Jump to content

पोलाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्टील या पानावरून पुनर्निर्देशित)
स्टील ब्रिज

पोलाद (इंग्लिश: Steel, स्टील ;) हा लोहकार्बन यांपासून बनवला जाणारा मिश्रधातू आहे. त्यात लोहाचे प्रमाण जास्त असते व कमी प्रमाणात कार्बन असतो. म्हणजेच लोह व कोळसा खाणींचे पोलाद उत्पादनात फार महत्त्व आहे. स्पाँज आयर्न हा घटक पोलादाच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो.

प्रकार

[संपादन]
  • हलके पोलाद - ०.३ टक्केपर्यंत (तीन दशांश)पर्यंत कार्बन असलेल्या पोलादास हलके पोलाद म्हणतात.
  • मध्यम पोलाद ०.३ ते ०.६ टक्के कार्बन असेल तर मध्यम (mild steel) पोलाद संबोधले जाते.
  • उच्च पोलाद - ०.६ टक्क्यावर कार्बन असेल तर त्यास उच्च पोलाद म्हणतात.

पोलादाचा पुनर्वापर होतो. लोखंडी भंगारात पुन्हा नवे पोलाद ओतले जाते. ते असे पुन्हा पुन्हा ओतूनही त्याच्या गुणवत्तेत फरक पडत नाही. तेवढेच मजबूत राहते. जुनी जहाजे तोडूनही त्यातून असे भंगार पोलाद मिळवले जाते. भारतात उत्पादन होणाऱ्या पोलादामध्ये मध्यम पोलादाचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवाद्यांनी विमाने धडकवून ते जमीनदोस्त केले होते. त्या पोलादाचे भंगार बहुतांशी चीनमध्ये गेले व काही भारतात आले.

मिश्रधातू

[संपादन]

पोलादाच्या मिश्रधातूंचा फायदा असा असतो की मूळ धातूपेक्षा वेगळे व चांगले गुणधर्म त्यात असतात. मॅंगेनीज धातू पोलाद निर्मिती प्रक्रियेत वापरून पोलादाचा कणखरपणा वाढवला जातो. त्याच प्रक्रियेत शिसे हा धातूही वापरला जातो. लोखंडापेक्षा पोलाद अनेकपटीने मजबूत, कणखर असते. पोलादामध्ये आणखी एक घटक मिळवून त्यापासून विशेष पोलाद बनवले जाते. उदा: पोलादामध्ये क्रोमियम मिळवले तर त्यापासून स्टेनलेस स्टील बनते. स्टेन - लेस म्हणजे डाग न पडणारे. स्वयंपाकाची भांडी बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. तसेच पोलादात निकेल, तांबे, शिसे, मॅंगेनीझ, सिलिकॉन इत्यादी घटक पदार्थही मिळवून विशेष प्रकारचे पोलाद बनवले जाते. पोलादावर जस्ताचा मुलामा देऊन त्यापासून ग्लॅल्व्हनाईझ्ड पोलाद तयार होते.

मोटारी व मोटरसायकली बनवतांना ज्या घटकांना जास्त तन्यतेच्या धारणेची tensile strengthची गरज नसते पण मोजमापाबद्दलचा अचूकपणा महत्त्वाचा असतो त्या ठिकाणी शिसे मिश्रित पोलाद वापरतात. कारण याद्वारे यंत्रावर एकदा हे कटिंग टूल लावले की त्या टूलची झीज व्हायच्या आत हजारो घटक बनविता येतात.

अशा प्रकारचे पोलादाचे एकूण ऐंशीवर धातू आज ज्ञात आहेत. याशिवाय अनेक मिश्र धातू आहेत. त्यात पोलादाला खूप महत्त्वाचे स्थान आहे.

पोलादाची तार

आर्थिक महत्त्व

[संपादन]

पोलादाचे उत्पादन व वापर किती आहे हे, त्या देशाच्या आर्थिक विकासाचे निर्देशक मानले जाते. कारण त्याचा वापर पायाभूत सुविधा क्षेत्रात होतो. पोलादाचा वापर बांधकाम क्षेत्रात होतो. घरे, पूल बांधताना ते वापरले जाते. वाहन उद्योगात क्षेत्रात, यंत्रे तसेच घरगुती उपकरणे, रेल्वे, वीज अशा क्षेत्रात पोलादाचा वापर होतो. होतो. संरक्षण खात्याच्या साधनसामग्रीत मोठ्या प्रमाणात पोलाद वापरात येते.

पोलाद ओतण्याची भट्टी
वीज वितरणात पोलाद वापरले जाते
घरगुती भांड्यांसाठी स्टेनलेस स्टील पोलादाचा वापर

भारताची स्थिती

[संपादन]

भारतात पोलाद उद्योगाचा पाया जमशेदजी टाटा यांनी घातला. आपल्या देशात पोलाद निर्मीतीचे कारखाने हवेत ह्या ध्येयाने ते पछाडलेले होते. देशातील उच्चभ्रूवर्गाकडून पैसे जमा करून त्यांनी त्याकाळी २ कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवल उभे केले. इ.स. १९०७ साली टाटा आयर्न ॲंन्ड स्टील कंपनीचा पहिला कारखाना कार्यान्वित झाला. यानंतर स्वातंत्र्यापर्यंत पोलाद उत्पादनाचे आणखी कारखाने इतरांनी सुरू केले. इ.स. १९४७ मध्ये भारतात फक्त तीन पोलाद कारखाने होते.

