यांत्रिक अभियांत्रिकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मेकॅनिकल इंजिनीरिंग (यांत्रिक अभियांत्रिकी) ही अभियांत्रिकीच्या सर्वांत जुन्या शाखांपैकी एक आहे. ही एक अभियांत्रिकीची अतिशय विस्तारित शाखा आहे. हिच्यात साधारणपणे यांत्रिक व्यवस्थेच्या मागचे तत्त्व व तिच्या उत्पादनासाठी लागण्याऱ्या भौतिक नियमांचा अभ्यास आणि वापर असतो.

यातील उपशाखा अशा आहेत: स्टॅटिक्स, डायनॅमिक्स, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, सॉलिड मेकॅनिक्स, थर्मोडायनामिक्स, फ्लुइड डायनॅमिक्स, हीट ट्रान्सफर, रेफ्रिजरेशन आणि एर कंडिशनिंग, कायनेमॅटिक्स (रोबोटिक्ससह), मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी, मेकाट्रॉनिक्स आणि कंट्रोल थिअरी.

अठराव्या शतकात युरोपमधील औद्योगिक क्रांती दरम्यान यांत्रिक अभियांत्रिकी एक क्षेत्र म्हणून उदयास आले. पण, जगात त्याचा विकासाची सुरुवात अनेक हजार वर्षांपूर्वी झालेली आहे. एकोणिसाव्या शतकात, भौतिकशास्त्रा मधील विकासामुळे यांत्रिक अभियांत्रिकी विज्ञानाचा विकास झाला. मानवी प्रगती करण्यासाठी हे क्षेत्र सतत विकसित होत आहे; आज यांत्रिक अभियंते कंपोझिट, मेकॅट्रॉनिक्स, नॅनोटेक्नॉलॉजी सारख्या क्षेत्रात कार्य करत आहेत. ते आंतरिक्ष अभियांत्रिकी, धातूकर्म अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संरचना अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, उत्पादन अभियांत्रिकी, रासायनिक अभियांत्रिकी, औद्योगिक अभियांत्रिकी, आणि इतर वेगवेगळ्या अभियांत्रिकी शाखांसोबत मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. यांत्रिक अभियंता जैववैद्यकीय अभियांत्रिकी, विशेषतः बायोमेकॅनिक्स, वाहतूक घटना, बायोमेकॅट्रॉनिक्स, बायोनोटेक्नॉलॉजी, आणि जैविक प्रणालींचे मॉडेलिंग या क्षेत्रात देखील काम करू शकतात.