Jump to content

भरती व ओहोटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भरती या पानावरून पुनर्निर्देशित)

चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाने सागराच्या पाण्याच्या पातळीत होणारा नियमित चढ म्हणजे भरती व उतार म्हणजे ओहोटी. पौर्णिमेच्या आणि अमावास्येच्या रात्री समुद्राला सगळ्यात जास्त भरती येते. भरतीची वेळ व प्रमाण हे ऋतूनुसार कमीजास्त असते. तरीही साधारणत: तिथीच्या आकड्याला ०.८ ने गुणिले की भरतीची ’अंदाजे स्थानिक घड्याळी वेळ’ मिळते. उदा : पौर्णिमा म्हणजे १५वी तिथी. १५ X ०.८ = १२. म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी अंदाजे दुपारी आणि रात्री बाराला भरतीची सर्वोच्च पातळी असते. अमावास्येचा आकडा ३०. म्हणून ३० X ०.८ = २४. म्हणजे रात्रीचे बारा. अमावास्येला रात्री आणि दुपारी १२ वाजता भरतीची सर्वाधिक पातळी असते. भरतीच्या अत्युच्च पातळीस समा तर ओहोटीच्या किमान पातळीस निखार म्हणतात. समा गाठल्यानंतर पाण्याची पातळी निखाराच्या वेळेपर्यंत हळूहळू कमी होते. उच्च पातळीवरून किमान पातळीपर्यंत उतरत जाणाऱ्या समुद्राच्या हालचालीस ओहोटी म्हणतात. निखाराच्या वेळेपासून समुद्राचे पाणी हळूहळू वाढू लागते किमान पातळीपासून उच्च पातळीपर्यंत जाणाऱ्या समुद्राच्या पाण्याच्या हालचालीस भरती असे म्हणतात.

भरतीचा पल्ला -भरती आणि ओहोटी यांच्या उंचीतील फरकास भरतीचा पल्ला असे म्हणतात.

आंतरभरती -भरतीच्या वेळेस समुद्र किनाऱ्याचा भाग पाण्याखाली बुडतो तर ओहोटीच्या वेळेस उघडा पडतो. समुद्र किनाऱ्याच्या अशा उघडा पडणाऱ्या भागास आंतरभरती विभाग असे म्हणतात. समुद्र किनारा जर मंद उताराचा असेल तर आंतरभरती विभाग विस्तृत असतो आणि जर किनारा तीव्र उताराचा असेल तर आंतरभरती विभाग अरुंद असतो

भरती ओहोटी होण्याची करणे -पृथ्वीच्या पाण्यावर परिणाम करणारी पृथ्वीची केंद्रत्यागी (Centrifugal Force-अपकेंद्री बल) शक्ती व चंद्राचे गुरुत्वाकर्षण या दोन शक्तींच्या परिणामामुळे भरती-ओहोटी होते.विश्वात दोन खगोलामध्ये गुरुत्वाकर्षण असते. पृथ्वी व चंद्र यांच्यात गुरुत्वाकर्षण शक्ती कार्य करते. त्याचबरोबर सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीवर भरती ओहोटी निर्मितीला थोड्याशा कमी प्रमाणात कारणीभूत ठरते.

जेव्हा पृथ्वीवरील समुद्राचे पाणी चंद्राने ओढल्यामुळे चंद्राच्या दिशेने उचंबळते, त्याच वेळी चंद्रही पृथ्वीला आपल्याकडे ओढतो. त्यामुळे जेव्हा पृथ्वीच्या एका भागावर भरती असते, त्याचवेळी पृथ्वीच्या विरुद्ध भागावरच्या समुद्रालाही भरती येते.

भरती ओहोटीच्या वेळा - १. ज्या ठिकाणी भरती येते त्याच ठिकाणी लगेच ओहोटी येण्यासाठी ६ तास १२ मिनिटे ३० सेकंद एवढा कालावधी लागतो.

.ज्या ठिकाणी भरती येते त्याच ठिकाणी दुसऱ्यांदा भरती येण्यासाठी १२ तास २५ मिनिटे लागतात.

.ज्या ठिकाणी ओहोटी येते त्याच ठिकाणी लगेच येणारी भरती ६ तास १२ मिनिटे ३० सेकंदानी येते.

४. ज्या ठिकाणी ओहोटी येते, पुन्हा त्याच ठिकाणी ओहोटी येण्यासाठी १२ तास २५ मिनिटे कालावधी लागतो.

भरती-ओहोटीचे प्रकार - ही चंद्र, पृथ्वी व सूर्यसापेक्ष स्थितीवर अवलंबून असते. भरती ओहोटीच्या स्वरूपावरून भरती-ओहोटीचे दोन प्रकार पडतात

१.उधानाची भरती-ओहोटी = अमावस्येच्या दिवशी चंद्राच्या व सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रेरणांची बेरीज होते व या दोन्ही प्रेरणा एकत्रित पृथ्वीवरील पाण्यावर कार्य करतात. त्यामुळे या दिवशी येणारी भरती सरासरी भरतीपेक्षा मोठी असते व येणारी ओहोटी सरासरी ओहोटीपेक्षा लहान असते. पौर्णिमेच्या दिवशी सूर्य व चंद्र यांच्या दरम्यान येते. त्यामुळे पृथ्वीवरील पाण्यावर चंद्र व सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षण शक्ती कार्य करतात व ते दोन्ही पृथ्वीचे पाणी आपल्याकडे खेचतात त्यामुळे येणारी भरती नेहमीच्या भरतीपेक्षा मोठी व ओहोटी नेहमीच्या ओहोटीपेक्षा लहान असते.

