Jump to content

रझिया पटेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रजिया पटेल या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉ. रझिया पटेल (जन्मः इ.स. १९६०) या सामाजिक विषयातील मराठी भाषेतील लेखिका, व समाज समीक्षक आहेत. यांची लेखनशैली प्रबोधनाविषयी आस्था प्रकट करणारी आहे.

रझिया पटेल
जन्म इ.स. १९६०
वडील रहीम पटेल

पटेल या शिक्षण, स्त्री सुधारणा या विषयांवरील मराठीतल्या नामवंत लेखिका आहेत. ह्यांचे अनेक मासिकांतून आणि [[वृत्तपत्र|वृत्तपत्रातून] लेख प्रकाशित होत असतात.

जीवन

[संपादन]

डॉ. रझिया पटेल यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोल तालुक्यातील साळवे या छोट्या खेड्यात झाला. वडील रहीम पटेल हे शेतकरी होते. त्यांनी कृषी महाविद्यालयातून शिक्षण घेतले होते. विद्यार्थी असताना त्यांनी महात्मा गांधींच्या विदेशी मालाच्या बहिष्काराच्या चळवळीत भाग घेतला होता. गांधींच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. आपल्या शिक्षणाचा उपयोग गावाच्या विकासासाठी करण्याचा त्यांचा निर्धार होता. संपूर्ण गावात त्यांना मानही होता. मुलींना शिक्षण द्यावे या मताते ते होते. त्यानुसार त्यांनी रझिया पटेलना जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल केले. मात्र, मुलींना शाळेत घालण्यास गावातील लोकांचा विरोध होता; त्यामुळे गावातून रझियाच्या शिक्षणावर टीका होऊ लागली. ‘तू मुलगी आहेस तू हे करता कामा नयेस, ते करता कामा नये्स’ अशी टीकाटि्प्पणी वारंवार होऊ लागली. रझियाचे प्रश्न आणि तिची उत्तरे घरांघरांत चर्चिली जाऊ लागली. येथेच विद्रोहाची ठिणगी पडली. निर्णयाचे स्वातंत्र्य नसणे हे रझियाच्या मनाला आणि बुद्धीला पटेना. रझियाच्या प्रश्नांना गावकऱ्यांचे एकच उत्तर असे, ‘की असेच परंपरेने चालत आले आहे, त्यामुळे समाजाने आणि धर्माने जे ठरवले आहे ते मानलेच पाहिजे’.

शहरात आगमन

[संपादन]

गावकऱ्यांनी रझियाचे शिक्षण थांबवले, तेव्हा वयाच्या अठराव्या वर्षी ती घर सोडून एकटी शहरात शिकायला गेली. गावात राहिली असती तर तिचे लग्न लावून दिले असते आणि जे थोडेफार स्वातंत्र्य मिळते आहे त्याचाही अंत झाला असता. वडिलांच्या उदारवादी मतांचा गावाच्या विचारसरणीवर काही परिणाम झाला नाही.

शहरात आल्यावर रझिया छात्र युवा संघर्ष वाहिनी नावाच्या युवक संघटनेत दाखल झाली. तेथे तिला स्वातंत्र्य म्हणजे काय ते समजले. संघटनेच्या पूर्णवेळ कार्यकर्ती म्हणून काम करताना तिला आदिवासी वस्तींमधून फिरायला मिळाले; आसाम आंदोलनांसारख्या अनेक आंदोलनांत सहभागी व्हायला मिळाले. अशा रीतीर्ने दलित, महिला, विद्यार्थी वगैरे क्षेत्रांत काम करता करता एक दिवस रझिया पटेल ह्या छात्र युवा संघर्ष वाहिनीच्या राष्ट्रीय संयोजक झाल्या.

शिष्यवृत्त्या

[संपादन]
  • ‘भारतीय मुस्लिम स्त्रिया : सन्मानाने जगण्यासाठीचा लढा’ या विषयावर काम करण्यासाठी ‘टाइम्स रिसर्च फाऊंडेशन’ची फेलोशिप (इ.स. १९९४).
  • ‘समकालीन भारतीय साहित्यात मुस्लिम समाजाची प्रतिमा - एक तुलनात्मक अभ्यास’ हा विषय घेऊन अभ्यास करण्यासाठी दोन वर्षांची के.के. बिर्ला शिष्यवृत्ती (इ.स. १९९७)

चित्रपट पाहण्यावर बंदी

[संपादन]

सन १९८२मध्ये महाराष्ट्रातील जळगाव शहरातील मुस्लिम पंचायतने फतवा काढून मुसलमान स्त्रियांना सिनेमा गृहात जाऊन चित्रपट पाहण्याची बंदी केली. याविरुद्ध रझिया पटेलने अन्य मुसलमान स्त्रियांना घेऊन मोठे आंदोलन केले आणि शेवटी त्यांनी ८ मार्च १९८२ च्या महिला दिनादिवशी मोठ्या संख्येत मोर्चा काढून चित्रपटगृहांत प्रवेश केला व सिनेमाबंदी तोडल्याची घोषणा करण्यात आली. मोर्चाच्या आणखी एका मागणीनुसार जळगावच्या त्या मुस्लिम पंचायत समितीवर सरकारने बंदी आणली. त्यावेळी रझिया फक्त २२ वर्षांची होती.

कारकीर्द

[संपादन]

रझिया पटेल या सन १९९४पासून पुणे शहरातील ‘सेंटर फॉर एज्युकेशनल स्टडीज इन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन’मध्ये अल्पसंख्याक सेलच्या प्रमुख आहेत.

पुस्तके

[संपादन]
  • चाहूल (साधनाचे संपादक यदुनाथ थत्तें यांना रझियाने शाळकरी वयात पाठविलेल्या पत्रांचा संग्रह)
  • जमातवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही (६ पुस्तके; सहलेखक - अनघा तांबे, प्रवीण चव्हाण, वैशाली दिवाकर, सुहास पळशीकर आणि स्वाती देहाडराय)
  • जागतिकीकरण, धर्मांधता व स्‍त्री
  • Problems of Muslim Women in India. ... An Activist's Perspective
  • बापलेकी (लेख सहभाग)
  • बुरख्यापलीकडे

पुरस्कार

[संपादन]