Jump to content

भुलेश्वर मंदिर (माळशिरस)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भुलेश्वर मंदिर

भुलेश्वर हे पुण्याजवळील प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. हे ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मूलतः हे ठिकाण "मंगलगड" असे होते. तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंती मंदिरे निर्माण करण्यात आली. याच शतकाच्या मध्यास भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले असावे. सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेत माळशिरस गावाच्या उत्तरेस व यवतच्या नैऋत्येस ७०० फूट उंचीवर मध्यास भुलेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या भिंतीवरील शिल्पात कोरीवकाम व मूर्तिकाम अद्वितीय आहे. लढाईच्या काळात बऱ्याच मूर्तींची तोडफ़ोड करण्यात आली. या मंदिरात स्त्री रूपातील गणपतीची मूर्ती आहे. गाभा‍ऱ्यात शिवलिंग आहे. मात्र फ़क्त पूजेसाठीच ते पिंडीवर ठेवण्यात येते. मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे. महाशिवरात्रीला येथे गर्दी होते.पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावातून श्रावण महिन्यात येथे भुलेश्वराची पालखी नेली जाते. दर सोमवारी यात्रा भरते. ही जुनी परंरपरा आहे.या मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. परंतु पत्रकार कवी दशरथ यादव यांनी संशोधन करून यादवकालीन भुलेश्वर हे एतिहासिक संशोधनपर पु्स्तक लिहिले आहे.हे एकमेव पुस्तक असून, महिमा भुलेश्वराचा गाण्याचा अल्बमही त्यांनी काढला आहे. शहाजीराजे यांच्या सुपे परगण्यातील हे ठिकाण असून राजामाता जिजाऊ बालशिवबाला घेऊन येत असत.सुरुवातीला हा गड निजामाचा सरदार मुरारजोगदेव याच्याकड़े होता. पुणे जाळल्यावर प्रांताचा कारभार मामले दॅालत मंगळ भुलेश्रर येथून होत होता.

मंदिराची रचना[संपादन]

अर्धखुला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा या मंदिराचा तलविन्यास आहे. या मंदिरासमोर नंदीमंडपही आहे. गर्भगृहाच्या बाह्यभिंतीवर पाच देवकोष्ठे तर अंतराळाच्या बाह्यभिंतीवर दोन देवकोष्ठे आहेत. अर्धखुल्या मंडपाच्या खालच्या थरावर सिंह आणि हत्ती तर वरच्या थरावर पुराणकथांमधील दृश्ये कोरलेली आहेत. मंदिराच्या आवाराभोवती असलेल्या भिंतीला सोळा देवकुलिका आहेत.

मंदिराची शैली[संपादन]

या मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती व पाकळ्यासदृश आहे. इतर हेमाडपंती मंदिरांच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना अधिक उच्च प्रतीची आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरांच्या बाहेरील प्राकाराची रचना उत्तरेतील जैन मंदिरांच्या धर्तीवर आहे. येथील शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव किंवा यवतेश्वर म्हणतात.पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळील हे मंदिर यादवकाळात बांधले आहे. मंदिराची मूळ बांधणी १३व्या शतकातील असून सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे १८व्या शतकातील मराठा शैलीतील आहेत. पूर्वी मूळ मंदिरास अतिभव्य प्राकार होता व नंदीचा मंडप स्वतंत्र होता. १८व्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एकाच छताखाली आले.

मंदिराचा गाभारा[संपादन]

या मंदिराचे गर्भगृह खोल असून गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे. नंदीच्या उजव्या बाजूस एक ओटा असून त्यावर कासवावर बसलेला नंदी असावा. हल्ली त्याचे फक्त डोके शिल्लक असल्यामुळे हा प्राणी निश्चित कोणता असावा हे कळत नाही. गर्भगृहातील शिवलिंगाच्या संगमरवरी बाणावर पितळी मुखवटा बसवलेला आहे. बाण काढल्यानंतर खाली आत तीन मुख्य लिंगे, तीन कोपऱ्यात उंचवट्याच्या स्वरूपात असून ती ब्रह्मा, विष्णू व महेश यांची प्रतीके आहेत. पिंडीच्या खाली असलेल्या खोलगट भागात नैसर्गिकरीत्या पाणी पाझरत असते. अन्य शिवमंदिरापेक्षा येथे अनेक वैशिष्ट्ये आढळतात. कीर्तिमुखे, उंबरठ्यांच्या मध्यभागी न काढता दोन्ही अंगास कोरलेली आहेत. गाभाऱ्याच्या गणेशपट्टीवर गणपतीचे चित्र असले तरी देवळाभोवती असणाऱ्या दक्षिणभिमुख पट्ट्यांवर गणेशाऐवजी भैरवाचे शिल्प कोरलेले आहे. ओवऱ्या व दगडात कोरलेल्या खिडक्या यांची एकाआड एक मांडणी केलेली आहे.

मंदिरातील शिल्पे[संपादन]

या मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहेत. देवळाभोवती असलेल्या ओवऱ्यांमध्ये अनेक देवतांच्या मूर्ती असून काही ओवऱ्या रिकाम्या आहेत. मुख्य सभामंडपांच्या भोवती असलेल्या अर्ध भिंतींवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण-महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरांपेक्षा येथे जास्त ठसठशीत व रेखीव आहेत. द्रौपदी-स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथाशिल्पे अधिक जिवंत वाटतात. मातृकादेवी, गणपती, विष्णूंचे अवतार, योद्धे, पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्पांकन मंदिरात आढळते.

