वाल्देमार हाफकीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वाल्देमार हाफकीन

वाल्देमार हाफकीन यांचे छायाचित्र
जन्म मार्च १५, इ.स. १८६०
बेर्डीन्स्क, रशियन साम्राज्य
मृत्यू ऑक्टोबर २६, इ.स. १९३०
लुझान, स्वित्झर्लंड
निवासस्थान रशिया
नागरिकत्व रशियन
धर्म ज्यू धर्म
कार्यक्षेत्र सूक्ष्मजंतुशास्त्र, प्रोटोझोआचा अभ्यास
कार्यसंस्था इंपीरियर नोव्हॉरेशिया विद्यापीठ
जेनिवा विद्यापीठ
पाश्चर इन्स्टिट्यूट
प्रशिक्षण इंपीरियर नोव्हॉरेशिया विद्यापीठ
ख्याती पटकीप्रतिबंधक लस

डॉ. वाल्देमार मॉर्डेकाई वूल्फ हाफकीन (रशियन: Мордехай-Вольф Хавкин) (१५ मार्च, इ.स. १८६०:बेर्डीन्स्क, रशियन साम्राज्य - २६ ऑक्टोबर, इ.स. १९३०:लुझान, स्वित्झर्लंड) हे एक रशियन सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ होते. हाफकीन हे यहूदी धर्मीय होते. पॅरिसमधील लुई पाश्चर संस्थेत काम करत असताना त्यांनी कॉलराविरोधी लस विकसित करून तिचे भारतात यशस्वीरीत्या परीक्षण केले. ते पटकी आणि ब्युबॉनिक प्लेग (गाठीचा प्लेग) वरची लस बनवणारे आणि त्यांची तपासणी करणारे पहिले सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात.

मुंबईत परळ येथील सूक्षजीवशास्त्रात संशोधन करणाऱ्या आणि विविध लसींचे उत्पादन करणाऱ्या संस्थेला हाफकिन इन्स्टिट्यूट असे नाव दिले आहे.

हाफकीन इन्स्टिट्यूटचा इतिहास[संपादन]

डॉ. वाल्देमार हाफकीन हे लुई पाश्चरचे विद्यार्थी होते. ते मार्च १८९३ मध्ये हिंदुस्थानात आले आणि कलकत्त्यातील कॉलऱ्याच्या साथीविरुद्ध त्यांनी जणू एकाकी युद्ध पुकारले. पॅरीसमध्ये असताना त्यांनी विकसित केलेली कॉलऱ्याची लस ते लोकांना टोचू लागले. या लसीचे चांगले परिणाम दिसू लागल्यावर, मुंबईच्या गव्हर्नरने त्यांना मुंबईत आणि पुण्यात पसरलेल्या प्लेगच्या साथीचा मुकाबला करण्यासाठी बोलावले. १८९६ मध्ये मुंबईत आल्यावर तेथील गव्हर्नरने हाफकीन यांना जेजे इस्पितळाच्या परिसरात एक प्रयोगशाळा उभारून दिली. हाफकीनने प्लेगच्या लसीचा शोध लावण्याचे आव्हान स्वीकारले आणि काही महिन्यात जशी हवी तशी प्राथमिक लस बनवली. या लशीचा पहिला प्रयोग हाफकीनने १० जानेवारी १८९७ रोजी स्वतःवरच केला. लशीमुळे कुठलाही अपाय न झाल्याने ही लस सुरक्षित आहे असे समजून लोकांना टोचण्यास सुरुवात केली. आणि खरोखरच पुण्या-मुंबईतल्या प्लेगची साथ आटोक्यात आली. या लसीमध्ये कालांतराने सुधारणा होत राहिल्या.

पुढे १० ऑगस्ट १८९९ रोजी गव्हर्नर लॉर्ड सँडहर्स्ट यांनी मुंबईच्या गव्हर्नरांचा एकेकाळचा राहण्याचा परळ येथे असलेला महाल डॉ. वाल्डेमार मॉर्डेकाई हाफकीन यांच्या स्वाधीन केला. तेथे डॉ. हाफकीनने ’प्लेग रिसर्च लॅबॉरेटरी’ स्थापन केली व स्वतः हाफकीन त्या संस्थेचे प्रमुख संचालक झाले. त्यांनी १९०४ मध्ये हिंदुस्थान सोडल्यानंतर, १९०६ मध्ये त्या संस्थेचे नाव बाँबे बॅक्टेरिऑलॉजी लॅबॉरेटरी झाले आणि १९२५ मध्ये हाफकिन इन्स्टिट्यूट झाले.

बाह्य दुवे[संपादन]