बिन्‍नी यांगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बिन्नी यांगा (७ जुलै, इ.स. १९५८:इटानगर, अरुणाचल प्रदेश, भारत - ३ सप्टेंबर, इ.स. २०१५:गुवाहाटी, असम, भारत) या अरुणाचल प्रदेशात राहणार्‍या स्त्रियांसाठी काम करणार्‍या एक समाजसेविका होत्या.

बिन्नी यांगा आपल्या कॉलेजच्या शिक्षणासाठी राजस्थानच्या ‘बनस्थली’ या महिला विद्यापीठात गेल्या. शिक्षिका होण्याचे प्रशिक्षण असून शाळेत नोकरी न करता त्यांनी १९७९ साली ऑल सुबांसिरी डिस्ट्रिक्ट गर्ल्स असोसिएशनची स्थापना केली.

वयाच्या एकविसाव्या वर्षी बिन्नी यांना अरुणाचलमधील मुलींचे कमी वयातील विवाह, हुंडापद्धती अशा पिढ्यान्‌पिढ्या न बदललेल्या सामाजिक अपप्रवृत्तींशी लढायचे होते.[ दुजोरा हवा] पण नेमके त्याच वेळी, अरुणाचल प्रदेश पोलीस दलात नव्यानेच स्थापन होणार्‍या महिला पोलीस विभागात काम करण्याची संधी त्यांना मिळाली. १९८७ साली पहिल्या अरुणाचली महिला पोलीस तुकडीत बिन्नी यांचा समावेश झाला.

समाजकार्य[संपादन]

मात्र पोलीसात काम करून बढत्या मिळवणे हे आपले ध्येय नव्हे, असे लक्षात आल्याने वर्षभरातच पोलीस दल सोडून बिन्‍नी यांगा यांनी पुन्हा संस्था-उभारणीत स्वतःला गाडून घेतले. मुलांसाठी अनाथालय, १०० मुलांमुलींसाठी शाळा, असा व्याप वाढला आणि त्यांनी स्थापन केलेल्या ‘ओजो वेल्फेअर असोसिएशन’चे नावही गाजत गेले. महिलांच्या सहकारी गटांतर्फे वस्तू बनवल्या तरी दलालांकडून पिळवणूक होतेच, म्हणून बिन्नी यांनी ‘हिमगिरी सहकारी विपणन (विक्री) संस्थे’च्या स्थापनेत पुढाकार घेतला.

मृत्यू[संपादन]

ओटीपोटाच्या कर्करोगाशी आठ वर्षे या झुंज देऊन त्या ३ सप्टेंबर २०१५ रोजी निधन पावल्या.

पुरस्कार[संपादन]

  • बिन्‍नी यांच्या समाजसेवेचे फळ म्हणून त्यांना २०१२ साली पद्मश्री प्रदान करण्यात आली.
  • बिन्नी यांना त्यापूर्वी इ.स. २००० मध्ये दुर्गाबाई देशमुख पुरस्कारही मिळाला होता.