विकिपीडिया:सद्य घटना/ऑगस्ट २००८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑगस्ट २००८
सो मं बु गु शु सो मं बु गु शु सो मं बु गु शु सो मं बु गु शु सो मं बु गु शु
<< १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ >>


आजचे छायाचित्र                                                                                  दि. १९ एप्रिल २०२४, शुक्रवार


दि. ३१.०८.२००८[संपादन]

चिंकारा शिकार प्रकरणी अत्रामांना अखेर अटक
चिंकारा हरीण शिकारप्रकरणी माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा अत्राम यांना शनिवारी अटक करण्यात आली. सासवडच्या न्यायदंडाधिकार्‍यांनी त्यांना चौदा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला; मात्र अत्राम याची तब्येत बिघडल्याने त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. लोणावळा येथील एक हॉटेल चालक सय्यद अली हुसेन यालाही या प्रकरणात न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.
सकाळ


भारताचे निकष ओलांडल्यास एनएसजीची सूट अमान्य
नागरी अणुसहकार्य कराराबाबत भारताने ठरविलेले निकष (रेड लाइन्स) ओलांडल्यास अणुपुरवठादार गटाकडून (एनएसजी) मिळणारी सूट आम्हाला अमान्य असेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम.के. नारायणन यांनी शनिवारी (ता. ३०) केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. एनएसजीकडून अणुचाचणी, भारताच्या अणुकार्यक्रमाचा कालबद्ध आढावा आणि अणुइंधन अथवा अणुतंत्रज्ञानाच्या हस्तांतरास नकार देण्याबाबत कोणताही मुद्दा नव्या मसुद्यात सुचविण्यात आला, तर तो भारताला अमान्य असेल. त्यावर मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून मार्ग काढण्यात येईल, असे ते म्हणाले.
सकाळ


ओरिसातील कंधमालमध्ये हिंसाचार सुरूच
दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश असतानाही ओरिसातील कंधमाल जिल्ह्यात शनिवारी हिंसाचाराच्या घटना घडल्या. समाजकंटकांनी २४ घरांना आग लावली. जिल्ह्यातील पेटपांग गावात दोन अनोळखी व्यक्तींचे मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे हिंसाचारात बळी गेलेल्यांची संख्या १४ झाल्याचे प्रशासनाने सांगितले; मात्र अनधिकृत सूत्रांच्या म्हणण्यानुसार बळींची संख्या १९ झाली आहे.
सकाळ


ख्यातनाम उद्योगपती के.के.बिर्ला यांचे निधन
साखर, खते, कापड, अवजड उद्योग, जहाजबांधणी यांसारख्या क्षेत्रांमध्ये विलक्षण ठसा उमटविणारे आणि बिर्ला उद्योग समूहाचे अर्ध्वयू कृष्णकुमार ऊर्फ के.के. बिर्ला यांचे आज सकाळी साडेसात वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते नव्वद वर्षांचे होते. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांना प्रकृतिअस्वास्थ्य जाणवत होते. आज सकाळी येथील बिर्ला पार्कमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी आपला अखेरचा श्‍वास घेतला. त्यांचे बंधू बी.के.बिर्ला हे मृत्युसमयी त्यांच्या जवळ होते. श्री. बिर्ला यांची पत्नी मनोरमा देवी यांचे महिनाभरापूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्या पश्‍चात नंदिनी नुपानी, ज्योती पोद्दार आणि शोभना भारती या तीन मुलींचा समावेश आहे.
सकाळ

दि. ३०.०८.२००८[संपादन]

चतुरस्र अभिनेत्री जयश्री गडकर यांचे निधन
सांगत्ये ऐका, एक गाव बारा भानगडी, मानिनी, रंगपंचमी, साधी माणसं, मोहित्यांची मंजुळा असे वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट आपल्या अभिनयाविष्काराने गाजविणार्‍या आणि बुगडी माझी सांडली गं या लावणीने तमाम मराठी मनाला डोलायला लावणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर (वय ६६) यांचे आज पहाटे तीन वाजता येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे पती बाळ धुरी तसेच मुलगा आणि सून असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दुपारी तीन वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
सकाळ


नॅनो प्रकल्पातून कामगारांना हलविले
तृणमूल काँग्रेसच्या आंदोलनामुळे वैतागून टाटा मोटर्स कंपनीने येथील नॅनो निर्मिती प्रकल्पातून सर्व कामगारांना हलविले आहे. कामगारांची सुरक्षितता याच मुद्द्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, पश्‍चिम बंगालमधून हा प्रकल्पच हलविण्याची ही तयारी नाही, असे सध्या सांगण्यात येत आहे. तृणमूल काँग्रेसने गेले सहा दिवस चालविलेल्या प्रकल्पविरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. गेले दोन दिवस कामगारांना मारहाणही झाली होती. त्यामुळे प्रकल्पातील कामगारांची उपस्थिती १५ टक्केच होती. शुक्रवारी प्रकल्पातील अभियंते, अधिकारी आणि तांत्रिक कर्मचारी, अशा सुमारे ८०० जणांपैकी कोणीही कामावर आले नाही. सुमारे ५०० कामगारांना कंपनीने प्रकल्पस्थळी न येण्यास सांगितले. गुरुवारी संध्याकाळी कंपनीतील कामगारांच्या चार ते पाच बस आंदोलकांनी अडवून ठेवल्या होत्या. पोलिसांनी मध्यस्थी करून त्यांची सुटका केली होती.
सकाळ


आयएसआयकडून सुपर टेररिझमचा वापर
बाँबस्फोट, महत्त्वाच्या स्थळांवर हल्ले आणि बनावट नोटा चलनात आणणे यांसारख्या कारवाया करत, भारताला अडचणीत आणण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने आतापर्यंत प्रयत्न केले आहेत. मात्र, आयएसआयकडून या छुप्या लढ्याच्या पारंपरिक पद्धतीत बदल करत सुपर टेररिझमचा वापर करण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. आयएसआय पुरस्कृत दहशतवादी रासायनिक, आण्विक आणि जैविक अस्त्रांचा वापर करण्याचा इशारा केंद्रीय गृह मंत्रालयाने दिला आहे. गृह मंत्रालयाने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला असून, त्यात हा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत सुरक्षा दलांनी काही स्लिपर सेलना पकडले असून, त्यांची कार्यशैली पाहता त्यांच्याकडून अंतर्गत सुरक्षेला भविष्यात मोठा धोका असल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच पुढील काळात विमान, बस किंवा इतर सार्वजनिक वाहनांमध्ये घातपात करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे किमान तंत्रज्ञान वापरून मोठी हानी करणे सहज शक्‍य होणार आहे.
सकाळ

हे सुद्धा पहा[संपादन]