Jump to content

रघुनाथ विष्णु पंडित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रघुनाथ विष्णू पंडित हे प्रसिद्ध कोकणी कवी होते. जन्म रायबंदर, गोवा येथे, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गोव्यात. त्यांचे नंतरचे शिक्षण पुण्यात, फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. १९४५ साली महात्मा गांधींच्या सान्निध्यात राहून त्यांनी त्यांची अनेक छायाचित्रे घेतली. १९५०–५४ मध्ये त्यांनी मुंबईत भारती या आंतर-भारतीय मैत्रीला वहिलेल्या मराठी नियतकालिकाचे संपादन केले. गोवा मुक्ती नं त र (१९६१) ते गोव्यात येऊन स्थायिक झाले. गोमंतकीय लोकगीते व लोककथा यांचाही त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. १९५२ मध्ये कोकणीतून लिहिण्यास त्यांनी सुरुवात केली. आयले तशें गायलें. म्हजें उ त र गावड्याचें, उत्तरलें तें रूप धरतलेंं, धर्तरेचे कवनचंद्रावळ हे त्यांचे पाच कवितासंग्रह एकाच वेळी (१९६३) प्रसिद्ध झाले. रेवेंतलीं पावलां (१९६९), मोगाचे आंवडे (१९७४), मोतयां (१९७४), ल्हारां (१९७४), नाच रे मोरा (१९६५), दर्या गाजोता (१९७६) हे त्यांचे इतर काव्यसंग्रह होत. मुलांसाठी त्यांनी रामायणमहाभारतातील कथाही लिहिल्या आहेत. रत्‍नांहार (कोकणी कवितांचे संकलन–१९७६) व गोअन पोएट्री (१९७६) ही त्यांनी अनुक्रमे कोकणी व इंग्रजीत संपादून प्रसिद्ध केलेली काव्यसंकलने होत. स्वतःच्या ‘भगवती प्रकाशन’ संस्थेतर्फे त्यांनी आजपर्यंत सु. ३० पुस्तके प्रसिद्ध केली आहेत.

पंडितांच्या बहुतेक कविता मुक्तच्छंदात्मक आहेत. गावड्यांच्या कोकणीत लिहिलेल्या त्यांच्या काही कवितांत जोष-जोम आहे. गरीबदुबळ्यांवर होणाऱ्या अन्यायाला ते आपल्या काव्यातून वाचा फोडतात, गोमंतकाचे सृष्टिसौंदर्य मोठ्या कौशल्याने वर्णितात, तर कधीकधी हळुवारपणे आपल्या प्रेमकाव्यातून विरहाची व्यथाही व्यक्त करतात. संपन्न शब्दभांडार, सहजसुंदर व परिणामकारक शैली, प्रतिमांचा मनोहर विलास, विचारांची घार व भावनेची उत्कटता यांमुळे त्यांच्या काव्याला एक आगळेच वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे. त्यांच्या ल्हारांमोतयां या संग्रहांना गोव्याच्या कला अकादेमीची अनुक्रमे १९७४ व १९७५ मध्ये पारितोषिके मिळाली आहेत. त्यांच्या कवितांचे इंग्रजी, हिंदीकन्नड भाषांतही अनुवाद झाले आहेत. कोकणी कवींत त्यांचे स्थान विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते.