Jump to content

मराठी अभ्यास केंद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मराठी अभ्यास केंद्र
स्थापना १ मे २००९
संस्थापक डॉ. दीपक पवार
प्रकार मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी कार्य करणारी स्वयंसेवी संस्था
मुख्यालय ठाणे
सदस्यत्व
१००+
अधिकृत भाषा
मराठी
संकेतस्थळ marathiabhyaskendra.org.in//

मराठी अभ्यास केंद्र ही मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी कार्य करणारी स्वयंसेवी संस्था असून तिची स्थापना १ मे २००९ रोजी झाली आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विधायक उपक्रम राबवणे, मराठीवरील अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणे, मराठी भाषिक समाजाच्या प्रबोधनासाठी वैचारिक चळवळ उभारणे, मराठीसाठी लक्षवेधी कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना पुरस्कार देणे असे अनेक उपक्रम मराठी अभ्यास केंद्रामार्फत राबविले जातात.[][][] डॉ. दीपक पवार हे मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आहेत.[][]

स्थापना व इतिहास

[संपादन]

मराठीच्या चळवळीसाठी आधारभूत ठरणारे एक संशोधन केंद्र असावे अशा हेतूने १ मे २००९ रोजी मराठी अभ्यास केंद्राची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने २००२ साली अकरावी – बारावीसाठी मराठीला माहिती – तंत्रज्ञानाचा पर्याय दिला, त्याविरुद्ध सुरू झालेल्या आंदोलनात मराठीच्या शिक्षकांसोबत इतर अनेक क्षेत्रातील लोकांनी भाग घेतला. एका अर्थाने मराठी अभ्यास केंद्राच्या कामाची मुहूर्तमेढ या आंदोलनामुळे रोवली गेली आहे.

न्यायालयीन मराठीच्या प्रश्नावर शांताराम दातार यांच्यासोबत परिसंवाद, शासनाशी पत्रव्यवहार आणि आंदोलने या माध्यमातून केंद्राने दोनेक वर्षे काम केले. २००६ साली मुंबई विद्यापीठाचा संज्ञापन आणि पत्रकारिता विभाग व मराठी भाषा संरक्षण आणि विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘न्यायव्यवहारात मराठी: सद्यस्थिती आणि आव्हाने’ या विषयावरील राज्यव्यापी परिषद झाली. ती यशस्वी करण्यात आणि न्यायालयीन मराठीचा प्रश्न सर्वदूर पोचवण्यात आज मराठी अभ्यास केंद्रात असलेल्या कार्यकर्त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. मराठीच्या एकेका प्रश्नावर काम करून भागणार नाही, त्यासाठी अनेक आघाड्यांवर एकाचवेळी लढले पाहिजे असा विचार करून १ डिसेंबर २००७ रोजी समविचारी कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली. यावेळी मराठीच्या चळवळीसाठी आधारभूत ठरणारे एक संशोधन केंद्र असावे अशा हेतूने मराठी अभ्यास केंद्राची स्थापना करण्यात आली.

त्याचबरोबरीने मराठीसाठी काम करणाऱ्या विविध चळवळींना एका व्यासपीठावर आणून एक व्यापक राजकीय चळवळ उभारावी असाही प्रयत्न होता. नंतरच्या काळात मराठी अभ्यास केंद्र हे संशोधन आणि चळवळ दोन्हींचेही व्यासपीठ ठरले. डॉ. प्रकाश परब आणि डॉ. दीपक पवार हे या अभ्यास केंद्राचे समन्वयक होते.[] त्यानंतर अभ्यास केंद्राची कार्यकारिणी निश्चित झाली. अभ्यास केंद्राचा संस्था नोंदणी क्रमांक – महा/६९४/०९/ठाणे तसेच विश्वस्त संस्था नोंदणी क्रमांक – एफ/१८५०१/ठाणे असा आहे. आता अभ्यास केंद्राचे मुख्य कार्यालय दादर (मुंबई) येथे आहे. बुधवार दि. २७ फेब्रूवारी २००८ रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना हुतात्मा स्मारकासमोर अभिवादन करून मराठी भाषेच्या विकासाकरीता गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी २००९ रोजी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी अभ्यास केंद्राच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. हे कार्यालय प्रा. रमेश पानसे यांच्या सौजन्याने मिळाले होते. महाराष्ट्र फौंडेशनमार्फत अतुल तुळशीबागवाले यांनी केलेल्या मदतीतून कार्यालयाचे संगणकीकरण झाले. १ मे २००९ पासून कार्यालय नियमितपणे सुरू झाले व मराठी अभ्यास केंद्राच्या कार्याला गती आली.

