Jump to content

पिरु सिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कंपनी हवालदार मेजर [a] पिरू सिंग शेखावत (२० मे, १९१८ - १८ जुलै, १९४८) हे भारतीय लष्करातील नॉन-कमिशन्ड अधिकारी होते. १९४८ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील त्यांच्या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्र (PVC) हा भारतातील सर्वोच्च लष्करी सन्मान देण्यात आला. [१]

शेखावत त्यांच्या १८व्या वाढदिवशी, २० मे, १९३६ रोजी ब्रिटीश भारतीय सैन्यात भर्ती झाले. त्यांना १ल्या पंजाब रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आले. सुरुवातीस त्यांनी वायव्य सीमेवर प्रशिक्षक म्हणून काम केले आणि नंतर १९४० आणि १९४५ दरम्यान, ब्रिटिश कॉमनवेल्थ ऑक्युपेशन फोर्सचा भाग म्हणून जपानमध्ये तैनात झाले. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी ते भारतीय सैन्याच्या ६व्या राजपुताना रायफल्समध्ये होते.

१९४७-४८ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ते सीमेवर होते. तेथे तिथवाल येथील पाकिस्तानी चौकी काबीज करण्यासाठी पाठविलेल्या कंपनीच्या आघाडीवरील गटात ते होते. त्यांच्या कंपनीने चौकीवर हल्ला केल्याकेल्या लगेचच कंपनीचे मोठे नुकसान झाले. तरीही पुढे सरकत सिंग यांनी पाकिस्तानी मध्यम मशीन-गन बळकावली. हे होईपर्यंत संपूर्ण कंपनी मृत किंवा जखमी अवस्थेत पडली होती आणि सिंग शत्रूच्या चौकीत एकटे पडले होते. अशा परिस्थितीत माघार घेण्याचे किंवा गर्भगळित होउन शत्रूला शरण येण्याऐवजी सिंग चौकीतून बाहेर पडले आणि पुढच्या चौकीवर ग्रेनेड फेकत त्यांनी एकांडा एल्गार केला. अनेक शत्रूसैनिकांना ठार मारीत ते पुढच्या चौकीबाहेरील खंदकाजवळ आले. येथ पोहोचेपर्यंत शत्रूने त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला होता व सिंग यात अनेक गोळ्या खातही पुढे सरकत होते. खंदकाजवळ येईतो त्यांना जवळजवळ दिसेनासे झाले होते. अशातही त्यांनी खंदकात उडी मारली आणि अजून काही सैनिकांना यमसदनी धाडले. खंदकातून बाहेर पडून चौकीवर पुन्हा एकदा एकांडा हल्ला करताना त्यांना डोक्यात गोळी लागली. मृत्यूपूर्वी त्यांनी आपला शेवटचा ग्रेनेड शत्रूच्या चौकीवर भिरकावला व नंतरच त्यांनी वीरमरण पत्करले.

१७ जुलै, १९४८ रोजी कंपनी हवालदार मेजर सिंग यांना भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान, परमवीर चक्र मरणोत्तर प्रदान करण्यात आला.

राष्ट्रीय युद्ध स्मारकातील परम योद्धा स्थळ येथे पिरू सिंह यांचा पुतळा

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Param Vir Chakra winners since 1950". The Times of India. 26 October 2016 रोजी पाहिले.


चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.