Jump to content

पाणिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाणिनी
साहित्य प्रकार संस्कृतव्याकरणस्य सूत्ररचयिता

पाणिनी हा संस्कृत भाषेचा व्याकरणकार होता. तो हल्लीच्या पाकिस्तानात इ.स.पूर्व आठव्या शतकात होऊन गेला. त्याने ऋग्वेदाची पुनर्रचना केली(?). तसेच संस्कृत व्याकरणाचे नियम चौकटबद्ध केले. असे म्हटले जाते की, पाणिनीला वाघाने अकाली खाल्ले व त्याला मृत्यू पावला. पाणिनीमुळे संस्कृत भाषेचे उत्तम व्याकरण व कोश निर्माण झाले आणि त्यामुळे अभिजात संस्कृतला भाषेचा एक स्थिरपणा आला. वैदिक संस्कृतातील पद्यरचनेला गण, मात्रा, ही बंधने नाहीत. तसेच काही शब्दांत, उच्चारणात फरक आहेत, वैदिक वाङ्मयाच्या निर्मितीनंतर पाणिनी झाला त्यामुळे मुख्य ब्राम्हणेवेदग्रंथ हे पाणिनीच्या वेळीच प्राचीन झाले होते हे पाणिनीच्या सूत्रांवरून निश्चित होते.

पाणिनीच्या सूत्रांत वैदिक भाषेस 'छन्दसि' व लौकिक भाषेस (लोकांमध्ये रूढ असलेली रूढ बोलीभाषा) 'इतिभाषायाम्‌' असे म्हटलेले आहे. म्हणजे पाणिनीच्या वेळेस संस्कृत भाषा लोकांच्या बोलण्यात होती. पाणिनीनंतर ती फक्त पंडिताच्या बोलण्यात शिल्लक राहिली असावी असे मानले जाते.

जगातला सर्वात समर्थ व्याकरणकार म्हणून पाणिनी प्रसिद्ध आहे. त्याने त्या काळच्या संस्कृत साहित्य बांधले आणि म्हणूनच पुढे संस्कृतात सुसंबद्ध रचना तयार झाल्या असे इतिहास सांगतो. योगसूत्राचे रचनाकार पतंजलीने हे पाणिनीचे ऋण मान्य केले आहे. हे व्याकरण तयार करायचे ठरल्यावर ते एका खोलीत बसून करता येणार नाही त्यासाठी जनतेत जावे लागेल ही जाणीव पाणिनीला प्रथम झाली. गावांमधून, आश्रमांमधून मंत्रिपरिषदेच्या बैठकांतून, सैनिक, व्यापारी आणि श्रमिक यांच्या बोलीभाषेतून असंख्य शब्द, वाक्प्रचार, म्हणी पाणिनीने गोळा केल्या. तसेच शेती, निरनिराळे खेळ, नृत्य, अर्थव्यवहार, चालीरीती या आणि अश्या अनेक गोष्टींमधून त्याने शब्दांचा ढीग आधी रचला आणि मग त्यातून ते जोडून वापरण्याच्या ज्या प्रचलित पद्धती होत्या त्यांना नियमांत बांधले. हे नियम पाणिनीने आठ प्रकरणे असलेल्या ’अष्टाध्यायी’ नावाच्या ग्रंथात एकत्र केले. जगातल्या सर्वच भाषाकारांनी पाणिनीचे हे अद्वितीयत्व मान्य केले आहे.

पुढे संस्कृत ही अनेक भाषांची जननी ठरली, ते या व्याकरणामुळे घडले. पाली आणि अर्धमागधी या भाषा संस्कृतच्या अपभ्रंशातून निर्माण झालेल्या भाषा आहेत आणि त्यातूनच बौद्ध आणि जैन तत्त्वज्ञान सांगण्यात आले. योग किंवा मानसशास्त्राचा लेखक पतंजली आणि नंतर गौतमाने सांगितलेले न्याय किंवा तर्कदर्शन व त्याची मांडणी या व्याकरणाच्या मुशीतूनच बाहेर पडू शकली. आधुनिक भारतीय भाषा या संस्कृतपासून निर्माण झाल्या असे अनेक भाषातज्‍ज्ञ मानतात. त्या भाषांचे व्याकरण बहुशः पाणिनीच्या व्याकरणावरच आधारित असते.