विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विकिपीडिया:जाहिरात या पानावरून पुनर्निर्देशित)

विकिपीडिया हा लोकसहभागातून आंतरजालावर (इंटरनेट) संपादित केलेला मुक्‍त ज्ञानकोश आहे. एका अर्थाने हा दर्जेदार ज्ञानकोशाचे संकलन करण्यासाठी परस्परांबद्दल आदर राखून सहकार्य, समन्वय साधणाऱ्या व्यक्तींचा ऑनलाइन समुदाय आहे. त्यामुळे विकिपीडिया काय नव्हे याचेही सर्वसंमत संकेत आहेत.

शैली व फॉरमॅट

विकिपीडिया छापील ज्ञानकोश नाही

विकिपीडियातील लेख छापील ज्ञानकोशाप्रमाणे स्थायी नसून, ऑनलाइन ज्ञानकोश प्रकल्प आहे. त्यामुळे विकिपीडियावर ताजी व साधार माहिती पुरवणारे बदल सातत्याने घडणे अपेक्षित असते.

आशय

विकिपीडिया शब्दकोश नव्हे

विकिपीडिया म्हणजे शब्दकोश नव्हे. येथील लेखांत शब्दकोशांप्रमाणे शब्दाचा/ संकल्पनेचा केवळ अर्थ लिहिणे अपेक्षित नसून शब्दकोशातील नोंदीपेक्षा अधिक सखोल, अधिक विस्‍तृत व मुद्देसूद माहितीचे संकलन होणे अपेक्षित आहे. मराठी शब्दकोशात भर घालायची असल्यास मराठी विक्शनरी प्रकल्पास भेट द्यावी.

विकिपीडिया मूळ साहित्य अथवा विचार प्रकाशित करण्याचे माध्यम नव्हे

विकिपीडियावरील लेखन मूळ साहित्यकृती अथवा एखादे मूळ संशोधन असणे अपेक्षित नाही. अन्यत्र याआधी मांडलेल्या इतरांच्या साहित्याचा, माहितीचा, लेखनाचा किंवा संशोधनाचा संदर्भ म्हणून आधार देणे, मागोवा घेणे विकिपीडियावर अपेक्षित आहे. त्यामुळे स्वनिर्मित मूळ साहित्य, विचार, संशोधन प्रकाशित करण्याचे माध्यम म्हणून विकिपीडिया वापरू नये.

विकिपीडिया प्रचाराचे अथवा जाहिरातीचे साधन नव्हे

विकिपीडिया कोणत्याही बिगर-व्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रसाराचे, जाहिरातीचे किंवा आपल्या फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष माहिती मांडण्याचे साधन नाही. परंतु संबधित माहितीची यथायोग्य नोंद घेण्यास या धोरणाची आडकाठी नाही.

विकिपीडिया म्हणजे चित्रे, माध्यम संचिका, दुवे अथवा स्रोत मजकुराच्या साठवणुकीचे संकेतस्थळ नव्हे

विकिपीडियातील म्हणजे चित्रे, माध्यम संचिका, दुवे अथवा स्रोत मजकुराच्या साठवणुकीचे संकेतस्थळ नव्हे. तसेच विकिपीडिया म्हणजे बहिर्गत संकेतस्थळांचे प्रतिरूपित (मिरर केलेले) संकलनदेखील नाही. विकिपीडियावरील लेख :

  1. म्हणजे प्राचीन, सार्वजनिक अधिक्षेत्रात मोडणाऱ्या (पब्लिक डोमेन) किंवा अन्य स्रोत मजकुराचे संकलन नव्हे : ऐतिहासिक कागदपत्रे, ग्रंथ, धार्मिक/ आध्यात्मिक साहित्य, आज्ञापत्रे, अधिकारपत्रे, कायदे अथवा अख्खी पुस्तके इत्यादी स्वरूपांतील सार्वजनिक अधिक्षेत्रात मोडणार्‍या (पब्लिक डोमेन) स्रोत मजकुराचे संकलन विकिपीडियातील लेखांत करू नये. सार्वजनिक अधिक्षेत्रातील असे साहित्य विकिपीडियावर चालत नसले, तरी विकिस्रोत या विकिपीडियाच्या बंधुप्रकल्पावर मांडता येऊ शकते.
  2. म्हणजे लेखाच्या विषयास पूरक मजकूर न लिहिता जमा केलेला चित्रे, फोटो किंवा अन्य बहुमाध्यमी संचिकांचा संग्रह नव्हे : चित्रे, फोटो अथवा बहुमाध्यमी संचिका जमा करताना त्यांचे विश्वकोशीय औचित्य/ संदर्भ पुरवावा अथवा अश्या संचिका विकिकॉमन्स या विकिपीडियाच्या बंधुप्रकल्पावर जमा कराव्यात.

