Jump to content

बायजाबाई शिंदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बायजाबाई शिंदे या ग्वाल्हेर संस्थानाच्या राणी होत्या. त्यांनी अत्यंत दोलायमान राजकीय स्थितीत ग्वाल्हेर संस्थानचा कारभार सांभाळला. बायजाबाई शिंदे यांच्या कर्तृत्वाचे वर्णन अनेक देशी-विदेशी इतिहास अभ्यासकांनी केले आहे.

शिंदे दिसायला अत्यंत सुंदर आणि सुस्वरूप होत्या असे वर्णन अनेक इतिहासलेखकांनी केलेलं आहे. इंग्रज लेखकांनी त्यांना ब्युटी ऑफ डेक्कन (दक्षिणेची सौंदर्यलतिका) असे म्हणले आहे.[ संदर्भ हवा ]

बायजाबाई (माहेरच्या घाटगे) या आजच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील होत्या. कागल येथील देशमुखी घाटगे घराण्याकडे होती. या घराण्यातील एक शूर पुरुष सखाराम म्हणजेच सर्जेराव घाटगे हे परशुरामभाऊ पटवर्धन यांच्याकडे नोकरीस होते. पटवर्धन यांच्यामुळे त्यांचे पुण्यात पेशव्यांकडे येणे-जाणे होऊ लागले. सर्जेराव घाटग्यांचे गुण पाहून त्यांनी पुण्यातच राहावे अशी विनंती नाना फडणवीसांनी केली आणि घाटगे पुणे दरबारातच रुजू झाले. पुढे सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर दुसरे बाजीराव पेशवेपदी आले तेव्हाच्या काळामध्ये महादजी शिंदे यांचे दत्तकपुत्र दौलतराव शिंदे यांच्याशी सर्जेराव घाटग्यांचा संपर्क आला.

सर्जेराव घाटगे यांच्या मुलीशी दौलतराव शिंदे यांनी विवाह करावा असा प्रस्ताव दुसऱ्या बाजीरावांनी मांडला. ही कन्या म्हणजेच बायजाबाई शिंदे होय. त्यानंतर शिंदे यांच्या दिवाणपदावर सर्जेराव घाटगे यांची नेमणूक झाली आणि १७८८ च्या मार्च महिन्यात बायजाबाई घाटगे आणि दौलतराव शिंदे यांचा विवाह झाला.

नंतरच्या काळात सर्जेराव घाटगे आपल्या कृष्णाकृत्यांमुळे दरबारात बराच अप्रिय झाला. पुणे आणि इंदौर वर जाळपोळ केल्यामुळे ब्रिटिश आणि होळकर सत्तानी देखील त्याला शिंद्याच्या कारभारातून बाजूला करण्याचा तगादा लावला होता, त्याप्रमाणे दौलतराव शिंदे यांनी सर्जेरावास कारभारातून बाजूला केले. ह्या घडामोडींनी सर्जेराव नाराज होता, एकदा वाठारच्या निंबाळकरांच्या वतनाचा विषय घेऊन तो महाराजांच्या समोर गेला पण महाराजांनी त्याच्याकडे नंतर पाहू म्हणून दुर्लक्ष केले पण सर्जेराव मात्र उर्मटपणे महाराजांच्या अंगरख्याला ओढून आजच निवाडा झाला पाहिजे म्हणून झटापटीला आला त्यात तलवारी निघाल्या व महाराजांचे २ अंगरक्षक मारले गेले, मोठा गहजब झाला. त्यावेळी महाराजांच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी सरदार आनंदराव शिंदे (रणबहददूर मानाजी शिंदे फाकडे यांचे पुत्र) यांच्यावर होती त्यांनी आपल्याबरोबर काही निवडक सैनिक घेतले व सर्जेरावाच्या तंबूवर धावा बोलला, तत्कालीन ब्रिटिश रेसिडेंटच्या वृत्तांतानुसार आनंदरावांनी तंबू कापले व सर्जेरावास भर रस्त्यात खांडोळी करून वध केला आणि शासन केले. रेसिडेंटच्या वृत्तांनुसार येवढी मोठी घटना घडून देखील ग्वाल्हेर मधील कोणी हळहळले नाही, लोकांनी आपापले व्यवहार रोजच्याप्रमाणे पुर्वव्रत ठेवले. काही इतिहासकार असेही म्हणतात की सर्जेरावचे पारिपत्य दौलतरावांच्या आदेशानेच झाले व ती जबाबदारी आपल्या घरातील विश्वासू आनंदरावास दिली, कारण सर्जेराव महत्त्वकांशी पुरुष होता आणि शिंदेशाहीची घाडगेशाही करण्याच्या बतावण्या करू लागला होता.

दत्तात्रय बळवंत पारसनीस यांनी महाराणी बायजाबाई शिंदे यांचे त्याच नावाचे चरित्र १९०२ साली प्रसिद्ध केलं आहे. या पुस्तकात या सर्व घडामोडींचे वर्णन केले आहे.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/1 - विकिस्रोत". mr.wikisource.org. 2020-05-14 रोजी पाहिले.
विकिस्रोत
विकिस्रोत
बायजाबाई शिंदे हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.