मराठी अभ्यास केंद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून



मराठी अभ्यास केंद्र[संपादन]

मराठी अभ्यास केंद्र हे मराठी भाषा, समाज आणि संस्कृती ह्यांसाठी विधायक चळवळ उभारू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचे संघटन आहे. लोकभाषा, व्यवहारभाषा आणि ज्ञानभाषा म्हणून मराठी मागे पडत आहे. शिक्षणापासून न्यायालयापर्यंत कुठल्याच क्षेत्रांत मराठीला स्थान नाही. जागतिकीकरणाच्या रेट्यात मातृभाषा वगैरे जुनाट गोष्टींच्या फंदात न पडता व्यक्तिगत उत्कर्षाकडे लक्ष द्यावे, अशी भूमिका राज्यकर्ते, नोकरशहा, अभिजनवर्गापैकी अनेकजण आग्रहाने मांडत आहेत. बहुजनसमाज मात्र प्रगतीच्या संधींचा शोध घ्यायचा की आपली भाषा व समाज यांच्याशी निष्ठा राखायची अशा कात्रीत सापडला आहे. आपली भाषा, समाज यांच्याशी बांधिलकी जपणे म्हणजे प्रगतीच्या मार्गापासून लांब राहणे असे चित्र उभे राहत आहे. अभ्यासातून सिद्ध झालेली विधायक चळवळ हे मराठी अभ्यास केंद्राचे स्वरूप आहे. प्रतिक्रियात्मक आणि प्रतीकात्मक पद्धतींनी आंदोलने चालवून प्रश्न सुटल्यासारखे वाटतील. पण सनदशीर मार्गाने, चिकाटीने केलेल्या पाठपुराव्याची सोबत त्याला नसेल तर हे यश तात्कालिक ठरेल.

मराठीकारण[संपादन]

या नव्या चळवळीला आम्ही मराठीकारण असे नाव दिले आहे. मराठी भाषा व संस्कृतीच्या आधाराने अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण यांचा समग्र वेध म्हणजे मराठीकारण. ही आजच्या व उद्याच्या काळासाठी, आजच्या पिढीने उभी केलेली चळवळ आहे. आजवर मराठीची आंदोलने ज्या वैचारिक आधारावर पोसली गेली, त्यापेक्षा अधिक व्यापक भूमिकेने मराठीच्या प्रश्नांचा पाठपुरावा केला पाहिजे,या भूमिकेतून मराठी अभ्यास केंद्र काम करत आहे. महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांना, घटनात्मक यंत्रणांना मराठीच्या प्रश्नांवर भूमिका घ्यायला भाग पाडणे, केंद्र आणि राज्य शासनाच्या मराठीविरोधी धोरणांत बदल घडवून आणण्यासाठी जनमत उभारणे आणि आज मर्यादित प्रतिसाद असलेल्या प्रयत्नांचे लोकलढ्यात रूपांतर करणे हे आमचे ध्येय आहे. या चळवळीला वेळप्रसंगी राजकीय लढ्याचे स्वरूप आले तरी आम्ही मागे हटणार नाही. किंबहुना एक दिवस या चळवळीला तसे व्यापक रूप येईल असा आम्हाला विश्वास आहे.

संयुक्त महाराष्ट्रासाठीचा दुसरा लढा[संपादन]

या प्रयत्नांतून सर्व थरांतला, महाराष्ट्रातला आणि बृहन्महाराष्ट्रातला मराठी माणूस जोडला जाईल. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सर्वस्व पणाला लावून मराठी जनता उतरली आणि राजसत्ता, धनसत्तेला आव्हान देऊन आपण मुंबईसह महाराष्ट्र मिळवला. आज तो महाराष्ट्र टिकवण्याचे आणि त्याचा मराठी चेहरा घडवण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे. त्यासाठी पुन्हा एकदा संघटित होण्याची आवश्यकता आहे. एका अर्थाने मराठीकारणाचा हा लढा म्हणजे संयुक्त महाराष्ट्रासाठीचा दुसरा लढा आहे. आज परिस्थिती प्रतिकूल असली तरी मराठी माणसाच्या विवेकशक्तीच्या, लढवय्येपणाच्या जोरावर आपण यशस्वी होऊ असा आम्हाला विश्वास आहे. या लढ्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची हमी हीच मराठी अभ्यास केंद्राची ओळख आहे, सदोदित असणार आहे.


