Jump to content

सामाजिक कार्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(समाजकार्य या पानावरून पुनर्निर्देशित)

सामाजिक क्रिया किंवा समाज सेवा ही एक शैक्षणिक शाखा आणि सराव-आधारित व्यवसाय आहे ज्याचा संबंध व्यक्ती, कुटुंब, गट, समुदाय आणि संपूर्ण समाजाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक आणि सामूहिक कल्याणासाठी आहे.[] सामाजिक कार्य हे मानसशास्त्र, समाजशास्त्र, आरोग्य, राज्यशास्त्र, समुदाय विकास, कायदा, आणि अर्थशास्त्र यांसारख्या क्षेत्रांमधून प्रणाली आणि धोरणांमध्ये गुंतण्यासाठी, मूल्यमापन आयोजित करणे, हस्तक्षेप विकसित करणे आणि जबाबदारी वाढवण्याशी संबंधीत आहे. सामाजिक कार्याच्या अंतिम उद्दिष्टांमध्ये लोकांचे जीवन सुधारणे, चिंता दूर करणे, व्यक्ती आणि समुदायांचे सक्षमीकरण आणि सामाजिक न्याय साध्य करणे हे समाविष्ट आहे.[][]

समाजकार्य ही कल्याणकारी कृती आहे. समाजकार्य हे मानवतावाद, शास्त्रीय ज्ञान व तांत्रिक कौशल्ये ह्यांवर आधारित आहे. व्यक्ती, गट किंवा समुदायाचे आयुष्य अधिक परिपूर्ण करण्याचा त्यात प्रयत्न आहे. ह्या सर्व व्याख्यांचा साकल्याने विचार केल्यास त्यांतील काही प्रमुख उद्देशांची तसेच कार्यपद्धतीची कल्पना येते.[]

(१) समाजकार्य ही एक संघटित व्यावसायिक सेवा आहे. त्याकरिता प्रशिक्षित स्वयंसेवक तयार केले जातात. असे प्रशिक्षण देणाऱ्या विविध शैक्षणिक संस्था आहेत.

(२) मानवी वर्तनातून व सामाजिक परिस्थितीतून जे प्रश्न निर्माण होतात, त्या संदर्भात काम करण्यासाठी विशिष्ट ज्ञान व कौशल्ये लागतात.

(३) मानवी वर्तणुकीचे व सामाजिक परिस्थितीचे विश्र्लेषण करणे, हे महत्त्वाचे असते.

(४) वैयक्तिक किंवा सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी विशिष्ट तंत्र व पद्धती वापरल्या जातात.

(५) सामाजिक समायोजनावर अधिक भर दिला जातो.

(६) फक्त प्रश्र्न सोडविण्यावर भर नसून असे प्रश्न पुनःपुन्हा निर्माण होऊ नयेत, म्हणूनही प्रयत्न केले जातात.

(७) समाजाच्या विकासासाठी सर्व साधनांचा उपयोग करण्याचा प्रयत्न असतो.

समाजकार्याचे मुख्य ध्येय, सामाजिक कार्यक्षमता वाढविणे हे होय. समाजकार्यांची तत्त्वप्रणाली ही लोकशाही तत्त्वांवर आधारित असून सामाजिक न्याय, समता, समानता व विकास ही तत्त्वे महत्त्वाची मानली आहेत. समाजकार्य तीन घटकांनी बनले आहे:[]

(१) ज्ञान-मानवी वर्तणुकीचे ज्ञान हा पाया आहे. समाजरचना, समाजजीवन, सामाजिक प्रथा, रूढी-परंपरा, समस्या का निर्माण होतात, ह्याचे ज्ञान अभिप्रेत आहे. त्याचप्रमाणे ह्या समस्या सोडविण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या सर्व संसाधनांची माहिती असणे महत्त्वाचे आहे.

(२) कौशल्ये-समाजातील सर्व स्तरांतील लोकांबरोबर समस्या निरा-करणाचे काम करताना संवाद साधण्याचे कौशल्य सर्वांत महत्त्वाचे आहे. लोकसंपर्क व लोकांचा विश्र्वास संपादन करण्याची क्षमता महत्त्वाची आहे.

(३) तत्त्वप्रणाली-व्यक्तींवर विश्र्वास, प्रत्येक व्यक्तीच्या क्षमतेवर विश्र्वास, व्यक्तीचा माणूस म्हणून आदर. कुठल्याही बाबीवर भेदाभेद अमान्य असून प्रत्येक व्यक्तींमध्ये अनेक क्षमता असतात व योग्य संधी मिळाल्यास, त्या विकसित होऊन व्यक्ती संपूर्ण स्वावलंबी बनू शकते ह्यावर दृढविश्वास.

समाजकार्य करण्याच्या विशिष्ट पद्धती विकसित झालेल्या आहेत. व्यक्तिसहाय्य कार्य, गटकार्य, समुदाय संघटन, समाजकल्याण प्रशासन, समाजकार्य संशोधन व सामाजिक कृती ह्या समाजकार्याच्या पद्धती आहेत.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Global Definition of Social Work | International Federation of Social Workers". ifsw.org (इंग्रजी भाषेत). May 13, 2019 रोजी पाहिले. The following definition was approved by the IFSW General Meeting and the IASSW General Assembly in July 2014: [...] 'Social work is a practice-based profession and an academic discipline that promotes social change and development, social cohesion, and the empowerment and liberation of people. [...]'
  2. ^ Francis J. Turner (7 September 2005). Encyclopedia of Canadian Social Work. Wilfrid Laurier Univ. Press. pp. 219, 236. ISBN 978-0-88920-436-2.
  3. ^ Austin, Michael J. (December 2018). "Social Work Management Practice, 1917–2017: A History to Inform the Future". Social Service Review (इंग्रजी भाषेत). 92 (4): 548–616. doi:10.1086/701278. ISSN 0037-7961.
  4. ^ a b c "समाजकार्य". मराठी विश्वकोश. १५ नोव्हेंबर २०२३ रोजी पाहिले.