Jump to content

महिला साहित्य संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


महिलांसाठी महिलांनीच चालविलेल्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत. त्यांतील काही संस्थांचा हा परिचय :-

नागपूर शहरातील संस्था

[संपादन]

अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्था

[संपादन]

अभिव्यक्ती ही विदर्भातील एक अतिशय सजग आणि अग्रगणी लेखिका संस्था होय. राम शेवाळकरांनी ही संस्था १९७६ साली स्थापन केली. संस्थेने यमुना शेवडे अध्यक्षा असताना पहिले विदर्भ लेखिका संमेलन भरविले.

‘स्त्रियांचे लेखन म्हणजे काय? तर मासिकात नुसते आपले घरगुती प्रश्‍न सोडवायचे!’ असे त्या काळी म्हणले जायचे. ‘त्यांचे अनुभवविश्‍व काय, घरापुरते.’ परंतु, हा समज कसा अपुरा होता, हे ’अभिव्यक्ती’ने अनेक लेखिका तयार करून दाखवून दिले. विदर्भ साहित्य संघाने ’अभिव्यक्ती’ला पाठबळ दिले. स्त्रियांच्या ठिकाणी असलेल्या उपजत वाङ्‌मयगुणांची ओळख ’अभिव्यक्ती’ने जगाला करून दिली. अधिक सक्षम व्यासपीठ त्यांना मिळवून दिले.

दुसरे विदर्भ लेखिका संमेलन जानेवारी ८४ मध्ये झाले. त्याच्या संमेलनाध्यक्ष होत्या, डॉ. उषा मा. देशमुख. स्त्रीविषयक बोलताना त्यांनी, स्त्री कशी अस्वस्थ आहे, मुक्तीची आणि लढ्याची भाषा बोलू लागली आहे, ते सांगितले. ‘स्त्रीने अनुभवाची उसनवारी घेण्याचे टाळावे,’ असा संदेश त्यांनी दिला. अभिव्यक्तीची वाटचाल चालूच राहिली- आपापल्या साहित्याचे वाचन करणे, नवोदितांचा शोध घेणे, कथावाचन करण्याचे प्रशिक्षण देणे, वगैरे उपक्रम संस्थेने अंमलात आणले. या काळात प्रभा गणोरकर, रूपा कुळकर्णी, सीमा साखरे, कुमुद पावडे, उमा माडखोलकर याही संस्थेच्या उपक्रमांशी संलग्न होत्या.

’अभिव्यकी’ने भरविलेले तिसरे विदर्भ लेखिका संमेलन डॉ. सुलभा हेर्लेकर यांच्या हस्ते पार पडले, तर मार्च १९९० मध्ये डॉ. इंदुमती शेवडे यांच्या हस्ते चौथे संमेलन झाले. ही संस्था १९८७ साली पंजीकृत झाली. पूर्वी श्रीमती तारा शास्त्री, कै. श्रीमती सुगंधा शेंडे या अध्यक्ष होत्या. त्यानंतर बऱ्याच काळपर्यंत ’अभिव्यक्ती’च्या सक्रियतेत खंड पडला होता. मात्र नंतरच्या काळात माला केकतपुरे या अध्यक्ष व लेखिकेच्या हस्ते संस्थेची भरभराट सुरू झाली. त्यांच्याबरोबर उपाध्यक्ष जयश्री रुईकर होत्या.

पुढील काळात कवयित्री कै. डॉ. सुलभा हेर्लेकर, कुमुद मंडलेकर, जयश्री रुईकर, नलिनी खडेकर इत्यादी ’अभिव्यक्ती’च्या अध्यक्ष झाल्या. सध्या (इ.स. २०१३) मराठी लेखिका सुप्रिया अय्यर या अध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष हेमा नागपूरकर व सचिव नलिनी खडेकर आहेत. अशा रीतीने या संस्थेने लेखिकांची फळी तयार करण्याचे फार मोठे व्रत घेतलेले आहे. नागपूरच्या पहिल्या फळीमध्ये कादंबरीलेखिका, कथालेखिका, नाट्यलेखिका, कवयित्री म्हणून, पुढे दुसऱ्या फळीमध्ये अनेक साहित्यिक लेखिका आल्या.

