बॉम्बे, बरोडा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बॉम्बे, बरोडा ॲंड सेंट्रल इंडिया रेल्वे तथा बी.बी. ॲंड सी.आय. ही भारतातील रेल्वे कंपनी होती. या कंपनीची स्थापना १८५५ साली बॉम्बे प्रेसिडेन्सीची राजधानी मुंबई आणि वडोदरा संस्थानाची राजधानी वडोदरा यांना रेल्वेमार्गे जोडण्यासाठी करण्यात आली. हे काम ९ वर्षांत पूर्ण झाले व १८६४मध्ये मुंबई पासून वडोदरापर्यंत पहिली रेल्वेगाडी धावली.

बी.बी. ॲंड सी.आय.ने मुख्यत्वे ब्रॉड गेज आणि मीटर गेज प्रकारचे रेल्वेमार्ग बांधले. याशिवाय गुजरातमधील संस्थानांसाठी या कंपनीने २ फूट ६ इंच रुंदीच्या नॅरोगेज रेल्वेमार्गाचे जाळेही बांधले. यानंतर बीबी ॲंड सीआयने मध्य आणि पश्चिम भारतात मीटरगेज आणि ब्रॉडगेजचे अनेक रेल्वेमार्ग उभारले. १८६७मध्ये या कंपनीने भारतातील सर्वप्रथम उपनगरी रेल्वेसेवा सुरू केली. ही सेवा कोलाबा रेल्वे स्थानकापासून विरार पर्यंत धावत असे.

बीबी ॲंड सीआयचे मुख्यालय चर्चगेट स्थानकात होते तर मीटर गेज मार्गांचे व्यवस्थापन अजमेर येथून होई. ब्रिटिश सरकारने १९०५मध्ये ही कंपनी पूर्णपण विकत घेतली परंतु त्यानंतरही ती स्वतंत्र कंपनीप्रमाणेच कारभार करी. १९४२मध्ये ब्रिटिश सरकारने या कंपनीचे कामकाज आपल्या हाती घेतले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर या कंपनीने उभारलेले सगळे रेल्वेमार्ग भारतीय रेल्वेच्या ताब्यात आले. यातील बव्हंश मार्ग पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत होते.