इतिहास[संपादन]

आज मराठी अभ्यास केंद्रात काम करत असलेले बहुतांश कार्यकर्ते २००२ सालापासून मराठी भाषेच्या चळवळीत काम करत आहेत. महाराष्ट्र शासनाने २००२ साली अकरावी – बारावीसाठी मराठीला माहिती – तंत्रज्ञानाचा पर्याय दिला, त्याविरुद्ध सुरू झालेल्या आंदोलनात मराठीच्या शिक्षकांसोबत इतर अनेक क्षेत्रातील लोकांनी भाग घेतला. एका अर्थाने मराठी अभ्यास केंद्राच्या कामाची मुहूर्तमेढ या आंदोलनामुळे रोवली गेली आहे. न्यायालयीन मराठीच्या प्रश्नावर शांताराम दातार यांच्यासोबत परिसंवाद, शासनाशी पत्रव्यवहार आणि आंदोलने या माध्यमातून केंद्राने दोनेक वर्षे काम केले. २००६ साली मुंबई विद्यापीठाचा संज्ञापन आणि पत्रकारिता विभाग व मराठी भाषा संरक्षण आणि विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘न्यायव्यवहारात मराठी : सद्यस्थिती आणि आव्हाने’ या विषयावरील राज्यव्यापी परिषद झाली. ती यशस्वी करण्यात आणि न्यायालयीन मराठीचा प्रश्न सर्वदूर पोचवण्यात आज मराठी अभ्यास केंद्रात असलेल्या कार्यकर्त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. मराठीच्या एकेका प्रश्नावर काम करून भागणार नाही, त्यासाठी अनेक आघाड्यांवर एकाचवेळी लढले पाहिजे असा विचार करून १ डिसेंबर २००७ रोजी समविचारी कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली. यावेळी मराठीच्या चळवळीसाठी आधारभूत ठरणारे एक संशोधन केंद्र असावे अशा हेतूने मराठी अभ्यास केंद्राची स्थापना करण्यात आली. त्याचबरोबरीने मराठीसाठी काम करणाऱ्या विविध चळवळींना एका व्यासपीठावर आणून एक व्यापक राजकीय चळवळ उभारावी असाही प्रयत्न होता. नंतरच्या काळात मराठी अभ्यास केंद्र हे संशोधन आणि चळवळ दोन्हींचेही व्यासपीठ ठरले.मुंबईत १ डिसेंबर २००७ रोजी या अभ्यास केंद्राची स्थापना झाली. डॉ. प्रकाश परब आणि प्रा. दीपक पवार हे या अभ्यास केंद्राचे समन्वयक होते. त्यानंतर अभ्यास केंद्राची कार्यकारिणी निश्चित झाली. अभ्यास केंद्राचा संस्था नोंदणी क्रमांक – महा/६९४/०९/ठाणे तसेच विश्वस्त संस्था नोंदणी क्रमांक – एफ/१८५०१/ठाणे असा आहे. अभ्यास केंद्राचे मुख्य कार्यालय ठाणे येथे आहे.बुधवार दि. २७ फेब्रूवारी २००८ रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना हुतात्मा स्मारकासमोर अभिवादन करून मराठी भाषेच्या विकासाकरीता गाऱ्हािणे घालण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी २००९ रोजी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी अभ्यास केंद्राच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. हे कार्यालय प्रा. रमेश पानसे यांच्या सौजन्याने मिळाले आहे. महाराष्ट्र फौंडेशनमार्फत अतुल तुळशीबागवाले यांनी केलेल्या मदतीतून कार्यालयाचे संगणकीकरण झाले. १ मार्च २००९ पासून कार्यालय नियमितपणे सुरू झाले व मराठी अभ्यास केंद्राच्या कार्याला गती आली.

