बोहाय समुद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुणक: 38°42′N 119°54′E / 38.7°N 119.9°E / 38.7; 119.9

बोहाई समुद्राचे स्थान

बोहाय समुद्र किंवा बो समुद्र हा पिवळा समुद्र आणि कोरिया उपसागराच्या पश्चिमेकडील एक आखात आहे. त्याला बोहायचा आखात (渤海) असेही संबोधले जाते. हा समुद्र चीनच्या उत्तर आणि इशान्य किनारपट्टीवर आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे ७८,००० किमी आहे. बीजिंग ह्या चीनच्या राजधानीच्या सान्निध्यामुळे हा जगातील सर्वाधिक व्यस्त समुद्रमार्गांपैकी एक आहे.

इतिहास[संपादन]

२०व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळापर्यंत बोहाय समुद्राला अनेकदा चिह्लीचा आखात (直隸海灣) किंवा पीचिह्लीचा आखात (北直隸海灣) असे म्हटले जात. चिह्ली आणि पिचिह्ली हे बीजिंगच्या जवळचे ऐतिहासिक प्रांत होते.

भूगोल[संपादन]

बोहाय समुद्र हा ल्याओदोंग आणि षांतोंग द्वीपकल्पांच्या मध्ये असलेल्या चांगशान द्वीपसमूहाने बद्ध आहे. आधुनिक काळात हा एक प्रचंड व्यस्त समुद्रमार्ग झाला आहे. बोहाय समुद्रामध्ये खालीलप्रमाणे तीन मुख्य उपसागर आहेत: दक्षिणेस लायचौ उपसागर, उत्तरेस ल्याओदोंग उपसागर आणि पश्चिमेस बोहाय उपसागर. बोहाय समुद्राच्या पूर्वेच्या टोकाला बोहायची सामुद्रधुनी आहे (渤海海峡). बोहाय समुद्रात ह्वांग हो, हाय, ल्याओ आणि ल्वान ह्या नद्या वाहतात. षंगली तेलक्षेत्रासारखे काही महत्त्वाचे तेलाचे साठे जवळ आहेत. चांगशान द्वीपसमूह, चांगशिंग द्वीपसमूह आणि शिचोंग द्वीप ही समुद्रातील काही महत्त्वाची द्वीपे आहेत. बोहाय समुद्रालगत किनारा असलेले चीनचे प्रांत खालीलप्रमाणे आहेत: षांतोंग, हपै, त्यांजिन आणि ल्याओनिंग.

महत्त्वाची बंदरे[संपादन]

बोहाय समुद्राच्या किनाऱ्यावर पाच मोठी बंदरे आहेत. ही बंदरे 10 कोटी टन इतक्या प्रामाणाचा व्यापार हाताळतात:

चीनच्या सरकारची बोहाय समुद्रमार्गांची योजना. नियोजित मार्ग हे वर्तमान मार्गांचेच जवळपास अनुसरण करतात.
 • यिंगकौ बंदर (营口港)
 • च्छिन्व्हांगदाओ बंदर (秦皇岛港)
 • तांगषान जिंगतांग बंदर (京唐港)
 • तांगषान त्साओफीदियान बंदर (曹妃甸港)
 • त्यांजिन बंदर (天津港)
 • ह्वांगह्वा बंदर (黄骅港)

सांख्यिकीय कारणांसाठी त्साओफीदियान आणि जिंगतांग बंदरांना एकच मानतात. दालियान आणि यांताय ही बंदरे देखील पारंपारिक दृष्ट्या बोहाय प्रणालीत मानतात, परंतु वस्तुतः ती बोहाय समुद्र किनाऱ्यावर नाहीत. २०१३ मध्ये लोंगकौ बंदराने ७ कोटी टनांचा टप्पा गाठला, आणि लवकरच १० कोटी टनांचा टप्पा गाठेल अशी अपेक्षा आहे.[१]

बोहाय समुद्रकिनाऱ्यावरील प्रमुख शहरे[संपादन]

ल्याओनिंग प्रांतातील दालियान शहराजवळचा खडकाळ किनारा
 • त्यांजिन
 • दालियान, ल्याओनिंग
 • च्छिन्ह्वांगदाओ, हपै
 • यांताय, षांतोंग
 • लोंगकौ, षांतोंग
 • पंगलाय, षांतोंग
 • वीहाय, षांतोंग
 • वीफांग, षांतोंग
 • लायचौ, षांतोंग

हायड्रोकार्बन संसाधने[संपादन]

बोहाय समुद्रात तेलाचे व नैसर्गिक वायूचे अनेक साठे आहेत, ज्यांचा चीनच्या समुद्री ऊर्जानिर्मितीत लक्षणीय वाटा आहे. षंगली तेलक्षेत्र हे या भागातील मुख्य ऊर्जाक्षेत्र आहे. १९६० सालापासून त्याचा उपयोग सुरू आहे. अद्यापही त्यातून दिवसाला सुमारे ५ लाख बॅरल्स इतकी निर्मिती होते, पण हे प्रमाण कमी होत आहे.[२] बहुतांश ऊर्जानिर्मिती चीनी कंपनया करतात (चायना नॅशनल ऑफशोअर ऑइल क़ाॅर्पोरेशन ही कंपनी मुख्यतः ह्याच प्रदेशाकरिता निर्माण केली गेली), पण कोनोकोफिलिप्स, राॅक ऑइल इ. सारख्या काही परदेशी कंपनया देखील आहेत.

ह्या भागात वरचेवर तेलगळती होतात असे निदर्शनास आले आहे. २०११ मध्ये दोन महिन्यांच्या कालावधीत ३ तेलगळतीचे प्रसंग झाले.[३]

बोगदा[संपादन]

फेब्रुवारी २०११ मध्ये चीनने बोहाय सामुद्रधुनीच्या आरपार जाणारा ल्याओदोंग आणि षांदोंग प्रांतांना जोडणारा रस्त्याचा आणि रेल्वेचा १०३ कि.मी. लांबीचा बोगदा बांधण्याचे जाहीर केले.[४] २०१३ मध्ये ह्या योजनेत बदल करण्यात आला आणि १२३ कि.मी. लांबीचा दालियान आणि यांताय शहरांना जोडणारा बोगदा बांधण्याचे ठरवण्यात आले.[५]

संदर्भ[संपादन]

 1. ^ http://www.chinanews.com/gn/2013/12-23/5652663.shtml
 2. ^ "China". Archived from the original on 2012-01-13. 2016-02-06 रोजी पाहिले.
 3. ^ China: Third Oil Spill in Bohai Sea in Less than Two Months Archived 2016-03-04 at the Wayback Machine..
 4. ^ Asahi Shimbun, "China To Build Undersea Tunnel Crossing Bohai Strait", 18 February 2011.
 5. ^ "'China plans world's longest sea tunnel at $42 billion -report".