साबरी खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उस्ताद साबरी खां (जन्म : मुरादाबाद, २१ मे, इ.स. १९२७; - दिल्ली, १ डिसेंबर, २०१५) हे एक सारंगीवादक होते.

गायनाला साथसंगत करणारे सारंगी हे वाद्य प्रत्यक्ष गळ्यातील आवाजाबरहुकूम वाजू शकते. ही खासियत अन्य कोणत्याच वाद्यात नाही. साबरी खाँ यांनी अतिशय मेहनतीने हे कौशल्य आत्मसात केले होते.

खाँसाहेबांच्या घराण्यालाच सारंगीचा संपन्न वारसा लाभलेला होता. त्यांचे आजोबा उस्ताद हाजी महंमद खान आणि वडील उस्ताद छज्जू खान यांच्याकडून तालीम मिळाल्यानंतर स्वप्रतिभेने साबरी खाँ यांनी सारंगीला आपला चेहरा प्राप्त करून दिला. त्यामुळे जगभर प्रवास करून खाँसाहेबांनी आपला रसिकवर्ग तयार केला. साबरी खाँ यांचे अफगाणिस्तान, इंग्लंड, इटली, अमेरिका, कॅनडा. चीन, जपान, जर्मनी, झेकोस्लावाकिया, नॉर्वे, नेदरलँड्ज, पाकिस्तान, फ्रान्स, फिनलंड, मेक्सिको, बल्गेरिया, रशिया, स्वीडन सारख्या अनेक देशांत कार्यक्रम होत असत. साबरी खाँ यांनी येहुदी मेन्यूहीन, पंडित रविशंकर यांच्याबरोबर वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीत सादर केलेले कार्यक्रम म्हणूनच लक्षात राहणारे ठरले.

साबरी खाँ यांचे घराणे सैनिया घराणे म्हणून ओळखले जाई. या घराण्याचा संबंध थेट तानसेनशी होता.

वारसा[संपादन]

उस्ताद साबरी खां यांचे चिरंजीव कमल साबरी हे सारंगीवादक आहेत, तर दुसरे चिरंजीव सरवर साबरी हे तबलावादक आहेत.

साबरी खाँ यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]

  • उत्तर प्रदेश संगीत नाटक अकादमी पुरस्कार
  • उत्तर प्रदेशच्या साहित्य कला परिषदेचा पुरस्कार
  • उस्ताद चाँद खान पुरस्कार
  • टागोर रत्‍न पुरस्कार
  • पद्मश्री
  • पद्मभूषण
  • बेगम अख्तर पुरस्कार
  • राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार