वालधुनी नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वालधुनी नदी ही ठाणे जिल्ह्यातून वाहणारी एक नदी होती. १९२३ मध्ये ब्रिटिशांनी याच नदीवर ग्रेट इंडियन पेनिनसुला रेलवे तलाव बांधला. या तलावातून कल्याण रेल्वे स्थानकाला पाणीपुरवठा करण्यात येत असे. सह्याद्रीच्या तळटेकड्यात उगम पावून ही नदी अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण तालुक्यातून वाहते.

इतिहास[संपादन]

इ.स. १०३०च्या सुमारास या भागात मोठा दुष्काळ पडला असता तत्कालीन शिलाहार राज्यकर्त्यांनी कृत्रिमरीत्या या नदीचे पात्र खोदले असे काही अभ्यासकांचे मत आहे. १९७० च्या दशकापर्यंत वालधुनी नदीत बाराही महिने पाणी असे. त्यानंतर या नदीचे एका मोठ्या सांडपाण्याच्या नाल्यात रूपांतर झाले आहे.

योजना[संपादन]

मृतप्राय ठरलेल्या या नदीला जीवनदान देण्याच्या अनेक सरकारी योजना आखण्यात आल्या, पण त्या आजवर दुर्दैवाने कागदावरच राहिल्या आहेत. सध्या या नदीच्या पात्रातून वाहते ते या परिसरात सारे नेमनियम धाब्यावर बसवून सुरू असणाऱ्या लहान-मोठ्या कारखान्यांमधील रासायनिक सांडपाणी. एकेकाळी या परिसरातील जीवन फुलविण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या या नदीमुळे पात्रालगतच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

आसपासचे कारखाने रसायनमिश्रित पाणी प्रक्रिया करून वालधुनी नदीत सोडतात की नाही यावर महाराष्ट्र प्रदूषण मंडळ नियंत्रण ठेवते. परंतु औद्यागिक सांडपाण्यापेक्षा प्रक्रिया न केलेले घरगुती सांडपाणी वालधुनीच्या पात्रात नियमित सोडले जाणे यावर आळा बसणे अतिशय जरुरीचे आहे.

वालधुनी प्राधिकरण[संपादन]

ठाणे जिल्ह्यातून वाहणार्‍ऱ्याया वालधुनी नदीच्या विकासासाठी आवश्यक असलेला निधी गोळा करणे स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या आवाक्याबाहेर असल्याने हा निधी राज्य सरकारने उपलब्ध करून द्यावा असे पत्र कल्याणचे मनसे आमदार प्रकाश भोईर यांनी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठवले होते.

मुंबईतील मिठी नदीच्या २००५ सालच्या महापुरानंतर तेथे ज्या प्रकारे प्राधिकरण करण्यात आले त्याच धर्तीवर वालधुनी नदी प्राधिकरणाची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार स्थापलेल्या वालधुनी नदी विकास प्राधिकरण समिती आणि उपसमितीने २०११ साली एक अहवाल सादर केला होता. त्यानुसार या कामी ६५० कोटींचा खर्च अपेक्षित होता.

इतर[संपादन]

वालधुनीप्रमाणेच अंबरनाथ-बदलापूर पट्ट्यात नेरळ-माथेरान डोंगरपट्ट्यातून वाहणारे अनेक शुद्ध पाण्याचे झरेही (नालेही) या आंधळ्या औद्योगिकीकरणामुळे कुचकामी ठरून निव्वळ गटार म्हणून उरले आहेत.