शांता श्रीनिवास राव
डॉ. शांता श्रीनिवास राव | |
---|---|
जन्म |
२२ जानेवारी, १९२३ बंगळुरू, कर्नाटक |
मृत्यू |
३ डिसेंबर, १९७९ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
पेशा | वैद्यकीय |
पदवी हुद्दा | वैद्यकीय संशोधिका |
धर्म | हिंदू |
जोडीदार | श्रीनिवास सवूर राव |
डॉ. शांता श्रीनिवास राव (२२ जानेवारी, १९२३:बंगळुरू, कर्नाटक – ३ डिसेंबर, १९७९) या एक वैद्यकीय संशोधिका आहेत.
व्यक्तिगत जीवन
[संपादन]डॉ. शांता राव (पूर्वाश्रमीच्या बसरूर) यांचा जन्म बंगळुरू येथे झाला. त्यांचे शालेय, तसेच पदवीपर्यंतचे शिक्षण बंगळुरू तेथेच झाले. विज्ञानातील पदवी मिळवल्यावर उच्च शिक्षणाकरिता त्या टोरॅंटो विद्यापीठ, कॅनडाला रवाना झाल्या. पदव्युत्तर शिक्षणाकरिता त्यांना राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेची शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यानंतर त्या भारतात परतल्या आणि त्याच सुमारास त्यांचा श्रीनिवास सवूर राव यांच्याशी त्याचा विवाह झाला. दोघांनीही हाफकिन इन्स्टिट्यूट, मुंबई येथे संशोधनास सुरुवात केली.
वैद्यकशास्त्रज्ञ कारकीर्द
[संपादन]डॉ. शांता यांना जंतुजीवशास्त्रातील प्रबंधाला १९५३ साली मुंबई विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी बहाल केली. १९५६ साली त्यांना कर्करोग संशोधन संस्थेत (सी.आर.आय.) जीवरसायन शास्त्रज्ञ म्हणून नेमण्यात आले. एका वर्षातच भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने त्यांची प्रजनन इंद्रिय विज्ञान (रिप्रॉडक्टिव्ह फिजियॉलॉजी युनिट, आर.पी.यू.) संचाच्या प्रमुख म्हणून नियुक्ती केली व त्यांच्या संशोधनकार्याचे महत्त्व ओळखले. कर्करोग संशोधन संस्थेचे निर्देशक डॉ.व.रा. खानोलकर यांनीही त्यांच्या संशोधनकार्याला प्रोत्साहन दिले. आर.पी.यू.च्या मुख्य डॉ. शांता राव आणि कुटुंबनियोजन संचाच्या (कॉन्ट्रासेप्टिव्ह टेस्टिंग युनिट, सी.टी.यू.) डॉ. केतायून वीरकर यांनी एकत्र येऊन, भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या आधिपत्याखाली १९७० साली प्रजनन संशोधन संस्थेची (इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्शन, आय.आर.आर.) सध्याचे नाव राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ, एन.आय.आर.आर.एच.) स्थापना केली. डॉ. शांता राव यांनी मुख्यत्वेकरून प्रतिकार-जीवशास्त्रात (इम्युनोलॉजी) सातत्याने संशोधन केले. त्यांनी गोनॅडोटॉपीन्स या (हार्मोन्सना) विकरांना प्रतिबंध करणारी प्रतिपिंडे (अॅन्टिबॉडी) तयार करण्याच्या शरीराच्या क्षमतेचा शोध घेतला. तसेच शुक्रजंतूचे प्रतिपिंड माणसाच्या शरीरात आढळल्यास वंध्यत्व येऊ शकते, हे दाखवून दिले. डॉ. शांता रावांनी इंडियन सोसायटी फॉर स्टडी ऑफ रिप्रॉडक्शन अँड एन्डोक्रायनॉलॉजी (आय.एस.एस.आर.ई.)ची स्थापना १९७१ साली केली. त्यामुळे प्रजनन स्वास्थ्य आणि कुटुंबनियोजन या क्षेत्रात कार्य करण्यास तरुण रक्ताला वाव मिळत गेली. त्यांच्या हाताखाली तीसपेक्षा जास्त शिष्यांनी एम.एस्सी./डॉक्टरेट पदवी संपादन केली. त्यांचे शंभरहून अधिक प्रबंध राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेले आहेत. जागतिक आरोग्य संस्था (डब्ल्यू.एच.ओ.) जिनिव्हा, तेल अविव विद्यापीठीय वैद्यकीय शाळा, इस्रायल; आंतरराष्ट्रीय इम्युनॉलॉजी सोसायटी, बल्गेरिया अशा अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांवर त्या सल्लागार होत्या. त्या ‘कॉन्ट्रासेप्शन’ या अमेरिकन नियतकालिकाच्या, तसेच ‘युनायटेड नेशन्सच्या इकनॉमिक आणि सोशल कमिशन फॉर एशिया आणि पॅसिफिक’च्या संपादकीय मंडळात होत्या. १९७७ साली त्या संस्थेच्या संचालक झाल्या. त्याच सुमारास त्यांनी नालासोपाऱ्याजवळ ससुनागर येथे ४० एकर जागा घेतली, तेथे आता माकडांवर संशोधन करण्यासाठी ‘नॅशनल सेंटर फॉर प्राइमेट ब्रीडिंग अँड रिसर्च’ची स्थापना होत आहे.
सन्मान व पुरस्कार
[संपादन]डॉ. शांता यांना शकुंतला देवी अमीरचंद पारितोषिक, जी.टी. वाटुमल सन्मान, मेटचनिकॉफ पदक असे अनेक सन्मान मिळाले.