ध्येय उद्दिष्टे[संपादन]

मराठी भाषेचे, संस्कृतीचे जतन व संवर्धन करून भारताची भाषिक-सांस्कृतिक विविधता जपणे•

इंग्रजी भाषेच्या अज्ञानामुळे होणारे मराठी भाषक समाजाचे शोषण थांबवणे.•

लोकभाषा, राजभाषा मराठीची ज्ञानभाषा म्हणून जडणघडण करणे.•

मराठी भाषेच्या व्यावहारिक क्षमतांचा विकास साधणे व ती खऱ्या अर्थाने जगण्याची भाषा करणे.•

मराठी ही महाराष्ट्रीय समाजाच्या चरितार्थाची व अर्थार्जनाची भाषा व्हावी यासाठी नियोजनबद्ध रीतीने कार्य करणे.•

जागतिकीकरण व चुकीची भाषिक धोरणे यांमुळे होणारी मराठीची गळती थांबवणे.•

शिक्षण क्षेत्रात मराठी व इंग्रजी या भाषांचा वापर आणि स्थान किमान समकक्ष राहील यासाठी प्रयत्नशील राहणे.•

केवळ मराठी भाषेतून शिक्षण घेतलेल्या व इंग्रजीचे फारसे ज्ञान नसलेल्या वर्गाला व्यावहारिक इंग्रजीचे प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणणे; तसेच अमराठी भाषकांना व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण देऊन मराठी भाषा व संस्कृतीच्या मुख्य प्रवाहात आणणे.•

मराठी भाषेच्या विविध वापरक्षेत्रांचा गुणवत्तापूर्ण विस्तार होण्यासाठी लोक व प्रशासन यांच्या समन्वयातून विविध यंत्रणा प्रस्थापित करणे तसेच अस्तित्वात असलेल्या यंत्रणांना कार्यान्वित करणे.•

मराठी भाषेला माहिती-तंत्रज्ञानाची जोड देणे, मराठीतून संगणकव्यवहाराचे प्रशिक्षण देणे.•

मराठी भाषेच्या –भाषा व्यवहाराच्या विकासाचे संशोधन व सर्वेक्षण प्रकल्प स्वतंत्रपणे अथवा सहकार्याने राबवणे.•

जातिधर्मात विखुरलेल्या समाजाला मराठी भाषक समाज म्हणून एकत्र आणून सामाजिक सलोखा राखणे.•

राज्यात कनिष्ठ न्यायालयांचे सर्व कामकाज मराठीतून व्हावे तसेच उच्च न्यायालयात मराठीला प्राधिकृत भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शासनाकडे आग्रह धरणे.•

मराठी वापराबाबत समाजात जागृती निर्माण करणे. तज्ज्ञांकरवी मार्गदर्शन करणे.•

रस्ते, पाणी, वीज या संसाधनांप्रमाणे भाषा ह्या संसाधनाचे नियमन व सक्षमीकरण करणे ही राज्य शासनाची प्राथमिक जबाबदारी असून शासनाला याकामी साहाय्य करणे; तसेच शासन ही जबाबदारी टाळणार नाही यावर लक्ष ठेवणे.•

मराठी भाषेची उपयुक्तता वाढवून तिला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देणे.•

मराठी शाळा बंद पडू नयेत तसेच त्यांचा दर्जा सुधारावा यासाठी कार्य करणे.•

मराठी भाषा व संस्कृती यांच्या संर्वधनासाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती, संस्था(संसाधने) यांच्यात समन्वय साधणे; त्यांचा डेटाबेस तयार करणे.•