अशी ही ’अभिव्यक्ती’ची वाटचाल. यात अनेक कार्यक्रम चालू असतात. उत्स्फूर्तपणे भगिनीवर्ग त्यात भाग घेतो. छोटेमोठे कार्यक्रम सतत चालू असतात. नवीन साहित्यिक भगिनी तयार होतात.

  • जिजामाता वाचनालय (बजाजनगर) (अध्यक्ष अध्यक्ष दुर्गाताई कानगो)

टिळकनगर महिला मंडळ

[संपादन]

’टिळकनगर महिला मंडळा’ची स्थापना सुमतीबाई पांगारकरांनी १९६३साली केली. अनेक भगिनींना साहित्यक्षेत्रात पुढे आणण्यात हे मंडळ कारणीभूत आहे. नागपूरच्या नाट्यक्षेत्रात सुप्रसिद्ध असलेल्या सुनंदा साठे याच मंडळातून पुढे आल्या. सतत पाच-सहा वर्षे राज्य नाट्यस्पर्धेत त्यांनी लिहिलेल्या आणि बसविलेल्या नाटकांना बक्षिसे मिळत आहेत. त्यांनी नुकताच आपला सुवर्णमहोत्सव साजरा केला. संस्थेच्या २०१३सालच्या माधवी कुळकर्णी आहेत, तर नाट्यतरंग विभागप्रमुख सुनंदा साठे आहेत.

  • नावीन्य कला अकादमी (अध्यक्ष माधुरी आशिरगडे)

पद्मगंधा प्रतिष्ठान

[संपादन]

‘पद्मगंधा प्रतिष्ठान’ ही पश्‍चिम नागपुरातील एक तडफदार अशी संस्था आहे. साहित्यांत अनेकांना मानाचे स्थान प्राप्त करून देण्यात ही संस्था अग्रेसर आहे. मुख्य म्हणजे या संस्थेच्या स्थापनेपासून म्हणजे १९९४ पासून, स्थापनेला वीस वर्षे पूर्ण व्हायच्या आत अनेक लेखक व अनेक लेखिकांना वाङ्‌मयप्रकारात लिखाणाची, काव्य करण्याची, नाटकांत लेखिका, दिग्दर्शक व रंगकर्मी म्हणून नाव कमावण्याची संधी दिली. ही संस्था पुरुष आणि स्त्रिया सर्वांसाठी खुली आहे. संस्था रजिस्टर्ड असली, तरी कुठलीही शासकीय मदत संस्थेला नाही. सुप्रसिद्ध लेखिका शुभांगी भडभडे या संस्थेच्या अध्यक्ष(इ.स. २०१३) आहेत.

संस्थेतर्फे व्याख्यानमाला, संगीतसमारोह, युवा पिढीचे व महिलांचे एकत्र कविसंमेलन कुठल्यातरी निसर्गरम्य स्थळी होत असते. पुस्तकचर्चा, साहित्यिकांशी सुसंवाद, परिसंवाद आणि मुख्य म्हणजे तीन दिवसांचा लेखिका नाट्यमहोत्सव. सतत तेवीस वर्षे हा उत्सव एकाही अडथळ्याशिवाय चालू आहे. विदर्भात नाट्यलेखिका नाहीत, हे विधान यामुळे खोडून निघाले. महाराष्ट्रातला हा एकमेव उत्सव आहे. २०१५ साली नागपुरात २३वे पद्मगंधा साहित्य संमेलन भरले होते.

जीवनगौरव पुरस्कार - समाजासाठी झटणाऱ्या नामवंत, राष्ट्रासाठी वेगळे काहीतरी करणाऱ्या मराठी व्यक्तीला हा ’पद्मगंधा प्रतिष्ठान’तर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. आतापर्यंत आठ मान्यवर व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराशिवाय ’स्त्रीशक्ती पुरस्कार’ही देण्यात येतो. वेगवेगळ्या साहित्यप्रकारांच्या स्पर्धा येथे होतात व सर्व प्रकारच्या लेखक-लेखिकांना त्यामुळे लिखाण करण्यास उत्तेजन मिळते.

