विनोदी साहित्य संमेलन
Appearance
ऑक्टोबर १ इ.स.१९८३ रोजी मुंबईत पहिले मराठी विनोद साहित्य संमेलन झाले होते. त्याचे उद्घाटन गंगाधर गाडगीळांनी केले होते. त्यानंतर नजीकच्या काळात मात्र असे संमेलन झाले नसावे.
मात्र, पुढे अनेक वर्षांनी, मुंबई (माहीम) येथील दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राने(DMCC) १९ ते २१ नोव्हेंबर २०१० या काळात तीन दिवसांचे विनोदी साहित्य संमेलन भरवले. या संमेलनासाठी दैनिक देणगी ५० रुपये होती.
संमेलनात --
- पहिल्या दिवशी संध्याकाळी साडेचारला वसंत सरवटे यांच्या हस्ते हास्यचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
- नंतर साडेपाचला द.मा. मिरासदार यांनी संमेलनाचे उद्घाटन केले.
- उद्घाटनानंतर मिरासदार यांचे ’चिं.वि. जोशींचा विनोद' या विषयावर व्याख्यान झाले.
- दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता प्रा. अनंत मनोहर यांचे ’पु.लं.चा विनोद' या विषयावर व्याख्यान झाले.
- त्यानंतर ’वाहिन्यांवरील विनोदी कार्यक्रमांचा दर्जा आणि प्रेक्षकांची अभिरुची' या विषयावर डॉ. विश्वास मेहेंदळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. त्यात सचिन मोटे, श्रीरंग गोडबोले, केदार शिंदे आणि कांचन अधिकारी यांनी भाग घेतला होता.
- शेवटच्या दिवशी या संमेलनातील कार्यक्रमांत सुरुवातीला सकाळी साडेनऊ वाजता प्रा. अनंत भावे यांच्या अध्यक्षतेझाली ’वृत्तपत्रीय ललित स्तंभलेखनातील विनोदाचे स्वरूप आणि परिणाम' हा परिसंवाद झाला. परिसंवादात शिरीष कणेकर, तंबी दुराई, मुकुंद टाकसाळे, अशोक नायगावकर आणि मंगेश तेंडुलकर सहभागी झाले होते.
- दुपारी १२ वाजता ’गप्पा व्यंगचित्रकारांशी' या कार्यक्रमादरम्यान रघवीरकुल यांनी विकास सबनीस, श्रीनिवास प्रभुदेसाई, मंगेश तेंडुलकर, वसंत सरवटे, विवेक मेहेत्रे व संजय मिस्त्री यांच्याशी जाहीर गप्पा मारल्या.
- त्यानंतर दुपारी चार वाजता डॉ. द.ता. भोसले यांचे ’ग्रामीण साहित्यातील विनोद' या विषयावर व्याख्यान झाले.
- त्यानंतर डॉ. सुभाष भेंडे यांनी या संमेलनाचा समारोप केला.
- संमेलन संपल्यानंतर संध्याकाळी सात वाजता ’लव्ह अँड द ब्लाईंड' आणि ’बंदेमे था दम' या दोन एकांकिका व्यासपीठावर सादर झाल्या.