विकिपीडिया म्हणजे ब्लॉग, वेबस्पेस पुरवठादार कंपनी, सोशल नेटवर्क संकेतस्थळ अथवा कुणाचे स्मारक संकेतस्थळ नव्हे

विकिपीडिया म्हणजे ट्वीटर, ऑर्कुट किंवा फेसबुक यांसारखे सोशल नेटवर्क संकेतस्थळ नव्हे. विकिपीडियावर तुम्ही स्वतःचा ब्लॉग, संकेतस्थळ चालवू शकत नाही. विकिपीडियावरील पाने :

  1. म्हणजे व्यक्तिगत संकेतस्थळे / वेबपाने नव्हेत
  2. म्हणजे सोशल नेटवर्किंग किंवा डेटिंग सेवा नव्हेत
  3. म्हणजे शासकीय, निमशासकीय किंवा व्यावसायिक आस्थापनांची अधिकृत संकेतस्थळे नव्हेत : विकिपीडियावरील काही लेख शासकीय, निमशासकीय किंवा व्यावसायिक आस्थापनांबद्दल असले, तरीही त्यांत निव्वळ विश्वकोशीय माहिती मांडणे अपेक्षित आहे. असे लेख त्या आस्थापनांची अधिकृत संकेतस्थळ नसल्याने त्यांच्याबद्दलच्या तक्रारी, समस्या, शंका निवारण्याच्या त्या जागा नव्हेत.
  4. म्हणजे प्रिय किंवा आदरणीय व्यक्तींच्या अथवा संस्थांच्या स्मृतीसाठी बनवलेली स्मारके नव्हेत

विकिपीडिया म्हणजे निर्देशिका, डिरेक्टरी अथवा सूची-संग्रह नव्हे

विकिपीडिया म्हणजे अस्तित्वात असलेल्या किंवा पूर्वी होऊन गेलेल्या सर्व गोष्टींचे सूचीकेंद्र / निर्देशिका नव्हे. विकिपीडियावरील पाने :

  1. म्हणजे निर्देशिका, डिरेक्टरी, यलो पेजेस नव्हेत
  2. म्हणजे वंशावळींचे संकलन नव्हेत
  3. म्हणजे दूरचित्रवाणी, रेडिओ इत्यादी इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांच्या कार्यक्रमपत्रिका नव्हेत

विकिपीडिया म्हणजे पाठ्यपुस्तक, वैज्ञानिक जर्नल, मार्गदर्शक ग्रंथ अथवा मॅन्युअल नव्हे

विकिपीडिया विश्वकोशीय संदर्भग्रंथ असून पाठ्यपुस्तक, वैज्ञानिक जर्नल, मार्गदर्शक ग्रंथ अथवा मॅन्युअल नव्हे. विकिपीडियावरील लेख :

  1. म्हणजे आदेशांचे मॅन्युअल (इन्स्ट्रक्शन मॅन्युअल) नव्हे
  2. म्हणजे पाठ्यपुस्तके नव्हेत
  3. म्हणजे वैज्ञानिक जर्नल किंवा संशोधनपत्रिका नव्हे
  4. म्हणजे पर्यटन मार्गदर्शक नव्हेत
  5. म्हणजे इंटरनेट मार्गदर्शक नव्हेत
  6. म्हणजे पाककृती नोंदवण्याचे रेसिपीबुक नव्हे

विकिपीडिया माहितीचा अंदाधुंद ढीग साठवण्याची जागा नव्हे

  1. ललित लेख, कथा, कादंबर्‍या, चित्रपट किंवा नाटके यांबद्दल केवळ ढोबळ कथा व समीक्षण अपेक्षित आहे.
  2. संकेतस्थळे असंबद्ध, अनपेक्षित ठिकाणी उघडणे अपेक्षित नाही.
  3. माहितीचा प्रथम स्रोत किंवा ब्रेकिंग न्यूज नाही.
  4. चर्चापाने, सदस्यपाने ही प्रबोधन-प्रचार किंवा जाहिरातीची होमपेज नाहीत.

विकिपीडियावरील माहिती सेन्सॉर-प्रमाणित नसते

विकिपीडिया सामुदायिक सहभागातून घडत असलेला ऑनलाइन ज्ञानकोश प्रकल्प असल्यामुळे विकिपीडिया माहितीचे प्रतिबंधन करत नाही. थोडक्यात,येथील माहिती सेन्सॉर-प्रमाणित नसते (

हेसुद्धा पाहा: विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार). व्यक्‍तिपरत्वे व्यक्‍तिगत जाणिवांना व अभिरुचीला न पटणाऱ्या किंवा विरोधी दृष्टिकोनांची, संचिकांची, छायाचित्रांची, संकेतस्थळांची येथील लेखांत मांडणी असू शकते. अर्थात लेखांतील मांडणी संतुलित करण्याच्या व सुसंबद्ध करण्याच्या दृष्टीने संपादने करता येतात. संपादन प्रक्रियेत विकी धोरणांचे पालन करण्याचा प्रयत्न केला जातो. पण तो प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतो. विकिपीडियाचे सर्व्हर फ्लोरिडा, अमेरिका व अन्यत्र अनेक ठिकाणी असून त्या-त्या ठिकाणच्या कायद्यांचा परिणाम विकी धोरणांवर होऊ शकतो. प्रत्येक वापरकर्त्याने किमानपक्षी आपापल्या देशातील कायद्यांबद्दल वैयक्तिक पातळीवर खबरदारी घेणे अपेक्षित आहे.

हेही पाहा