या प्रतिष्ठानच्या २०१३सालच्या उपाध्यक्ष- विजया ब्राह्मणकर , विजया मारोतकर, कार्याध्यक्ष- संध्या कुळकर्णी, कोषाध्यक्ष- परिणिता कवळेकर, सचिव- वीणा कुळकर्णी, सहसचिव- स्मृती देशपांडे, नाट्यसमिती प्रमुख- प्रतिभा कुळकर्णी, माला केकतपुरे, संध्या कुळकर्णी, श्यामकांत कुळकर्णी, वसुधा पांडे, छाया कावळे आणि सुचित्रा कातरकर आहेत. शिवाय इतर अनेक साहाय्यक आहेत. प्रत्येक जण आपला आपला विभाग उत्तम रीतीने सांभाळतो. रमेश मेंडुले, देवीदास इंदापवार, वसंतराव दहासहस्र या सर्वांची मदत आहेच. संस्थेचे मराठी साहित्य संमेलन २००६ मध्ये व बालसाहित्य संमेलन २००८ मध्ये भरले होते. ‘पद्मगंधा प्रतिष्ठान’ ही संस्था साहित्यक्षेत्रात अनेक स्त्रियांना मार्गदर्शन करणारी ठरली, यात शंका नाही. परंतु, ही संस्था फक्त स्त्रियांसाठी नाही, तर पुरुषांनाही अनेक विषयांत मार्गदर्शन करणारी ठरली आहे, साहित्यक्षेत्रात वाव देते आहे.

पद्मगंधा प्रतिष्ठान ही संस्था साहित्य क्षेत्रातील कामगिरीसाठी लेखकांना पुरस्कार देते. त्या पुरस्कारांपैकी काही पुरस्कार असे : -

  • डाॅ. कुसुमावती खोत आणि पद्मगंधा प्रतिष्ठान नाट्यलेखन पुरस्कार
  • डाॅ. छाया कावळे पुरस्कार
  • जीवनगौरव पुरस्कार
  • कै. मंदाकिनी लोही समीक्षा पुरस्कार
  • विमलताई देशमुख ललितलेखन पुरस्कार
  • सुधाकुसुम कादंबरी पुरस्कार, वगैरे.

भगिनी मंडळ

[संपादन]

पश्चिमी नागपूरमधील बर्डी भागातल्या ’भगिनी मंडळा’चे वाचनालय विनाशुल्क आहे. वाचनालयाच्या आणि ’भगिनी मंडळा’च्या काही स्त्री-सभासद साहित्यावर लिहितात, आणि लिहिलेले वाचून दाखवितात. बऱ्याच वर्षांपासून ’भगिनी मंडळा’त एकांकिका स्पर्धा चालू आहेत. अनेक भगिनी त्यांत भाग घेतात. बॅडमिंटन कोर्टही चालू असते. ही संस्था बरीच जुनी आहे. सध्या(इ.स. २०१३) जयश्री कानेटकर या संस्थेच्या अध्यक्ष आहेत.

रामनगर महिला मंडळ

[संपादन]

’रामनगर महिला मंडळा’ची स्थापना १९५८ साली झाली. सांस्कृतिक कार्यक्रमांत संस्थेच्या सदस्यांचा सतत सहभाग असतो. धार्मिक, समाजोपयोगी वगैरे अनेक प्रकारचे कार्यक्रम ही संस्था आखत असते. अनेक वर्षांपासून नाटके लिहून ती बसवून सादर करण्यात ही संस्था आघाडीवर आहे. म्हणजेच भगिनींच्या लिखाणाला त्यामुळे चालना मिळते. मुलांकरिता संस्कारवर्गही चालवतात. संस्थेच्या ‘जागरिया’ या नाटकाला राज्यनाट्य स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळालेले आहे. अनेक वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या संस्थेच्या डॉ. विमल फणशीकर या प्रेरणास्थान होत्या. त्यांची कन्या- आकाशवाणीच्या प्रभा देऊस्कर- याही संस्थेच्या नियमित होणाऱ्या उत्सवांत सक्रिय असतात. रामनगर महिला मंडळाच्या पहिल्या अध्यक्ष सरलाताई सुळे व आताच्या(२०१३सालच्या) अध्यक्ष आहेत अनुराधा कुऱ्हेकर. महिलांना एक उत्तम व्यासपीठ या समाजाने दिले आहे.

