मटकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मटकी-धान्य

मटकी : (मठ; हिंदी - मोट; गुजराथी - मठ, मट; कानडी - मडिके; संस्कृत - मुकुष्टक, वनमुग्द; इंग्रजी - ॲकोनाइट बीन, मट अथवा मॉथ बीन; लॅटिन - विग्ना ॲकॉनिटिफोलिया; कुल - लेग्युमिनोजी; उपकुल - पॅपिलिऑनेटी). हे एक वर्षायू (जीवनक्रम एका हंगामात पूर्ण होणारे) व लागवडीतील कडधान्य आहे. [१]मटकीचा वेल किंवा झुडूप असतो. ही मूळची भारतातील असून भारतात सर्वत्र (हिमालय ते कन्याकुमारीपर्यंत; वायव्य भारतात १,२०० मी. उंचीपर्यंत) आढळते; रानटी अवस्थेत मात्र आढळत नाही. विग्नार या वंशात हल्ली मूग, उडीद, तूर, चवळी यांचा समावेश केलेला असून त्यांच्याशी साम्य आढळल्याने आता त्या वंशात मटकीचाही समावेश करतात. ह्या वनस्पतीच्या खोडावर व फांद्यांवर बारीक केस तुरळकपणे असून पाने सोपपर्ण (तळाशी लहान उपांगे असलेली), संयुक्त व त्रिदली असतात; प्रत्येक दलाचे तीन ते पाच विभाग (दलके) असतात. उपपर्णे अरुंद व टोकदार असतात. खोडावर लहान पिवळ्या फुलांच्या मंजिर्‍या लांबट दांड्यावर येतात; शिंबा (शेंगा) लहान, गोलसर व २.५ – ६ सेंमी. लांब असून त्यांत ६ – १२, किंचित लांबट (४ X २ मिमी.) व पिंगट बिया असतात; प्रत्येक बीजात दोन जाड व लांबट दलिका असतात व पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश) नसतो. फुलाची संरचना साधारणपणे अगस्ता किंवा वाटाणा यांच्या फुलांप्रमाणे पतंगरूप असते; स्वपरागणाने (एकाच फुलातील पराग व स्त्री - केसराचा– किंजल्काचा – संपर्क होऊन) बीजोत्पादन होते.

वनस्पतीची इतर सामान्य शारीरिक लक्षणे : लेग्युमिनोजी कुलातील (शिंबावंत कुलातील) पॅपिलिऑनेटी उपकुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. बियांचा (विशेषतः बियांना मोड आणून त्यांचा) जेवणात वापर करतात; ते महत्त्वाचे अन्न आहे. मटकीत जलांश १०.८%, प्रथिने २३.६%, वसा (स्निग्ध पदार्थ) १.१%, तंतू ४.५% व इतर कार्बोहायड्रेटे ५३.५% आणि खनिजे १०० ग्रॅममध्ये ३.५ ग्रॅम आढळतात. तिच्यात कॅरोटीन, थायामीन, रिबोफ्लाविन, निॲकसीन आणि क ही जीवनसत्त्वे असतात. मोड आलेल्या बियांत क जीवनसत्त्व अधिक प्रमाणात असते.

मूग, उडीद व मटकी यांच्या बिया तेलावर भाजून (तिखट - मिठासह) केलेल्या पदार्थास ’दाल मोठ’ (डाळमूठ) म्हणतात.

मटकीची मुळे मादक असतात; ज्वरात मटकी पथ्यकर आहे. मटकी वाजीकर (कामोत्तेजक), पित्तविकाररोधक, पाचक व हृदयास बल देणारी आहे. सुश्रुतसंहितेत मटकीचा उल्लेख ‘वनमुग्द’ या नावाने आला आहे. मोड आलेले कडधान्य खाण्याचे असंख्य फायदे

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Microsoft Internet Information Services 8". marathivishwakosh.maharashtra.gov.in. 2020-07-02 रोजी पाहिले.