ध्येय

[संपादन]
मराठीकारण

या नव्या चळवळीला मराठीकारण असे नाव दिले आहे. मराठी भाषा व संस्कृतीच्या आधाराने अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण यांचा समग्र वेध म्हणजे मराठीकारण. ही आजच्या व उद्याच्या काळासाठी, आजच्या पिढीने उभी केलेली चळवळ आहे. आजवर मराठीची आंदोलने ज्या वैचारिक आधारावर पोसली गेली, त्यापेक्षा अधिक व्यापक भूमिकेने मराठीच्या प्रश्नांचा पाठपुरावा केला पाहिजे,या भूमिकेतून मराठी अभ्यास केंद्र काम करत आहे. महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांना, घटनात्मक यंत्रणांना मराठीच्या प्रश्नांवर भूमिका घ्यायला भाग पाडणे, केंद्र आणि राज्य शासनाच्या मराठीविरोधी धोरणांत बदल घडवून आणण्यासाठी जनमत उभारणे आणि आज मर्यादित प्रतिसाद असलेल्या प्रयत्नांचे लोकलढ्यात रूपांतर करणे हे मराठी अभ्यास केंद्राचे ध्येय आहे.[]

संयुक्त महाराष्ट्रासाठीचा दुसरा लढा

या प्रयत्नांतून सर्व थरांतला, महाराष्ट्रातला आणि बृहन्महाराष्ट्रातला मराठी माणूस जोडला जाईल. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सर्वस्व पणाला लावून मराठी जनता उतरली आणि राजसत्ता, धनसत्तेला आव्हान देऊन आपण मुंबईसह महाराष्ट्र मिळवला. आज तो महाराष्ट्र टिकवण्याचे आणि त्याचा मराठी चेहरा घडवण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे. त्यासाठी पुन्हा एकदा संघटित होण्याची आवश्यकता आहे. एका अर्थाने मराठीकारणाचा हा लढा म्हणजे संयुक्त महाराष्ट्रासाठीचा दुसरा लढा आहे.

उद्दिष्टे

[संपादन]

भाषा संवर्धन / विकास

[संपादन]
  1. मराठी भाषेचे, संस्कृतीचे जतन व संवर्धन करून भारताची भाषिक-सांस्कृतिक विविधता जपणे.
  2. लोकभाषा, राजभाषा मराठीची ज्ञानभाषा म्हणून जडणघडण करणे.
  3. मराठी भाषेच्या व्यावहारिक क्षमतांचा विकास साधणे व ती खऱ्या अर्थाने जगण्याची भाषा करणे.
  4. मराठी ही महाराष्ट्रीय समाजाच्या चरितार्थाची व अर्थार्जनाची भाषा व्हावी यासाठी नियोजनबद्ध रीतीने कार्य करणे.
  5. जागतिकीकरण व चुकीची भाषिक धोरणे यांमुळे होणारी मराठीची गळती थांबवणे.
  6. मराठी भाषेची उपयुक्तता वाढवून तिला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देणे.

शैक्षणिक / प्रशिक्षण उपक्रम

[संपादन]
  1. शिक्षण क्षेत्रात मराठी व इंग्रजी या भाषांचा वापर आणि स्थान समकक्ष राहावे यासाठी प्रयत्नशील राहणे.
  2. मराठी व अमराठी दोन्ही गटांना व्यावहारिक इंग्रजी / मराठीचे प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या प्रवाहात आणणे.
  3. मराठी भाषेला माहिती-तंत्रज्ञानाची जोड देणे, मराठीतून संगणकव्यवहाराचे प्रशिक्षण देणे.
  4. मराठी शाळा बंद पडू नयेत तसेच त्यांचा दर्जा सुधारावा यासाठी कार्य करणे.
  5. शैक्षणिक मदतीसाठी शिष्यवृत्ती योजना राबवणे.
  6. शैक्षणिक संस्था, वाचनालये, ग्रंथालये व संगणक प्रशिक्षण केंद्रांची स्थापना करून आधुनिक शिक्षणाला चालना देणे.

संशोधन आणि प्रशासकीय धोरण

[संपादन]
  1. भाषा व्यवहाराच्या विकासाचे संशोधन व सर्वेक्षण प्रकल्प राबवणे.
  2. न्यायालयीन क्षेत्रात मराठीला अधिकृत दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करणे.
  3. भाषा हे राज्याचे प्राथमिक संसाधन आहे त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेसाठी शासनाला जबाबदार धरणे.
  4. स्थलांतरामुळे उद्भवणाऱ्या भाषिक समस्यांचा अभ्यास करणे व उपाययोजना करणे.
  5. मराठी भाषेवरील संशोधन, अभ्यास शिबिरे, सत्रे, परिषदांचे आयोजन व प्रकाशन करणे.

संस्थात्मक बळकटी आणि संपर्कजाळे

[संपादन]
  1. प्रशासन आणि लोकसंवादातून मराठी वापराच्या यंत्रणा प्रस्थापित करणे.
  2. .मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी कार्यरत व्यक्ती व संस्थांचा डेटाबेस तयार करणे.
  3. राज्यात व राज्याबाहेर संपर्क केंद्रे व कृतिगटांची स्थापना करणे.
  4. समान उद्दिष्टे असलेल्या संस्थांशी सहकार्य व संलग्नता निर्माण करणे.
  5. इतरत्र शाखा स्थापन करणे.