लक्ष्मीनगर महिला मंडळ

[संपादन]

असेच कार्यक्रम लक्ष्मीनगर महिला मंडळात चालू असतात. यातील लेखिका ’अंकुर’ हे हस्तालिखित काढतात. नाटकाच्या स्पर्धेतही भाग घेतात. लक्ष्मीनगरमध्ये बऱ्याच लेखिका आहेत. स्मृती देशपांडे, वीणा कुळकर्णी, प्रतिभा कुळकर्णी, वगैरे. तर शंकरनगरमध्ये संध्या कुळकर्णी, सौ. केळकर इत्यादी. ज्या लेखिका नाहीत त्या अनेक उद्योग करीत असतात. आता स्त्री उद्योगशील झाली आहे. डॉ. सुनंदा देशपांडे या नाट्यशास्त्राच्या अभ्यासक आहेत. ऊर्मिला देशपांडे या नाटके लिहितात व बसवितात. विजया मारोतकर कविता करतात.

साहित्यविहार

[संपादन]

साहित्यविहार ही संस्था स्त्री-पुरुष- दोघांचीही साहित्यिक संस्था आहे. तिच्या २०१३सालच्या अध्यक्ष या ज्येष्ठ कवयित्री, गझलकार आशा पांडे आहेत.

निखळ मनोरंजनासाठी शंकरनगरमधील काही साहित्यप्रेमी मंडळी एकत्र येत. त्यात काव्य, कथावाचन चाले. त्यांनी या मंडळाची स्थापना १९७१मध्ये केली. मग ही वाटचाल नियमितपणे चालू झाली. दर महिन्याला श्यामकांत कुळकर्णी, श्रीपाद गंगाधर कावळे, डॉ. वि. गो. दुर्गे, प्रा. डॉ. रतनकुमार जैन, बाळकृष्ण बभोरे, वसंतराव देशपांडे, कृ. बा. शिंदे इत्यादी लोक प्रामुख्याने त्यात भाग घेत होते. संस्थेने ‘कोरल’ हा कवितासंग्रह १९७८ साली प्रकाशित झाला. ’साहित्यविहार’तर्फे पुढे अनेक कविसंमेलने व इतर अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले. त्यांत नाटकांतील प्रवेशही सादर झाले. पुढे २००० साली घरगुती कार्यक्रमातून मंडळाचे संस्थेत रूपांतर करण्यात आले व नंतर ९ नोव्हेंबर २०११ साली या संस्थेच्या पूर्ण कार्यकारिणीची आखणी करण्यात आली. पूर्वी आशा पांडे सर्व बघत होत्या. नंतर अध्यक्ष- आशा पांडे, उपाध्यक्ष- श्यामकांत कुळकर्णी, सचिव- डॉ. वसुधा पांडे, सहसचिव-वीणा गानू, कोषाध्यक्ष- विष्णूपंत भगाडे, उपकोषाध्यक्ष- जितेंद्र पटवर्धन व इतर सात सदस्य, अशी कार्यकारिणी तयार झाली.

अनेक पुस्तकांची प्रकाशने ’साहित्यविहार’तर्फे झाली. याकरिता आशा पांडे व त्यांच्या सहकारीवर्गाने बरीच मेहनत घेतली. त्यातून अनेक कवी तयार झाले. साहित्यप्रेमी रसिक लोकांना विद्वतापूर्ण व्याख्यात्यांच्या व्याख्यानांचा रसास्वाद घेता आला.

