Jump to content

वृद्धेश्‍वर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वृद्धेश्वर महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील गाव आहे.

अहमदनगरवरून पाथर्डीला जाताना करंजी घाट उतरला की देवराई गाव लागते. इथे उजवीकडचा रस्ता वृद्धेश्वरला जातो. वृद्धेश्वर हे गाव ब्रह्मपुराणामध्ये उल्लेख असलेल्या वृद्धा नदीकाठी वसले आहे. अत्यंत रम्य ठिकाण असलेल्या या गावी एक पुरातन शिव मंदिर आहे. मंदिराच्या पाठीमागे गर्भगिरी डोंगर आहे. पार्वतीने इथे तपश्चर्या केल्यावर सर्व देवांना भोजन दिले. त्या प्रसंगी शंकर भगवान एका म्हाताऱ्याचे रूप घेऊन आले आणि त्यांनी सर्व देवतांना भोजन वाढले. त्यामुळे इथला देव हा म्हातारदेव अशी सुंदर आख्यायिका ग्रामस्थ सांगतात. तसेच नवनाथ भक्तिसारामध्ये म्हातारदेव असा उल्लेख आहे.

Website:https://shrivridheshwar.in Archived 2022-02-28 at the Wayback Machine.

दंतकथा आणि श्रद्धा[संपादन]

वृद्धेश्वर शब्दाची उत्पत्ती सांगताना इथे असे सांगतात की दर वर्षी महाशिवरात्रीला इथली शिविपिंडी गव्हाच्या एका दाण्याएवढी वृद्धिंगत होते म्हणून हा वृद्धेश्वर. शिविपडीवर एक खळगा असून त्यात कायम पाणी असते. काशीची गंगा इथे प्रकट झाली आहे अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे. मंदिराचा पेशवेकाळात जीर्णोद्धार झाला असावा. पश्चिमाभिमुख असलेल्या मंदिराला सूर्यप्रकाश थेट पिंडीवर पाडण्यासाठी तीन मोठे झरोके ठेवलेले आहेत. अतिशय रम्य परिसरामध्ये एक बारव, ज्ञानेश्वर मंदिर, कपिलमुनी मंदिर अशी छोटी देवळे इथे आहेत. मंदिरात एक पंचधातूची घंटा आहे. मूळच्या घंटेची ही प्रतिकृती असून मूळ घंटेवरील शिलालेख या घंटेवरही कोरला आहे. त्यानुसार ही घंटा बाराव्या शतकातील कोणा प्राणदेवराजाने मंदिराला दान दिल्याचा उल्लेख दिसतो. श्री शंकरमहाराज या सत्पुरुषांचे वास्तव्य या ठिकाणी झाले होते असे ग्रामस्थ सांगतात.