सामाजिक एकात्मता आणि जनजागृती

[संपादन]
  1. इंग्रजी भाषेच्या अज्ञानामुळे होणारे शोषण थांबवणे.
  2. जातिधर्मात विखुरलेल्या समाजाला मराठी भाषक समाज म्हणून एकत्र आणणे.
  3. मराठी वापराबाबत समाजात जनजागृती निर्माण करणे; तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करणे.

प्रसार आणि प्रकाशन

[संपादन]
  1. संस्थेचे मुद्रित / ई-मुखपत्र चालवणे, संस्थेचे संकेतस्थळ तयार करून कार्याचा डिजिटल विस्तार करणे.
  2. व्याख्याने, चर्चासत्रे, कार्यशाळा आयोजित करणे किंवा सहभागी होणे.
  3. पत्रके, पुस्तिका, नियतकालिके प्रकाशित करणे.

आर्थिक आणि व्यावसायिक विकास

[संपादन]
  1. मराठी भाषेचा व्यावसायिक वापर वाढवणे व माहितीची देवाणघेवाण करणे.
  2. सांस्कृतिक कार्यक्रम, स्मरणिका व देणग्यांद्वारे आर्थिक स्थैर्य राखणे.

प्रोत्साहन आणि गौरव

[संपादन]
  1. सामाजिक किंवा सार्वजनिक कामास साहाय्यभूत योजना राबवणे.
  2. स्पर्धात्मक प्रोत्साहन, पारितोषिके व मानचिन्हे प्रदान करणे.

अभ्यासक्रम व कार्यक्रम

[संपादन]

मराठी अभ्यास केंद्रामार्फत मराठी टंकलेखन प्रशिक्षण कार्यशाळा, मराठीप्रेमी पालक महासंमेलन, भाषा परिषद, मराठी प्रज्ञा संवर्धन चळवळ यांसारखे कार्यक्रम वेळोवेळी घेतले जातात.[][]

पुरस्कार

[संपादन]

शिक्षण, भाषा आणि प्रसारमाध्यमे या क्षेत्रांत मराठीसाठी लक्षवेधी कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना मराठी अभ्यास केंद्रातर्फे मराठी भाषा पुरस्कार देऊन समारंभपूर्वक रोख रक्कम व मानपत्र देऊन सन्मानित केले जाते.[१०]

अधिकृत संकेतस्थळ

[संपादन]

मराठी अभ्यास केंद्र Archived 2016-03-13 at the वेबॅक मशीन.

संदर्भ

[संपादन]
  1. देशमुख, इशान (2025-12-07). "मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद". ABP Majha. 2026-02-14 रोजी पाहिले.
  2. माझा, निलेश बुधावले, एबीपी (2025-06-29). "मराठी शिकवायला शिक्षक नाहीत, मग हिंदी शिकवण्यासाठी 'भैया' कुठून आले? दीपक पवारांचा प्रश्न". ABP Majha. 2026-02-14 रोजी पाहिले.
  3. "मुंबईतील मराठी शाळांचे खासगीकरण त्वरित थांबवा मराठी अभ्यास केंद्राची मागणी". Loksatta. 2026-01-30. 2026-02-14 रोजी पाहिले.
  4. "हिंदी सक्तीविरोधात आंदोलन उभं करणारे डॉ. दीपक पवार कोण आहेत? या आंदोलनामागची त्यांची भूमिका काय?". BBC News मराठी. 2025-07-02. 2026-02-14 रोजी पाहिले.
  5. "'काका-पुतण्या, भाऊ-भाऊ एकत्र येऊन निष्ठा महाराष्ट्राशी नसेल, तर काहीही उपयोग नाही'". Maharashtra Times. 2026-02-14 रोजी पाहिले.
  6. "मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्था". Maharashtra Times. 2026-02-14 रोजी पाहिले.
  7. "मराठीसाठी पुण्यात 'मराठीकारण'; सरकारविरोधात 'हे' एकत्र येणार…". Loksatta. 2025-08-21. 2026-02-14 रोजी पाहिले.
  8. "'मुंबईत ठरवून बंद पाडल्या जातायत शाळा', मराठी अभ्यास केंद्र आक्रमक; घेतला मोठा निर्णय!". Zee 24 taas. 2025-12-16. 2026-02-14 रोजी पाहिले.
  9. CD (2026-01-21). "आज मुंबईत 'माझी भाषा, माझी शाळा'". Marathi News Esakal. 2026-02-14 रोजी पाहिले.
  10. "अधिवक्ता शांताराम दातार आणि रवींद्र सुर्वे मराठी भाषा आग्रही पुरस्कार प्रदान; प्रा. विभा सुराणा मराठी भाषा पुरस्काराने सन्मानित". Maharashtra Times. 2026-02-14 रोजी पाहिले.