मराठी भाषेचा व्यावसायिक वापर वाढावा यासाठी संबंधित व्यावसायिकांना एकत्र आणणे व माहितीची देवाणघेवाण करणे.•

अमराठी भाषकांच्या वाढत्या स्थलांतरामुळे निर्माण होणाऱ्या भाषिक समस्यांचा अभ्यास करणे व उपाययोजना सुचवणे.•

स्वीकृत कार्य अधिक परिणामकारकपणे करण्यासाठी स्वतःचे मुद्रित/ई-मुखपत्र चालवणे.•

स्वीकृत कार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी राज्यात व राज्याबाहेर संपर्क केंद्रे स्थापन करणे; कृतिगटांची स्थापना करणे.•

चर्चासत्रे, व्याखाने अथवा व्याखानमाला घडवून आणणे; दुसऱ्या संस्थांनी आयोजित केलेल्या अशा प्रकारच्या उपक्रमात सहभागी होणे; अभ्यासमंडळे, कार्यशाळा आयोजित करणे.•

संस्थेच्या मतांचा प्रसार करण्यासाठी पत्रके, पुस्तिका प्रकाशित करणे; नियतकालिके, अनियतकालिकांचे प्रकाशन करणे.•

सशुल्क सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून संस्थेचे आर्थिक स्थैर्य चिरंतन करणे; स्मरणिका प्रकाशित करून जाहिरातींद्वारे व देणग्यांद्वारे पैसा जमा करणे; शक्य ती शासकीय/ निमशासकीय अनुदाने मिळवण्याच्या बाबतीत आवश्यक त्या सर्व गोष्टी करणे.•

अन्य सर्वसाधारण समान उद्दिष्टे असलेल्या संस्थांशी सहकार्य करणे/ संलग्न होणे अथवा अशा संस्थांना संलग्न करून घेणे.•

इतरत्र शाखा स्थापन करणे.•

संस्थेचे संकेत-स्थळ(वेबसाईट) तयार करणे आणि त्याद्वारे स्वीकृत कार्याची व्याप्ती वाढवणे.•

मराठी भाषेच्या संदर्भातील समाजातील वेगवेगळ्या प्रश्नांवर संशोधन करणे व याविषयावर संस्थेमार्फत कार्यशाळा, अभ्यास शिबिरे, सत्रे, परिसंवाद, परिषदा भरवणे, संशोधनपर लेख, मासिके, पुस्तके प्रसिद्ध करणे अथवा अभ्यास सत्रांना, शिबिरांना, परिषदांना व प्रकाशकांना आर्थिक सहाय्य देणे अथवा मिळवणे.•

मराठी भाषेच्या सर्वांगीण हितासाठी विविध योजना व उपक्रम सुरू करणे; ते चालवणे; शिक्षणाच्या बाबतीत कुठलीही गरीब व्यक्ती, गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अथवा कर्ज शिष्यवृत्ती देऊन शैक्षणिक मदत करणे अथवा उपलब्ध करून देणे.•

कुठल्याही सार्वजनिक व सामाजिक कामास साहाय्यभूत होईल अशी योजना सुरू करणे, चालवणे व अशा योजनेस साहाय्य करून मार्गदर्शन करणे.•

मराठी भाषेच्या संदर्भात स्पर्धात्मक प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची पारितोषिके देणे; मानचिन्ह, पुरस्कार प्रदान करणे.•

विविध ठिकणी शैक्षणिक संस्थांची, महाविद्यालयांची स्थापना करणे; वाचनालये, ग्रंथालये यांची स्थापना करणे. आधुनिक शिक्षण देण्यासाठी विविध ठिकाणी संगणक प्रशिक्षण केंद्राची स्थापना करणे व त्यायोगे विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण देऊन त्यांना मार्गदर्शन करणे.

अधिकृत संकेतस्थळ[संपादन]

संकेतस्थळ: http://marathiabhyaskendra.org Archived 2016-03-13 at the Wayback Machine.

ई-मेल: marathi@marathiabhyaskendra.org