मठ (वेंगुर्ला)
| ?मठ महाराष्ट्र • भारत | |
| — गाव — | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| जवळचे शहर | वेंगुर्ला |
| जिल्हा | सिंधुदुर्ग जिल्हा |
| लोकसंख्या | १,६९६ (२०११) |
| भाषा | मराठी |
| सरपंच | |
| बोलीभाषा | |
| कोड • आरटीओ कोड |
• एमएच/०७ |
मठ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील एक इतिहास प्रसिद्ध गाव आहे.हिरव्यागार वृक्ष-वेलींनी सजलेल्या डोंगराचे विलोभनीय सृष्टीसौंदर्य आपणास येथे पहायला मिळते.
भौगोलिक स्थान
[संपादन]मठ गावाच्या चारही बाजूला वेतोरे, खानोली, आडेली, वेंगुर्ला,तुळस ही गावे आहेत.
इतिहास
[संपादन]*मठगावचा शिलालेख*
मठ हे गाव कोकणातील एखाद्या सर्वसामान्य खेडे गावाप्रमाणेच प्रथम दर्शनी दिसेल,परंतु प्राचीन आणि अर्वाचीन इतिहासात या गावाला फार मोठे महत्त्व आहे. *मठ* गावात शिवलिंगाची शेजारी शेजारी अशी दोन देवालये आहेत.त्यातील एक देवालय मोठे आणि प्राचीन आहे ते स्वयंभू श्री शंकराचे देवालय आहे.त्याच्या बाजूला एक छोटेसे देवालय आहे,त्यास *मांगल्याचे देवालय* म्हणून ओळखले जाते.या मांगल्याच्या देवालयात भिंतीला टेकून उभे ठेवलेले सहा पाषाण आहेत त्यातील एका पाशाणावर शके १३१९ चा एक लेख ( शिलालेख ) दिसून येतो. तोच इतिहासप्रसिद्ध *"मठगावचा शिलालेख"* होय.
मठगावच्या शिलालेखाची भाषा यादवकालीन मराठी भाषेचा एक उत्तम नमुना असल्याचे इतिहासचार्य राजवाडे यांनी म्हटले आहे.
खेम सावंत राजांचा मूळ पुरुष मांग सावंत भोसले हे इ.स. १३४५ च्या दरम्यान प्राचीन विजयनगर साम्राज्याच्या प्रधानमंत्री माधवाचार्य यांच्याबरोबर कोकणात आले. मठ हा पूर्वी होडावड्याचाच एक भाग होता. मठ भागात मुस्लीम सरदारांबरोबर लढताना मांग सावंत भोसले मारले गेले.त्यावेळी त्यांना सात बायका होत्या त्यातील सहा बायका त्यांच्याबरोबर सती गेल्या सातवी बायको गरोदर होती म्हणून ती ओटवणे गावी नातेवाईकांकडे आश्रयासाठी गेली. तिला जो मुलगा झाला त्याचे नाव फोंड सावंत या फोंड सावंतच्या मुलाचे नाव खेम सावंत.या खेम सावंताने सावंतवाडी या स्वतंत्र राज्याची स्थापना केली.मठ गावातील मागल्यांच्या मठात जे सात पाषाण आहेत ते सात पाषाण म्हणजे मांग सावंत आणि त्यांच्या सती गेलेल्या सहा बायकांचे ते वीरगळ म्हणजेच स्मारकरुपी पाषाण आहेत.
==प्रमुख व्यक्तिमत्व==
1)जयवंत मठकर
[संपादन]जयवंत गंगाराम मठकर हे मराठीतील ज्येष्ठ गांधीवादी आणि सर्वोदयी कार्यकर्ते होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मठ गावचे ते मूळ रहिवासी होते. किशोरवयापासून कोकणातील गांधीवादी नेते अप्पासाहेब पटवर्धन यांच्याशी जोडले गेले. त्यांनी सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्षपद भूषवले आणि साने गुरुजी,राष्ट्रसेवा दल,सर्व सेवा संघ,खादी ग्रामोद्योग संघ,महाराष्ट्र ग्रामदान मंडळ यांसारख्या संस्थांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या.
प्रमुख योगदान:
1)कापूस ते कापड उपक्रम सुरू करून सेवाग्राम आश्रमात खादीला चालना दिली.
2)गांधी-आंबेडकर विचारसरणीचे संनाद घडवून वैचारिक सामंजस्य घडवले. 3) सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रात शेतकरी व भूमिहीनांचे स्थलांतर थांबवण्यासाठी प्रयत्न केले. गोपुरी आश्रमाचे उपाध्यक्ष म्हणून ग्रामीण विकासाला चालना दिली. 💠त्यांना 2012 मध्ये विधायक कार्यासाठी जमनलाल बजाज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
2)तुषार मठकर
[संपादन] मठ गावचे सुपुत्र श्री.तुषार दिनकर मठकर यांनी आपल्या कार्याने गावाचं नाव उंचावलं.
उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी( डेप्युटी कलेक्टर)आणि नुकतीच अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती मिळाली.
हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.
लोकजीवन
[संपादन]गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती व बागायती हा आहे. मठ गावातील हापूस आंब्यालाही चांगली मागणी असते. गावात लोकांच्या प्रवासाची सोय म्हणून एस.टी.ची सोय आहे. गावातील माती लाल आहे. गावात दळणवळण,नळयोजना,दूरध्वनी,वीज अशा पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत.येथील हवामान उष्ण व दमट असून जून,जुलै,ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यात पाऊस पडतो.
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]- श्री देव स्वयंभू देवस्थान-महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव भरतो.
- श्री देवी सातेरी देवस्थान-वार्षिक जत्रौत्सव, नवरात्र उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरा होतो.
- मांगल्यांचा मठ ( शिलालेख), निशाण तलाव, संत. लालाजी मंदिर इ.
नागरी सुविधा
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]वेंगुर्ले शहर, तुळस, आडेली वेतोरे
संदर्भ
[संपादन]१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/