ब्रियॅन सिडोनी डेसॉल्निये (१ ऑक्टोबर १९८९), व्यावसायिकपणे ब्री लार्सन म्हणून ओळखली जाते, ही एक कॅनेडियन आणि अमेरिकन अभिनेत्री आहे. [१] किशोरवयात विनोदी मालिकांतील सहाय्यक भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या लार्सनने नंतर स्वतंत्र चित्रपट आणि ब्लॉकबस्टर्समधील प्रमुख भूमिका केल्या. लार्सनला अकादमी पुरस्कार, गोल्डन ग्लोब पुरस्कार, आणि प्राइमटाइम एमी पुरस्कार यासह विविध पुरस्कार मिळाले आहेत. टाइम मासिकाने २०१९ मधील जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून तिची निवड केली.
वयाच्या सहाव्या वर्षी लार्सन ही अमेरिकन कंझर्व्हेटरी थिएटरमध्ये प्रशिक्षण कार्यक्रमात प्रवेश घेणारी सर्वात तरुण विद्यार्थिनी होती. तिने १९९८ मध्ये द टुनाइट शो विथ जे लेनो या विनोदी कार्यक्रमातून तिच्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली. २००१ ची सिटकॉम मालिका रेझिंग डॅडमध्ये ती नियमित दिसली आणि २००५ मध्ये फायनली आऊट ऑफ पीई हा अल्बम प्रदर्शित करत तिने संगीत कारकीर्दीमध्ये हजेरी लावली. लार्सनने त्यानंतर हूट (२००६), स्कॉट पिलग्रिम व्हर्सेस द वर्ल्ड (२०१०), आणि २१ जंप स्ट्रीट (२०१२) या विनोदी चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या आणि युनायटेड स्टेट्स ऑफ तारा (२००९-२०११) या दूरचित्रवाणी मालिकेत तिने व्यंग्यवादी किशोरवयीन म्हणून काम केले.
गाजलेले स्वतंत्र नाटक शॉर्ट टर्म १२ (२०१३) मधील प्रमुख भूमिकेने ती प्रसिद्धीस आली आणि तिने प्रणयपट द स्पेक्टॅक्युलर नाऊ (२०१३) आणि विनोदपट ट्रेनवेरक (२०१५) मध्ये सहायक भाग घेणे सुरू ठेवले. ड्रामा रूम (२०१५) मध्ये अपहरण पीडितेची भूमिका केल्याबद्दल लार्सनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार मिळाला. २०१७ चा साहसी चित्रपट कॉंग: स्कल आयलंडने तिचा पहिला मोठा-बजेट चित्रपट होता. त्यानंतर तिने कॅप्टन मार्वल (२०१९) पासून सुरुवात करून मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये कॅप्टन मार्वल म्हणून काम केले.