पहिला कांतीरव नरसराज वोडेयार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


कांतीरव नरसराज वोडेयार
मैसुरुचा १२वा राजा
अधिकारकाळ १६३८-१६५९
अधिकारारोहण १६३८
राज्याभिषेक १६३८
राजधानी मैसुरु
पदव्या रणधीर कांतीरव नरसराज वोडेयार
जन्म १६१५
तेरकनंबी, गुंडलपेट जिल्हा
मृत्यू ३१ जुलै, १६५९
पूर्वाधिकारी दुसरा राज वोडेयार
' दोड्डा केम्पदेवराज वोडेयार
उत्तराधिकारी दोड्डा केम्पदेवराज वोडेयार
राजघराणे वडियार घराणे
धर्म हिंदू

पहिला कांतीरव नरसराज वोडेयार (१६१५ - ३१ जुलै, १६५९) हा मैसुरुचा १२वा राजा होता. हा १६३८ ते १६५९ या काळात सिंहासनावर होता.

राज्यारोहण[संपादन]

कांतीरवच्या आधी दुसरा राज वोडेयार दोनच वर्षे सत्तेवर होता. दुसऱ्या राजच्या राज्याभिषेकाला दोन वर्षे होण्याआधीच त्याच्या सेनापती विक्रमरायाने त्याच्यावर विषप्रयोग करविला. [१] त्यानंतर २३ वर्षीय कांतीरव सिंहासनावर आला. हा पहिल्या राज वोडेयारचा दत्तक मुलगा होता. पहिल्या राजच्या विधवेने त्याच्या मृत्यूनंतर हे दत्तकविधान केले होते. याधी हा सध्याच्या चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलपेटजवळ तेरकानांबी येथे राहत असे. [१]

राजवट[संपादन]

त्याच्या राज्यारोहणानंतर लगेचच राज्यावर चालून आलेल्या विजापूरच्या आदिल शाही फौजांविरुद्ध लढण्यास गेला. श्रीरंगपट्टणचा बचाव करताना त्याने शत्रूची मोठी खानाखराबी केली. [२] आपल्या आधीच्या शासकांप्रमाणेच त्याने आपल्या राज्याचा विस्तार करणे सुरू ठेवले. [१] यासाठी त्याने दक्षिणेकडील मदुराईच्या नायकांकडून सत्यमंगलम प्रदेश जिंकून घेतला तर पश्चिमेकडील पिरियापटना येथील चिंगल्वांना त्यांच्याच ठाण्यांपासून हाकलून लावले. त्याने उत्तरेकडील (सेलेमजवळचे) होसूर शहर ताब्यात घेतले आणि केम्पेगौडाच्या उरलेल्या राजवटीला खिळखिळे करून टाकले. याने बेंगलुरुजवळील येलहंका येथील मागदी लोकांकडून मोठी खंडणी वसूल केली. [१]

कांतीरवाने मैसुरुच्या इतिहासात पहिल्यांदाच आपल्या राज्यतंत्राचे ठसे उमटवले. त्यात शाही टाकसाळ सुरू करणे आणि आपल्या नावाची कांतिराय (कँटेरॉय) अशी नाणी चलनात आणणे, वडियार घराण्याचे मानचिह्न तयार करणे इ. चा समावेश होता.[१] कांतीरवाचे कांतिराय हे चलन शतकाहून अधिक काळ मैसुरुचे अधिकृत चलन होते. [१]

विजयनगर साम्राज्याचे विघटन[संपादन]

कांतीरवाच्या आधीच बहमनी आणि दख्खन सल्तनतींनी विजयनगर साम्राज्याची वाताहत केली होती परंतु तिसरा श्रीरंग अजूनही तेथील नाममात्र सम्राट होता आणि मैसुरुचे संस्थान त्याला मांडलिक होते. कांतीरवाने हे नाममात्र मांडलिकत्व कायर ठेवले असले तरी तोपर्यंत श्रीरंग आणि विजयनगरला कोणीही दाद देत नव्हते

कांतीरव नरसराजाला दहा बायका होत्या.

३१ जुलै, १६५९ रोजी वयाच्या ४४व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

ख्रिश्चन धर्माचे मैसुरुमध्ये आगमन[संपादन]

कॅथोलिक मिशनरी दक्षिण भारताच्या किनारपट्टीच्या भागात — मलबार किनारा, कन्नड किनारा आणि कोरोमंडल किनारा — सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस आले होते तरीही सतराव्या शतका उत्तरार्धापर्यंत त्यांचा मैसुरुमध्ये शिरकाव झाला नव्हता. [३] १६४९मध्ये गोव्यातील इटालियन जेसुइट धर्मगुरू लिओनार्डो सिन्नामी यांनी म्हैसूर मिशनची स्थापना श्रीरंगपट्टण येथे केली. [३] काही वर्षांनंतर कांतीरवाच्या दरबारातील विरोधामुळे सिन्नमीला म्हैसूरमधून तडीपार केले गेले. तरीही कांतीरवाच्या राजवटीच्या शेवटी सिन्नमी अर्धा डझन ठिकाणी मिशन स्थापन करण्यासाठी परतला. [३] त्याच्या दुसऱ्या मुक्कामादरम्यान सिन्नमीने कांतीरवाच्या प्रजेचे ख्रिस्ती धर्मात रुपांतर करण्याची परवानगी मिळवली. सुरुवातीस त्याने राज्याच्या पूर्वेकडील प्रदेशांमधील प्रजेचे धर्मांतर करून घेतले. हा प्रदेश नंतर ब्रिटिश भारताच्या मद्रास प्रेसीडेंसीचा भाग झाला. [३] [३]

उल्लेख[संपादन]

१९६०चा कन्नड चित्रपट रणधीर कांतीरवा हा चित्रपट कांतीरव नरसराजाच्या जीवनावर आधारित आहे. [४]

नोंदी[संपादन]

  1. ^ a b c d e f Imperial Gazetteer of India: Provincial Series 1908, p. 20
  2. ^ Imperial Gazetteer of India: Provincial Series 1908, p. 20, Michell 1995, p. 20
  3. ^ a b c d e Subrahmanyam 1989, pp. 208–209
  4. ^ "Team 'Daredevil Musthafa' to Release a Special Animation Song Tribute to Dr. Rajkumar — KSHVID". 4 October 2021. Archived from the original on 2023-05-11. 2023-11-15 रोजी पाहिले.

संदर्भ[संपादन]

  •  
  •  
  •