Jump to content

विंडोज ९८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विंडोज ९८
मायक्रोसॉफ्ट विंडोज चा एक भाग
विंडोज ९८ ची झलक
विकासक
मायक्रोसॉफ्ट
आवृत्त्या
प्रकाशन दिनांक आरटीएम: मे १५, १९९८
रिटेल: जून २५, १९९८ (माहिती)
सद्य आवृत्ती पहिली आवृत्ती:
४.१ (बिल्ड २०००, सेवा पॅक १) (जून २५, १९९८)
दुसरी आवृत्ती:
४.१ (बिल्ड २२२२ ए) (मे ५, १९९९) (माहिती)
स्रोत पद्धती छुपा स्रोत
परवाना मायक्रोसॉफ्ट इयुएलए
केर्नेल प्रकार मोनोलिथिक केर्नेल
पूर्वाधिकारी विंडोज ९५
उत्तराधिकारी विंडोज एमई
समर्थन स्थिती
जुलै ११, २००६ पासून असमर्थित


विंडोज ९८ (सांकेतिक नाव मेम्फिस) ही मायक्रोसॉफ्ट या कंपनीची चित्रमय संगणक संचालन प्रणाली आहे. ती विंडोज ९क्ष मालिकेतील दुसरी महत्त्वाची प्रकाशित संचालन प्रणाली आहे. मे १५, १९९८ रोजी ती उत्पादनासाठी प्रकाशित झाली तर रिटेलसाठी जून २५, १९९८ रोजी प्रकाशित झाली. विंडोज ९८ ही संचालन प्रणाली विंडोज ९५च्या अनुक्रमिक आहे. आपल्या पूर्वक्रमिकाप्रमाणेच विंडोज ९८ मध्ये एमएस-डॉस आधारित बूट लोडर होते तसेच विंडोज ९८ हायब्रिड १६-बिट/३२-बिट एकसंघ उत्पादन होते. विंडोज ९८ च्या नंतर विंडोज ९८ द्वितीय आवृत्ती ही मे ५, १९९९ रोजी व त्यानंतर विंडोज एमई ही सप्टेंबर १४, २००० रोजी प्रकाशित झाली. विंडोज ९८ साठीचे मायक्रोसॉफ्टचे समर्थन जुलै ११, २००६ रोजी समाप्त झाले.

विकासप्रक्रिया[संपादन]

१९९० च्या दशकात विंडोज ९८चा विकास सुरू झाला. त्यावेळी या संचालनप्रणालीला "मेम्फिस" हे सांकेतिक नाव देण्यात आले होते. अनेक विकासनप्रक्रियेतील विंडोज ९८ च्या आवृत्या प्रकाशित झाल्या किंवा त्यांची वाच्यता झाली. याची सुरुवात डिसेंबर १५, १९९६ रोजी बिल्ड १३५१ पासून ते शेवट विंडोज ९८ द्वितीय आवृत्तीबरोबर झाला.

बिल्ड क्रमांक दिनांक माहिती प्रकाशन नाव
६६९ १९९५ च्या काळात "मेम्फिस" सांकेतिक नाव असलेले पहिले प्रकाशन
११३२ जून १६, १९९६ विंडोज ९८ चे खूप जुने बीटा प्रकाशन, काही छोटे बदल सोडल्यास सामान्यपणे विंडोज ९५ विंडोज मेम्फिस पूर्व अल्फा
१३८७ फेब्रुवारी ७, १९९७ पहिली बीटा आवृत्ती विंडोज मेम्फिस बीटा
१६०२ ऑक्टोबर ३, १९९७ विंडोज ३.१क्ष पासून श्रेणीवाढ करता येण्याजोगे पहिले प्रकाशन विंडोज ९८ बीटा
१६९१ फेब्रुवारी १६, १९९८ डिसेंबर ३१, १९९८ रोजी संपुष्टात आले विंडोज ९८ प्रकाशन उमेदवार
१९९८ मे ११, १९९८ अंतिम आवृत्ती विंडोज ९८
२२२२ एप्रिल २३, १९९९ विंडोज ९८ द्वितीय आवृती

