विकिपीडिया:इतिहास/विशेष लेख
पानिपतची तिसरी लढाई १४ जानेवारी १७६१ रोजी भारतातील हरयाणा राज्यातील पानिपत नजीक झाली.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला खंबीर वारस मिळाला नाही त्यामुळे मराठ्यांनी उत्तर भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती. १७५० च्या दशकात मराठ्यांनी उत्तर भारतात बर्याच मोठ-मोठ्या मोहिमा काढल्या. पार पाकिस्तानातील अटकेपर्यंत आपले साम्राज्य प्रस्थापित केले व ७ ते ८ शतके राज्य करण्यार्या एकछत्री इस्लामी सत्तेला आव्हान दिले. थोरल्या बाजीरावाच्या कारकीर्दीपर्यंत उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते.
पानिपतजवळ पूर्वीही दोन मोठी युद्धे झाली होती, ज्यात मोघलांची सरशी झाली होती व भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला होता. तिसरी लढाई अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील पेशव्यांत झाली. अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली. जरी महाराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतले.
पानिपतच्या युद्धाचे परिणाम केवळ त्या युद्धापुरते मर्यादित राहिले नाहीत. भारतीय इतिहासावर याचे अत्यंत दूरगामी परिणाम झाले. मराठ्यांचे एकाच दिवसात ४० ते ५० हजार सैनिक मारले गेले व एकूण युद्धात ६० हजारांवर सैनिक व नागरिक मारले गेले. मराठ्यांना अनेक शूर योद्धांना मुकावे लागले. या युद्धात महाराष्ट्राच्या दोन पिढ्या गारद झाल्यासारखे झाले. नानासाहेब पेशव्यांना या युद्धाचा जबरदस्त धक्का बसला व शोकातच त्यांनी प्राण सोडला.
युद्ध जिंकूनसुद्धा क्षीण झालेल्या सैन्यामुळे क्षुल्लक लुटी शिवाय अब्दाली काहीच प्राप्त करु शकला नाही. उत्तर भारतात केवळ नाममात्र इस्लामी राज्य स्थापन झाले जे पुन्हा काही वर्षात लयाला गेले. अब्दालीच्या क्षीण झालेल्या ताकदीचा जाट व शिखांनी फायदा घेतला. अफगाणी लुटारुंच्या भारतवार्या कायमच्या बंद झाल्या.