  • टाटा आयर्न अँड स्टील कंपनी
  • इंडियन आयर्न अँड स्टील कंपनी
  • विश्वेशरैया आयर्न अँड स्टील कंपनी

याशिवाय काही छोटे कारखाने होते. हे कारखाने खाजगी क्षेत्रात होते. सर्वाची मिळून दहा लाख टन पोलादाचे उत्पादन करण्याची क्षमता त्या काळात होती.

संमिश्र अर्थव्यवस्था

[संपादन]

संमिश्र अर्थव्यवस्थेत मोठे, अवजड उद्योग सरकारी क्षेत्रांनी चालवावेत असे धोरण होते. त्यानुसार पोलाद उत्पादनाचे क्षेत्र पूर्णपणे सरकारसाठी राखून ठेवण्यात आले. फक्त या धोरणाआधी जे कारखाने सुरू होते ते सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. पण पोलादाच्या एकूणच व्यवहारावर शासनाचे पूर्ण बंधन आले. त्याच्या किंमती, वितरण, आयात, निर्यात, कच्च्या मालाचा पुरवठा, कारखान्यांचा क्षमता विस्तार याबाबी सरकारी नियंत्रणाखाली होत्या. केंद्र शासनाने इ.स. १९५४मध्ये राउरकेला येथे तर, इ.स. १९५९मध्ये भिलईदुर्गापूरइ.स. १९६४ साली बोकारो इथे पोलाद उत्पादनाचे मोठे कारखाने उभे केले.

हे सर्व व टाटांचा कारखाना हे एकात्मिक कारखाने होते. म्हणजे पोलादाच्या उत्पादनासाठी लोह हा प्रमुख कच्चा माल लागतो. तर हे लोह उपलब्ध करून देणाऱ्या खाणीही ह्या कारखान्यांच्या ताब्यात होत्या. सरकारने हे प्रचंड कारखाने सुरू केल्याने इ.स. १९४७ सालातील दहा लाख टन उत्पादनावरून भारत इ.स. १९७० पर्यंत १ कोटी ५० लाख टनापर्यंत पोलाद उत्पादन करू लागला. जगात पोलाद उत्पादनाबाबत आपले दहावे स्थान होते. पण इ.स. १९७० नंतर आर्थिक मंदीमुळे भारताची घसरण सुरू झाली.

लोखंडाच्या निर्मितीची प्रक्रिया

सुधारणा

[संपादन]

सरकारी कारखान्यांच्या कामात सुसूत्रता यावी म्हणून इ.स. १९७३मध्ये स्टील ॲथॉिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच आज सेल नावाने ओळखली जाणारी या सर्व संस्थांची वरिष्ठ कंपनी सुरू करण्यात आली. आज सर्व सरकारी कारखाने तिच्या अखत्यारीत मोडतात. इ.स. १९९०नंतर भारतात उदार आर्थिक धोरणांचा स्वीकार केला. यात पोलादावरील बंधने उठवण्यात आली. इ.स. १९९३साली खुद्द सेलचे खाजगीकरण केले गेले. पोलाद क्षेत्रावरील सर्व बंधने काढून टाकण्यात आली. खाजगी क्षेत्राला कारखाने उभारण्याची, क्षमता विस्तार करण्याची परवानगी देण्यात आली. किंमती, वितरणावरची नियंत्रणे काढून टाकण्यात आली. तंत्रज्ञान आयात करण्यासाठी, परदेशी भांडवलाच्या गुंतवणूकीसाठी मोकळीक देण्यात आली. यानंतर एस्सार स्टील, इस्पात इंडस्ट्रीज, जिंदाल उद्योग समूह यांनी प्रचंड मोठे कारखाने उभे केले. टाटा स्टीलने विस्तार केला. भारत सरकारने इ.स. १९९२ मध्ये विशाखापट्टणम येथे मोठा कारखाना सुरू केला व त्यासाठी राष्ट्रीय इस्पात निगम ही संस्था सुरू केली.

या सुधारणा झाल्यामुळे इ.स. २००४ ते इ.स. २००५ या आर्थिक वर्षात भारतात ४ कोटी ३० लाख टन पोलाद निर्माण झाले. इ.स. २००८ ते इ.स. २००९ साली पॊलाचे उत्पादन ५ कोटी ८० लाख टनापर्यंत वाढले. इ.स. २००९ ते इ.स. २०१० साली ते ६ कोटी ४० लाख टन होते.

प्रमुख संस्था

[संपादन]

पोलाद उत्पादक कंपन्यांची तीन प्रकारे वर्गवारी केली जाते.

