वाक्य
पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा 'अर्थपूर्ण' शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. वाक्य हे भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: अक्षर, वर्ण, शब्द व व्याकरण) एक आहे. एखाद्या शब्दाला किंवा शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला वाक्य असे म्हणतात. 'बदक पाण्यात पोहते.' हे वाक्य आहे. या वाक्यात तीन पदे आहेत. पदात आणि शब्दात फरक आहे. वाक्यात वापरलेल्या शब्दाला पद म्हणतात.
मराठी भाषेत प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावण्यापूर्वी शब्द (विशेषतः नाम) हा त्याच्या मूळ स्वरूपात न वापरता बहुधा बदल करून वापरला जातो. या बदललेल्या स्वरूपाला सामान्य रूप म्हणतात. अशा सामान्य रूपाला प्रत्यय लागतात आणि त्यांचा वापर वाक्यात होतो. (उदा० बदक-> बदका ->बदकाला).
हिंदीत सामान्य रूपाला तिर्यक् रूप म्हणतात. (लडका -> लडके -> लडके को) वाक्यातील एकेक पद हे एकेका शब्दापासून बनते. अनेक पदे मिळून (शेजारी शेजारी ठेवून) वाक्य बनते.
ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास 'केवल' किंवा 'शुद्ध' वाक्य म्हणतात [१]
उदा. १) आम्ही जातो आमुच्या गावा २) तानाजी लढता लढता मेला.
वरील वाक्यात एकेकच विधान आहे. म्हणजे प्रत्येकात एकच उद्देश (कर्ता-Subject) व एकच विधेय (Predicate) आहे. पहिल्या वाक्यात 'आम्ही' व दुसऱ्या वाक्यात 'तानाजी' ही उद्देशे आहेत. तसेच पहिल्या वाक्यात 'जातो आमुच्या गावा' व दुसऱ्या वाक्यात 'लढता लढता मेला' ही विधेये आहेत.[१]
मिश्र वाक्य
[संपादन]एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौणवाक्ये गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून जे एक संमिश्र वाक्य तयार होते त्यास 'मिश्र वाक्य असे म्हणतात.
उदा. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. Paws alarm ki aakashat kaka bhag Yates
आकाशात ढग जमतात हे गौणवाक्य आहे. तेव्हा मोर नाचू लागतो हे प्रधानवाक्य आहे. आणि 'जेव्हा' या गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने ते जोडले आहे.
संयुक्त वाक्य
[संपादन]दोन किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोड वाक्य तयार होते त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात.
उदा० आकाशत ढग जमतात आणि मोर नाचू लागतो.
वाक्यसंश्लेषण
[संपादन](वाक्य संकलन) : एकमेकांशी संबंध असलेली दोन किंवा अधिक केवल वाक्ये दिली असता ती एकत्र करून त्यांचे एक वाक्य बनविणे यास वाक्य संश्लेषण म्हणतात. यात तीन प्रकार आहेत.
- दोन किंवा अधिक केवल वाक्यांचे एक केवल वाक्य बनविणे
- दोन किंवा अधिक केवल वाक्यांचे एक मिश्र वाक्य बनविणे.
- दोन किंवा अधिक केवल वाक्यांचे एक संयुक्त वाक्य बनविणे.