२.भांगाची भरती = चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना महिन्यातून दोनदा पृथ्वी ही चंद्र व सूर्य यांच्या संदर्भात काटकोनाच्या कोनबिंदूवर येते. ही स्थिती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण अष्टमीला प्राप्त होत असते. या दिवशी भरती निर्माण करणारी चंद्राची शक्ती व सूर्याची शक्ती या एकमेकांच्या विरुद्ध कार्य करीत असतात. त्यामुळे अशी भरती सरासरी भरतीपेक्षा लहान असते व ओहोटी सरासरी ओहोटीच्या पातळीपेक्षा उंच असते. अशा भरती-ओहोटीस भांगाची भरती-ओहोटी म्हणतात.

भरती ओहोटीचे महत्त्व=१) काही आंतरभरती विभाग विस्तृत व दलदलीचे असतात. अशा आंतरभरती विभागावर मिठागरे तयार करून मीठ मिळवतात..

२) भरतीच्या वेळेस खाडीच्या मुखात मासे येतात. ओहोटीच्या वेळेस खाडीच्या मुखाशी जाळे लावून मोठ्या प्रमाणावर मासे पकडता येतात

३) भरतीमुळे समुद्रातील जहाजांची किनाऱ्यालगतच्या बंदरापर्यंत सहजपणे हालचाल होते. भरती-ओहोटीमुळे उथळ बंदरातील जहाजांची हालचाल सुलभ होते

४) भरतीमुळे निर्माण झालेल्या पाणभिंती काही नदीमुखात जहाजे चालविण्यासाठी धोकादायक असतात

५) मुंबईसारख्या किनाऱ्यावरील शहरातील सांडपाणी, कारखान्यातून बाहेर पडलेले पाणी व गटारांतून वाहणारे मलमूत्र हे भरती-ओहोटीमुळे समुद्रात दूरवर वाहून जाण्यास मदत होते

६) भरती-ओहोटीच्या शक्तीचा ऊर्जा उत्पादनासाठी उपयोग करता येतो

समुद्रातले प्रवाह - सागराच्या निश्चित दिशेने होणाऱ्या पाण्याच्या पृष्ठभागीय हालचालीस समुद्री प्रवाह म्हणतात.

समुद्री प्रवाहाच्या निर्मितीवर पुढील घटकांचा परिणाम होतो.:-

ग्रहीय वारे- ईशान्य व आग्नेय व्यापारी वारे समुद्रावरून वाहताना समुद्राचे पाणी आपल्याबरोबर विषुववृत्ताकडे ढकलत नेतात. त्यामुळे पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या विषुववृत्तीय प्रवाहांची निर्मिती होते.

पृथ्वीचे परिवलन - पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वीचा परिवलनाचा वेग विषुववृत्तावर सर्वात जास्त असतो. त्यामुळे विषुववृत्तावरील पाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे विषुववृत्तीय प्रवाहाच्या रूपाने वाहते. पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात समुद्र प्रवाह आपल्या उजवीकडे वळतात. त्यामुळे त्यांची वळण्याची दिशा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असते.

सागरातील पाण्याच्या तापमानातील भिन्नता-सागरजलाचे तापमान विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे कमी होत जाते. उष्ण कटिबंधातील सागरजल उष्ण असते तर ध्रुवीय प्रदेशातील सागरजल थंड असते. शीत समुद्राचा प्रवाह जड असल्यामुळे तो सागरजलाच्या पृष्ठभागाखालून वाहतो.

समुद्राच्या पाण्यामधल्या क्षारतेतील भिन्नता - कमी क्षारता असलेले समुद्राचे पाणी हलके असते तर जास्त क्षारता असलेले समुद्राचे पाणी जड असते. त्यामुळे कमी क्षारता असलेल्या समुद्राच्या पृष्ठभागाकडून जास्त क्षारता असलेल्या समुद्राकडे पाणी कमी क्षारता असलेल्या जलपृष्ठाखालून वाहू लागते.

भूशिराचा अडथळा - समुद्र प्रवाहाच्या मार्गात एखाद्या भूशिराचा अडथळा आल्यास तो प्रवाह विभागला जाऊन त्याच्या दोन शाखा होतात. उदा० अटलांटिक महासागरातील दक्षिण विषुववृत्तीय समुद्री प्रवाह ब्राझीलच्या भूशिराजवळ विभागला गेला आहे.

भरतीमध्ये व ओहोटीमध्ये चंद्राचा मोठा कार्यभाग आहे.

{विस्तार}}