या संस्थेच्या अध्यक्ष आशा पांडे यांचे काव्यक्षेत्र बरेच विस्तृत आहे. मराठीचे ६ काव्यसंग्रह, सी.डी.’ज, हिंदीचे ३३ कवितासंग्रह, संस्कृतचे २ कवितासंग्रह, उर्दू गजलसंग्रह, इंग्रजी कवितासंग्रह आणि त्यांनी तीन-चार पुस्तकांचे अनुवाद त्यांनी केलेले आहेत. पाच भाषांमध्ये काव्यलेखन करणारी ही एक कवयित्री आहे. त्या महाराष्ट्रातील पहिली गझलकार महिला म्हणून मान्यताप्राप्त आहेत. त्यांनी अनेक कवितासंग्रहांची समीक्षिका म्हणून अनेक कार्यशाळा घेतलेल्या आहेत.

हर्णे महिला समाज

[संपादन]

‘हर्णे महिला समाज’ ही पश्‍चिम नागपुरातील साहित्यिक स्त्रीसंस्था नाही, परंतु साहित्य म्हणजे काय, हे समजावून देण्याचे काम ती हिरिरीने करते.

१९३८ साली काही महिलांनी ‘धरमपेठ महिला समाज’ नावाची संस्था सुरू केली. शांताबाई हर्णे त्याच्या सभासद होत्या. १९४३ साली बोरगाव रेल्वे अपघातात त्यांचे निधन झाले. १९४४ साली काही स्त्रियांच्या मदतीने हर्णे वाचनालय सुरू झाले. धरमपेठ महिला समाज व हे वाचनालय या दोन्ही संस्था एकत्र येऊन २८ जुलै १९५६ मध्ये ’हर्णे महिला समाजा’ची स्थापना झाली. सध्या त्यात वाचनालय, बालकमंदिर, मंगल कार्यालय व्यवस्थित सुरू आहे. साहित्याशी या संस्थेचा संबंध असा की, प्रतिभा कुळकर्णी व डॉ. क्षमा लिमये यांनी १९७५ साली साहित्य सौरभ नावाचा कार्यक्रम सुरू केला. त्यात ‘भावतरंग’ या हस्तलिखिताचे प्रकाशन झाले. त्यामुळे समाजातील अनेक महिला लिहित्या झाल्या, वाचनालयात साहित्यावर स्पर्धा होऊ लागल्या. शिवाजी सावंत, व.पु. काळे इत्यादी मोठ्या लेखकांची व्याख्याने झाली. विदर्भ साहित्य संघाच्या एकांकिका स्पर्धांत लेखिका नाट्यलेखन करू लागल्या. दिग्दर्शन, अभिनय, लेखन, निर्मिती ही बक्षिसे हर्णे महिला समाजाला मिळत. आज अनेक उत्सवांमध्ये साहित्यिक संस्थांच्या प्रमुखांची व विद्वानांची व्याख्याने होतात.

आता सध्या वृंदा घरोटे या समाजाच्या अध्यक्ष आहेत. त्या व त्यांची कार्यकारिणी सर्वच लेखिका, कवयित्री उद्योगशील आहेत. अशा वाचनालयामुळे स्त्रिया घरातून बाहेर पडल्या व त्यांची प्रगती झाली. त्या लिहित्या, वाचत्या झाल्या. चांगले जीवन जगण्याची, मुक्तपणे गप्पागोष्टी करण्याची संधी त्यांना मिळाली. यातील काही लेखिका आता मोठ्या लेखिका म्हणून गाजताहेत. २००६ साली ’हर्णे महिला समाज’चा सुवर्णमहोत्सव पार पडला.

नागपूरमधील महिला संस्थांमधून पुढे आलेल्या साहित्यिक महिला

[संपादन]

पश्‍चिम नागपुरातील महिला संस्थांमधून ५०-६० वर्षांत अनेक लेखिका पुढे आल्या. सुनिती आफळे, वर्षा रेगे, कै. सुलभा हेर्लेकर, कै. ज्योती लांजेवार, जयश्री रुईकर, प्रज्ञा आपटे, विजया ब्राह्मणकर, ज्योती पुजारी, आशा पांडे, आरती कुलकर्णी, आशा बगे, माला केकतपुरे, प्रतिभा कुळकर्णी, शुभांगी भडभडे वगैरे. आणि तारा सावंगीकर, मालती निमखेडकर, मंगला दिघे, कै. शैलजा काळे अरुणा देशमुख, छाया नाईक, आशा सावदेकर, जया द्वादशीवार इत्यादी.