॅलरी[]
  • रेषाटन - आठवणींचा प्रवास (आत्मचरित्रपर)[]

फडणीसांच्या पत्‍नी शकुंतला फडणीस (माहेरच्या शकुंतला बापट) यांनी लिहिलेले मी आणि हसरी गॅलरी हे आत्मकथनपर पुस्तकही प्रकाशित झाले आहे.[१०]

सन्मान आणि पुरस्कार

[संपादन]

फडणीस यांना मिळालेले काही सन्मान आणि पुरस्कार:[११]

  • कमर्शियल आर्टिस्ट्स गिल्डने (कॅग) आयोजित केलेल्या चित्रप्रदर्शनात शि.द. फडणीस यांचे १९५४ सालच्या 'मोहिनी'च्या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ निवडले गेले होते. असे होणे मोठे प्रतिष्ठेचे समजले जाते.
  • महाराष्ट्राच्या शालेय पाठ्यपुस्तक मंडळाने गणिताच्या पुस्तकांमध्ये फडणीसांच्या चित्रांचा समावेश केला आहे.गणितातल्या अमूर्त संकल्पना चित्रांद्वारे पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांसमोर मांडणे हे विलक्षण अवघड काम शि.द. फडणीसांनी केले.
  • जर्मनी, इंग्लंड, अमेरिका या देशांमध्ये त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरली होती.
  • शि.द. फडणीस यांना ’सृजन कोहिनूर नावाचा पुरस्कार (२५ हजार रुपये रोख आणि मानपत्र) मिळाला आहे.
  • बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कार्टूनिस्ट्सने त्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.
  • शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या 'कार्टुनिस्ट कंबाईन' या संघटनेचा जीवनगौरव पुरस्कार (एप्रिल २०१६)

आत्मचरित्र

[संपादन]

आपल्या समृद्ध आयुष्याचा पट शि. द. फडणीस यांनी रेषाटन या आपल्या आत्मचरित्रात वाचकांसमोर मांडला आहे.[१२]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "शि. द. फडणीस". jyotsnaprakashan.com. २१ मे २०२३ रोजी पाहिले.
  2. ^ a b बहुळकर, सुहास; घारे, दीपक, eds. (२०१३). शिल्पकार चरित्रकोश खंड ६ - दृश्यकला. मुंबई: साप्ताहिक विवेक, हिंदुस्थान प्रकाशन संस्था. pp. ७४४–७४७.
  3. ^ a b सरवटे, वसंत; जोशी, आर्या. "फडणीस, शिवराम दत्तात्रेय". महाराष्ट्र नायक. २१ मे २०२३ रोजी पाहिले.
  4. ^ देवधर, रपा (८ जानेवारी २०२२). "Eminent Indian Cartoonist – Shri. Shi. Da. Phadnis" (PDF). Visual Melody: E-magazine about Visual Arts in free India. Ravi Paranjape Foundation for Art. 3 (1): 3–31. 2023-05-21 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2023-05-21 रोजी पाहिले.
  5. ^ Phadnis, S. D. "Laughing Gallery". jyotsnaprakashan.com. २१ मे २०२३ रोजी पाहिले.
  6. ^ "छोट्यांसाठी चित्रकला - भाग १". jyotsnaprakashan.com. २१ मे २०२३ रोजी पाहिले.
  7. ^ "छोट्यांसाठी चित्रकला - भाग २". jyotsnaprakashan.com. २१ मे २०२३ रोजी पाहिले.
  8. ^ "मिस्किल गॅलरी". jyotsnaprakashan.com. २१ मे २०२३ रोजी पाहिले.
  9. ^ फडणीस, शि द. "रेषाटन - आठवणींचा प्रवास". jyotsnaprakashan.com. २१ मे २०२३ रोजी पाहिले.
  10. ^ फडणीस, शकुंतला. "मी आणि हसरी गॅलरी". www.bookganga.com. २१ मे २०२३ रोजी पाहिले.
  11. ^ "मी शि. द. फडणीस". लोकसत्ता. ४ ऑगस्ट २०१८. २१ मे २०२३ रोजी पाहिले.
  12. ^ Jadhao, Ganesh (३ ऑगस्ट २०२२). "शि. द. फडणीस ९७". Chinha Art News. २१ मे २०२३ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]