वसंत सखाराम आपटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वसंत सखाराम आपटे (११ जानेवारी, १९३५:पुणे, महाराष्ट्र - ८ जानेवारी, २०१४, पुणे) हे स्थापत्यकार आणि मराठी विज्ञान परिषदेचे सदस्य होते. मराठी विज्ञान परिषदेचा त्यांचा संबंध आपटे बंधू स्मृती व्याख्यानमालेपासून आला. त्यांचे ग वि आपटे यांनी,  मराठी भाषेतून विज्ञान प्रसार व्हावा या हेतूने ग.वि. आपटे यांनी सुरू केलेले काम ग.वि. आपटे यांच्या पश्चात वसंत आपटे यांनी सुरू ठेवले.

वसंत आपटे यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या भावे स्कूलमधून आणि महाविद्यालयीन शिक्षण वाडिया कॉलेजमधून झाले. 

स्थापत्यशास्त्राचे शिक्षण त्यांनी मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्किटेक्चर येथून घेतले.

सुरुवातीची काही वर्षे मुंबईमध्ये व्यवसाय करून नंतर १९७० पासून ते पुण्यास परतले व तेथे त्यांनी वास्तुविद्या-आरेखनाचा व्यवसाय केला. रहाण्यासाठी बांधलेली घरे, चाळी, अपार्टमेन्ट्स, सदनिका यांच्या आरेखनात त्यांचे मन रमले नाही. त्यांच्या हातून विविध मंदिरे, प्रार्थनामंदिरे किंवा चर्चेस, शाळा, शैक्षणिक संस्था, कारखान्यांच्या इमारती, इस्पितळांच्या इमारती  अशा सुविधापूर्ण"  वास्तूंचे आरेखन झाले. नूतन मराठी हायस्कूल आणि एस.पी. कॉलेज चालवीत असलेली शिक्षण प्रसारक मंडळी, पर्वतीवरील देव देवेश्वर संस्थान इत्यादी संस्थांमध्ये त्यांनी स्थापत्य सल्लागाराची भूमिका चोखपणे बजावली. पु्ण्यातील सारस बागेतील सुप्रसिद्ध - तळ्यातला गणपतीच्या मंदिराची पुनर्रचना वसंत आपटे यांनी केली. 

स्थापत्यशास्त्राचा व्यवसाय करत असताना सचोटी, प्रामाणिकपणा व कायद्याच्या चौकटी न मोडण्याची त्यांची तत्त्वे त्यांनी निरंतर पाळली. गल्लाभरू व्यावसायिकतेपासून ते अर्थातच दूर राहिले. पण त्याचा फायदा त्यांना सामाजिक कार्य करणाऱ्यासंस्थांना मिळाला. वास्तु आरेखन शास्त्राऐवजी वास्तुशास्त्र या संकल्पनेबद्दल ते नाराज होते. ते म्हणत, 'दक्षिणेकडे प्रवेशद्वार असले तर वाईट होते असे असेल तर लक्ष्मी रस्त्याच्या उत्तरेकडची दुकाने ओसाड आणि दक्षिणेकडची दुकाने ग्राहकांनी ओसंडून वाहायला हवीत!'  

ग्रामविकासाचे कार्य[संपादन]

पुणे जिल्ह्यातील आंदर मावळ येथील माळेगाव या गावी, रोटरी क्लबच्या ग्रामविकासाच्या कामाच्या निमित्ताने दर रविवारी तेथे जाऊन तेथील बांधकामाच्या आरेखनात, देखरेखीत व तपासणीत  त्यांनी बरीच वर्षे प्रत्यक्ष योगदान दिले.  

अध्यापन आणि लेखन[संपादन]

पुण्याच्या अभिनव महाविद्यालयाच्या 'कॉलेज ऑफ आर्किटेक्चर'मध्ये वसंत आपटे अनेक वर्षे अध्यापनाचे काम करीत. त्यांच्याच विषयावर योग्य मार्गदर्शक पुस्तक नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी त्यांनी 'आर्किटेक्चरल प्रॅक्टिस ॲन्ड प्रोसीजर' नावाचे पुस्तक लिहिले. आपटे यांनी सुचवलेली किंमत फार कमी अाहे या सबबीखाली प्रकाशकांनी हे पुस्तक छापायला नकार दिला. तेव्हा त्यांनी स्वतःच त्या पुस्तकाचे प्रकाशन व वितरण करून आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांचे हित सांभाळले. या पुस्तकास पुणे विद्यापीठासहित भारतातील अनेक विद्यापीठांची पाठ्यपुस्तक म्हणून मान्यता मिळाली आहे.  

चित्रकला, संगीत आणि वास्तूच्या रचनेतील बारकाव्यांवर लेखन[संपादन]

आपल्या व्यवसायातून वेळ काढून वसंत आपटे यांनी चित्रकला व संगीत हे छंद जोपासले.  भारतात व भारताबाहेर हिंडताना स्थानिक वास्तुरचनेतील पारंपरिकतेचे बारकावे ते चित्रबद्ध करू लागले. कोकणातील उतरते छप्पर असो किंवा जैसलमेरमधील वैशिट्यपूर्ण गवाक्षे असोत, ही विविधता त्यांच्या वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या लेखांत उमटली. या विषयावर त्यांनी दृक्‌श्राव्य व्याख्यानेही दिली.

हे असे बहुआयामी वसंत सखाराम आपटे, ७ जानेवारी २०१४ पर्यंत कार्यरत होते. त्या दिवशी, म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधी ते राजकोट येथील विद्यालयात द्यावयाच्या व्याख्यानाची तयारी करीत होते. त्या सकाळी त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि मेंदूत झालेल्या रक्तस्रावामुळे त्यांचे निधन झाले.