  • प्रमुख कंपन्या म्हणजे सेल, टाटा पोलाद व राष्ट्रीत इस्पात निगम.
  • मोठ्या कंपन्या म्हणजे ५ लाख टनांच्यावर क्षमता असलेल्या कंपन्या. यात एस्सार पोलाद, जेएसडब्ल्यू पोलाद, जिंदाल पोलाद अँड पॉवर व इस्पात इंडस्ट्रीज येतात.
  • इतर सर्व कंपन्या. यात क्रूड पोलाद बनवणाऱ्या, फिनिश्ड पोलाद बनवणाऱ्या अनेक कंपन्या येतात.

इ.स. २००८ ते इ.स. २००९ साली आर्थिक सुधारणांचा परिणाम होऊन उत्पादन वाढले आहे. सरकारी क्षेत्राचे योगदान १ कोटी ६३ लाख टनांचे आहे. इ.स. १९९० नंतरच्या नव्या कंपन्यांनी मोठी कामगिरी बजावलेली आहे व त्यांनी १ कोटी टनांवर उत्पादन केले आहे. म्हणजेच पोलाद क्षेत्र सरकारी नियंत्रणातून बंधमुक्त केल्याने त्याचा विकास झाला आहे, असे मानण्यास जागा आहे.

आयात - निर्यात

[संपादन]

देशातील पोलादाच्या गरजेपकी ८७ टक्के उत्पादन देशातच होते तर १३ टक्के आयात पोलादाद्वारे भागवले जाते. पण आपण पोलाद निर्यातही करतो. इ.स. २००८ ते इ.स. २००९ साली आपण ६४ लाख टन पोलाद आयात केले तर ५२ लाख टन निर्यात केले.

टाटा स्टील

[संपादन]

टाटा स्टीलने देशात क्षमता विस्तार केला तसेच परदेशात मोठमोठ्या कंपन्या विकत घेतल्या. इ.स. २००४ मध्ये सिंगापूर येथील नॅटपोलाद , इ.स. २००५ मध्ये थायलंड येथील मिलेनियम पोलाद व इ.स. २००५मध्ये तर स्वतःच्या आकाराच्या तिप्पट मोठी असलेली युरोपातील कोरस कंपनी ताब्यात घेतली. टाटा ग्रुपचे इ.स. २००९ ते इ.स. २०१०मध्ये देशांतर्गत उत्पादन ६५ लाख टन होते तर परदेशातील उत्पादन १ कोटी ५४ लाख टन म्हणजे एकूण उत्पादन २ कोटी १९ लाख टन. टाटा स्टील ही मागील वर्षी जगातील दहावी मोठी पोलाद उत्पादक कंपनी होती. हेमंत नेरुरकर हे टाटा स्टीलचे एमडी आहेत.

स्पाँज आयर्न हा घटक पोलादाच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो व स्पाँज आयर्नच्या उत्पादनाबाबत भारत जगात आघाडीवर आहे. तर पोलाद उत्पादनाबाबत भारत जगात ५ व्या क्रमांकावर आहे. औद्योगिक विकासात पोलादाला इतके महत्त्व असल्याने, इ.स. २००५मध्ये राष्ट्रीय पोलाद धोरण जाहीर करण्यात आले. त्यानुसार इ.स. २०२०पर्यंत भारताने दहा कोटी टनांची उत्पादन क्षमता गाठण्याची तयारी आहे.

प्रदूषण

[संपादन]

शिसं-मिश्रित स्टीलच्या निर्मिती प्रक्रियेत (smelting) निर्माण होणारा शिस्याचा कचरा हवेबरोबर वाहात जातो व आसमंतात पसरतो. तो आजूबाजूच्या हवेबरोबर पाण्यातही शिरतो व प्रदूषण करतो. या स्रोतांमधून तो आणि तिथून मग सजीवांच्या शरीरात प्रवेश करतो.

भविष्य

[संपादन]
  • भारतात आणखी काही नवे पोलाद कारखाने येत्या काळात सुरू होतील. दक्षिण कोरिया येथील पास्को ही कंपनी १ कोटी २० लाख टन पोलाद उत्पादन करण्याची क्षमता असलेला कारखाना उभारणार आहे. ओरिसाच्या पूर्व भागात सुमारे चार हजार एकरहून जास्त जमिनीवर हा पोलाद निर्मितीचा प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पासाठी असलेल्या जमिनीपैकी सुमारे ७५ टक्के जमीन ही वन खात्याची आहे.
  • पोलाद उत्पादनात जगात अग्रणी असलेली आर्सेलर मित्तल ही कंपनी आपली भारतातील सहयोगी कंपनी उत्तम गल्वाला सोबत घेऊन पश्चिम महाराष्ट्रात १५ हजार कोटी रुपये खर्चून पोलाद निर्मितीचा कारखाना उभारणार आहे. या कारखान्यातून दरवर्षी ३० लाख टन पोलादाची निर्मिती होणार आहे.