कुंभ, कमळ कीर्तिमुख, मकर, पाने-फळे, वेलबुट्ट्या ही शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभनात वापरलेली आहेत. येथील दर्पणधारी स्त्रीमूर्ती शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे. दक्षिण दरवाज्यावर असलेल्या भरत-शत्रुघ्नाच्या डाव्या बाजूस दोन चौघडावाले उंट दाखवलेले आहेत. दक्षिणेकडील मंदिरात उंटाचे शिल्प क्वचितच आढळते. माळव्यात प्रचलित असलेल्या भूमिज उपशैलीचा प्रभाव येथील काही शिल्पांवर ठळकरीत्या आढळतो. यादव साम्राज्याची इतिश्री झाल्यानंतर यवनांकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिरांची, शिल्पांची नासधूस करण्यात आली. भुलेश्वर मंदिरातील शिल्पांचेही या काळात अतोनात नुकसान झाले. (युद्ध आणि परकीय आक्रमण) इतके असूनही या मंदिरातील शिल्लक राहिलेल्या शिल्पांमुळे येथील सौंदर्य अद्यापि टिकून आहे.

मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस वर तीन सप्तमातृकांच्या समूहात गणेशाचे स्त्रीस्वरूपातले दुर्मीळ शिल्प आहे. वेरूळच्या कैलास लेण्यात या प्रकारचे शिल्प आढळते. प्राचीन वाङ्मयात व स्कंदपुराणाच्या काशीखंडात चौसष्ट योगिनींच्या यादीत या गणेशाचा ‘वैनायकी’ असा केलेला आढळतो. देवीसहस्रनामांत या देवतेस ‘विनायकी, लंबोदरी, गणेश्वरी’ अशा विशेषणांनी संबोधले आहे. ‘शिल्परत्‍न’ या ग्रंथात वैनायकीचा उल्लेख ‘शक्तिगणपती’ असा केलेला आहे. गुप्तकाळात प्रथम सप्तमातृका शिल्पाचा उगम झाला. मध्ययुगात शक्तिपूजक संप्रदायात वैनायकी पूजनाचे महत्त्व वाढले. वैनायकी शिल्पे गजमुख, चतुर्भुज आणि गणपतीप्रमाणे आयुधे धारण केलेली आढळतात. भुलेश्वर येथील वैनायकी शिल्पे पद्मासनात बसलेली असून सालंकृत आहेत. खाली मूषक हे वाहन आहे. येथे वेरूळच्या लेण्याप्रमाणे पूर्ण शिल्पपट्टिका नसून तीन सप्तमातृकांच्या शिल्पपट्टीत वैनायकीची शिल्पे आहेत.

दौलतमंगल किल्ला आणि मंदिरांचा जीर्णोद्धार[संपादन]

१६३४मध्ये विजापूरचा सरदार मुरार जगदेव याने या डोंगरावर ‘दौलत मंगळ’ नावाचा किल्ला मांडला. (शिवचरित्र प्रदीप – १९२५) या किल्ल्याचा भग्न बुरूज अद्यापही देवळाकडे जाताना उजव्या बाजूस दृष्टीस पडतो. पहिले बाजीराव पेशवे व सातारचे शाहू छत्रपती यांचे गुरू ब्रह्मेंद्रस्वामी यांनी अनेक हेमाडपंथी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. १७३७मध्ये स्वामींनी एक लाख रुपये खर्चून तीन कमानींचा नगारखाना, सभामंडप व तीन चुनेगच्ची शिखरे बांधली. हे बांधकाम संभाजी व व्यंकोजी नाईक या गवंड्यांनी केले. देवळाच्या बांधकामात स्वामी जातीने लक्ष पुरवित असत. दमाजी गायकवाड या सरदाराने पवारांवर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ जीर्णोद्धारास पंचवीस हजार रुपये दिले. वसईच्या विजयानंतर चिमाजी अप्पांनी भुलेश्वरास मुकुटाकरिता १२५ रुपये व सव्वाशे सोन्याच्या पुतळ्या अर्पण केल्याची नोंद ऐतिहासिक साधनांमध्ये आहे. ब्रह्मेंद्रस्वामींनी माळशिरस व यवतमध्ये विहिरी व तळी बांधून दिली. येथील जीर्णोद्धारामुळे हे मंदिर भूमिज -मराठा समिश्र वास्तुशैलीचे झालेले आहे.

भुलेश्वर मंदिरातील शिल्पे, शिल्पसौंदर्याचा उत्तम आविष्कार आहेत. पुरातत्त्वखात्याने हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्थळ म्हणून घोषित केलेले आहे.

कसे जाल[संपादन]

पुण्यापासून अंदाजे ५० कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावरून निघून यवत बसस्थानकापर्यंत बस जाते. तेथून पुढे सहा आसनी रिक्षेने भुलेश्वर मंदिरापर्यंत जाता येते. तसेच यवत सासवड ही बस ही यवत वरून भुलेश्वर मार्गे सासवडला जाते .

आसपास[संपादन]

जेजुरी , पुरंदर । यवत भुलेश्वर

बाह्य दुवे[संपादन]