आंतरजाल एकात्मीकरण व बाह्यावरणातील सुधारणा[संपादन]

विंडोज ९८ मध्ये इंटरनेट एक्सप्लोरर ४.०१ अंतर्भूत आहे. इंटरनेट एक्सप्लोरर वगळता इतर अनेक आंतरजालसंबंधित प्रोग्राम विंडोज ९८ मध्ये होते, जसे की आउटलूक एक्सप्रेस, विंडोज ॲड्रेस बुक, फ्रंटपेज एक्सप्रेस, मायक्रोसॉफ्ट चॅट, पर्सनल वेब सर्व्हर व आंतरजालावर प्रकाशित करण्यासाठी एक प्रोग्राम, नेटमीटिंगनेटशो प्लेयर (विंडोज ९८ च्या मूळ आवृत्तीत), ज्याची जागा विंडोज ९८ द्वितीय आवृत्तीत विंडोज मीडिया प्लेयर ६.२ ने घेतली.

विंडोज ९८ च्या बाह्यावरणातील सुधारणांमध्ये सर्व सुधारणा विंडोज डेस्कटॉप अपडेट मधून येतात. जलद सुरुवात साधनपट्टी, डेस्कबँड, ॲक्टिव्ह डेस्कटॉप, चॅनेल्स, अग्रभूमीवरील खिडक्या मिनिमाइझ करणे, एकदाच टिचकी मारल्यावर प्रोग्राम उघडण्याची सुविधा, विंडोज एक्सप्लोररमध्ये मागे व पुढे जाण्यासाठी कळा, आवडी (फेवरेट्स) व पत्त्याची पट्टी तसेच फोल्डरमध्ये इमेज थंबनेल्स, फोल्डर माहितीटिपा व आंतरजाल दर्शन तसेच एचटीएमएल आधारित साचांद्वारे फोल्डर अनुकुलीकरण ही त्याची उदाहरणे आहेत.

विंडोज ९८ मध्ये बाह्यावरण सुधारणा, थीम्स तसेच इतर सुविधा मायक्रोसॉफ्ट प्लस! मधूनही येतात. ड्राइव्हस्पेस ३, कंप्रेशन एजंट, डायल-अप नेटवर्किंग सर्व्हर, डायल-अप स्क्रिप्टिंग टूल व कार्य अनुसूचक ही त्याची उदाहरणे आहेत. त्रिमितीय पिनबॉल स्थापक सीडीमध्ये असला तरी तो वापरकर्त्याला स्थापन करून घ्यावा लागतो. विंडोज ९८ मध्ये स्वतंत्र विकत घेण्याजोगा प्लस! पॅक होता व त्यास प्लस! ९८ असे नाव दिले गेले होते.

विंडोज ९८ द्वितीय आवृत्ती[संपादन]

विंडोज ९८ द्वितीय आवृत्ती (इंग्रजी: Windows 98 Second Edition, लघुरुप: SE) ही विंडोज ९८ची अद्ययावत केलेली आव्व्र्त्ती असून ती मे ५, १९९९ रोजी प्रकाशित झाली. तिच्यात अनेक लहान चुका दुरुस्त केल्या होत्या तसेच सुधारलेले डब्ल्युडीएम ऑडियो व मॉडेम समर्थन, इंटरनेट एक्सप्लोरर ४च्या जागी नवीन इंटरनेट एक्सप्लोरर ५, वेब फोल्डर्स (विंडोज एक्सप्लोररसाठी वेबडीएव्ही नामविश्व विस्तारक) तसेच बाह्यावरणात थोड्या सुधारणादेखील होत्या.

प्रकाशन आवृत्ती प्रकाशन दिनांक इंटरनेट एक्सप्लोरर आवृत्ती
विंडोज ९८ ४.१०.१९९८ जून २५, १९९८ ४.०१
विंडोज ९८ द्वितीय आवृत्ती ४.१०.२२२२ एप्रिल २३, १९९९ ५.०


मागील
विंडोज ९५
विंडोज ९क्ष पुढील
विंडोज एमई